इगतपुरी – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष संदेश देऊन भेटीसाठी बोलावून घेतले. सलग दोनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना तिसऱ्या टर्ममध्ये निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या संदेशाला प्रतिसाद देऊन गुरुवारी माजी आमदार निर्मला गावित यांनी मुख्यमंत्री निवासात हजेरी लावली. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महत्वपूर्ण विकासकामे मार्गी लावणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती, शिवसेनेच्या वरिष्ठ पदावर जबाबदारी आदी विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. निवडणुकीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्यमंत्री ठाकरे आणि माजी आमदार निर्मला गावित यांची नियोजित भेट यापूर्वी होऊ शकली नव्हती. दरम्यान ह्या महत्वपूर्ण भेटीत घोटी शहर पाणीपुरवठा योजना, रस्ते, सिंचन योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न, औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगार आदी प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सौ. गावित यांना यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचा शब्द दिला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी माजी आमदार निर्मला गावित यांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन मतदारसंघाची रचना दुर्गम असल्याचे अधोरेखित केले.
गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशानुसार मुंबईत एक तास माजी आमदार निर्मला गावित यांची मुख्यमंत्री निवासस्थानी चर्चा झाली. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधीच इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लगेचच निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने शिवसेनेचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवता आले नसल्याची खंत सौ. गावित यांनी बोलून दाखवली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की गावित यांच्यामुळे शिवसेनेला विक्रमी मतदान लाभले हे महत्वाचे वाटते. विविध विकासकामांनी सौ. गावित या लोकप्रिय असल्याचा फायदा निश्चितपणे पक्षाला झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही यावेळी चर्चेत भाग घेऊन निर्मला गावित यांच्या कार्याचे कौतुक केले. यापुढे थेट संपर्क साधून प्रश्न मार्गी लावावेत यासाठी सदैव उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असून विविध समस्यांनी ग्रासलेला मतदारसंघ आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, सिंचन, स्थानिकांना रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप अनेक भागात प्रलंबित आहेत. घोटी शहराची लक्ष्यवेधी पाणीपुरवठा योजना गतिमान करावी आदी विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार निर्मला गावित यांना सांगितले की, मतदारसंघाच्या कोणत्याही प्रश्नावर थेट माझ्याशी संपर्क करून पूर्वलक्षी प्रभावाने समस्या सोडवून घेण्याला अग्रक्रम द्यावा. आगामी काळात अनेक समस्या सुटलेल्या असतील याची मी ग्वाही देतो.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला विक्रमी यश मिळवून देण्यासाठी निर्मला गावित यांनी त्यांचे अभ्यासपूर्ण नियोजन सादर केले. त्यानुसार कार्यवाही झाल्यास सत्ता शिवसेनेची असणार असल्याचा पुनरुच्चार सौ. गावित यांनी केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्मला गावित यांच्याकडे शिवसेनेच्या वरिष्ठ पदाची जबाबदारी देणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. एक तास चाललेल्या या बैठकीत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषद सदस्या नयना गावित आदी उपस्थित होते. दरम्यान माजी आमदार निर्मला गावित यांच्या मुख्यमंत्री भेटीने मतदारसंघात चर्चा रंगल्या असून सौ. गावित यांनी सक्रीयतेने शिवसेना पक्षाचे काम जोमाने सुरू केल्याने शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.