घटनेने परिसरात भितीचे वातावरण
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गा जवळील बोरटेंभे फाट्याजवळ असलेल्या सात दुकानांचे शटर वाकवून अज्ञात चोरटयांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास सुमारे ५१ हजार रूपये किमंतीचा फोटो कॅमेरा व रोख १ हजार रूपये चोरी करून पसार झाले.या घटनेची फिर्याद दिपक दत्तु आडोळे, राहणार बोरटेंभा, वय ३१ वर्ष. व्यवसाय फोटोग्राफर यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना आठ दुकानांपैकी सात दुकानांचे शटर वाकलेले दिसून आले. दुकानांतील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळुन आले. या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास बोरटेंभा फाटा येथे असलेल्या वैष्णवी फोटो स्टुडिओसह ७ दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी वाकवून, तोडून चोरी केल्याची घटना घडली. वैष्णवी फोटो स्टुडिओ मधून ५१ हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरीस गेल्याचे आढळून आले. तर काही किराणा दुकानात मालाची नासधुस केल्याचे दुकान उघडल्यानंतर व्यापा-याला आढळून आले.
या ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेरेत अज्ञात चोरटे चोरी करतांना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून या अज्ञात चोरटयांविरूध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे शहरातील लहान मोठे व्यापारी व महामार्गालगतची दुकाने असलेले हॉटेल आदी व्यापाऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. रात्री व पहाटे पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे. तसेच या घटनेचा तपास होऊन चोरटयांना शिक्षा व्हावी, रात्री दुकानांच्या ओटयावर आश्रयाला राहाणाऱ्या भिकारीसह अज्ञातांनाची चौकशी करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी पोलीसांकडे केली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमंलदार जयहरी गांगुर्डे, विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी , मारूती बोराडेसह पोलीस पथक करीत आहे.
परिसरात चोऱ्यांचे व गुंड प्रवृत्ती घटनांमध्ये वाढ
इगतपुरीत पोलीस ठाण्यात काही दिवसांपासून पोलीस निरीक्षक पद रिक्त असल्याने शहरासह परिसरात चोऱ्यांचे व गुंड प्रवृत्ती घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षी बोरटेंभे गावात दरोडा पडला होता. या दरोड्यात एका वृध्द महीलेचा खुन करण्यात आला होता. आज पर्यंत या दरोड्यातील खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलीसांना यश आले नाही. तसेच २१ रोजी सात ते आठ गाळे फोडण्याची घटना घडली. यातील आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी.
– अनिल भोपे, ग्रामपंचायत सदस्य, टिटोली