इगतपुरी- इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीसाने आपल्या दोन लहान मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या आजीने तक्रार दिल्यावरून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत पोलीसासह त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या पोलीसाला चार दिवसाची तर त्याच्या पत्नीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंट येथे राहणारा व रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल मोरे याच्या पहील्या पत्नीला ७ वर्षाचा मुलगा व ५ वर्षाची मुलगी आहे. २०१६ ला या मुलांच्या आईचा एका दुर्धर आजारात मृत्यु झाला. त्यानंतर राहुल मोरे याने २०१७ ला दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला ३ वर्षाची मुलगी आहे. दोन्ही मुलांना आई नसल्याने सावत्र आई मयुरी सोबत राहात होते. मात्र सावत्र आईसह वडीलही रोज या मुलांचा छळ करत होते. दुसरी पत्नी मयुरी व स्वता: वडील या दोन लहान मुलांना लोखंडीपट्टी बेल्टने रोज अमानुषपणे मारहाण करीत असल्याने शेजाऱ्यांनी सुरत येथे राहणाऱ्या मुलांच्या आजी केसरबाई कांदवळकर, वय ५० वर्ष यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. सुरत वरुन आलेल्या आजी यांनी स्वता: येऊन पाहणी केली असता मुलांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनात आल्याने त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली. राहुल मोरे या रेल्वे पोलिसासह त्याची पत्नी मयुरी हिलाही पोलीसांनी अटक केली. मुलाच्या संपुर्ण शरीरावर असंख्य जखमा असुन मुलीच्या शरीरावरही मार असुन दोन्ही डोळ्यांवर बेल्टने मारल्याने चेहऱ्यासह डोळेही सुजले आहेत. या कोवळ्या जीवांचा मार पाहुन इगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलीसांनाही गहीवरुन आले. या दोन लहान मुलांना जास्त इजा झाली असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस दिपक पाटील, उपनिरीक्षक शरद सोनवणे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी आदी करीत आहे.