इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे ड्रोनद्वारे बुधवारी मोजणी झाली.गावठाणाची मोजणी झाल्यानंतर मालमत्तेचे अचूक मालकीपत्र तयार होणार आहे व अचूक मालमत्ता पत्रक तयार झाल्यानंतर त्याचा फायदा थेट ग्रामपंचायत व गावकरी यांना होणार आहे. यामध्ये गावठाण हद्द तसेच गावठाण जमीन किती आहे याची निश्चिती करता येते.ड्रोनद्वारे गावठाण क्षेत्रातील भूमापन करण्याची योजना राज्याचा ग्रामविकास विभाग, महसूल विभाग व भारतीय सर्वेक्षण विभागाने आणली आहे.
पिंपळगाव मोर गावठाणात मोडणाऱ्या सर्व घरांच्या तसेच बख्खळ जागेच्या चुना मारून खुणा करण्यात आल्या तसेच गावठाण हद्द निश्चित करण्यात आली. त्यांनतर ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली.
ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे
● बँक कर्ज उपलब्धता सोपी.
● ७/१२ प्रमाणेच मालकी हक्क म्हणून कायदेशीर मान्यता.
● जमीन विषयक वाद मिटण्यास सोपे जाते.
● सीमांकन माहिती असल्याने मालमत्तेचे रक्षण करणे सोपे जाते.
ड्रोनद्वारे भूमोजणी कमी वेळात
पारंपरिक मोजणीपेक्षा ड्रोनद्वारे भूमोजणी कमी वेळात, कमी श्रमात तसेच कमी मनुष्यबळात होते त्यामुळे सरकारी यंत्रणेवर मनुष्यबळावर ताण येत नाही.ड्रोनद्वारे मोजणीमध्ये पारदर्शकता तसेच अचूकता असून त्यामुळे प्रत्येक खुल्या जागेचा,घराचा, व रस्त्याचा स्पष्ट नकाशा तयार होणार आहे.ड्रोनद्वारे मोजणीमुळे न्यायालयीन खटले तसेच जमिनीचे वाद व प्रलंबित असणाऱ्या घटनांमध्ये सुवर्णमध्य होऊन तिढा सुटण्यास मदत होईल.
असे होते भूमापन पथक
भूमापन पथकामध्ये पथक प्रमुख सोमकांत जैन,उपपथक प्रमुख संदीप पानपाटील,तसेच कर्मचारी अशोकसिंग परदेशी व अशोक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमापणाची प्रक्रिया पार पडली.यावेळी गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे,ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.