इगतपुरी : कोरोना महामारीच्या काळामध्ये नाभिक समाजाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामध्ये संपूर्ण राज्यासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी लॉकडाउन दोन महिन्यांचा होता. परंतु, नाभिक समाजासाठी हाच लॉकडाउन तीन महिन्यांपर्यंत चालला. नाभिक समाज समाजव्यवस्थेतील महत्वाचा घटक असून देखील शासनाच्या उदासीन धोरणांमुळे आजपावेतो समाजाला कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अनलॉकडाउनची प्रक्रिया झाल्यानंतर देखील समाजाची घडी व्यवस्थित बसण्यासाठी व चूल पेटण्यासाठी एक महिन्याची दिरंगाई झाली त्यामध्ये समाजातील विविध १४ व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. समाजाची दयनीय अवस्था अधोरेखीत व्हावी त्या अनुषंगाने काही प्रमुख मागण्याचे पत्र आ. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
या पत्रात सरकारच्या माध्यमातून नाभिक समाजासाठी श्री संतसेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून स्वतंत्र आर्थिक तरतूद करून योजना कार्यान्वित करावी.जावेद हबीब यासारख्या सलुनने बाजारात प्रवेश केल्यामुळे नाभिक व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे १० ते १५ लाख रुपये कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून द्यावे.
नाभिक समाजासाठी नाभिकी व्यवसायाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र जिल्हास्तरावर निर्माण करून संस्थेतर्फे कार्यशाळा घ्याव्यात. नाभिक व्यवसाय करताना अनेक लोकांशी प्रत्यक्ष संबंध येतो व त्यातून आजार व रोग होण्याची शक्यता असते अनेकदा रोगांमुळे व्यवसाय बंद करावा लागतो. त्याअनुषंगाने समाजातील प्रत्येकाला २० लाख रुपयांचे विमा कवच मिळावे. त्याचप्रमाणे वयाची साठी ओलांडलेल्या व्यावसायिकांना पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. मनपा,नगरपंचायत,जिल्हा परिषद तसेच बस स्टॅंड आदी ठिकाणी काढलेल्या गाळ्यांमध्ये नाभिक समाजासाठी गाळे देण्यात यावे. पन्हाळा गडाच्या पायथ्याशी शूरवीर शिवा काशीद स्मारकात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच स्मारकासाठी पर्यटकांना सखोल माहिती मिळावी. त्या उद्देशाने पूर्णवेळ सुरक्षारक्षक व गाईड नेमण्यात यावा. आदी प्रमुख मागण्या आ.पडळकर यांनी निवेदनातुन मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडल्या आहेत. नाभिक समाजाच्या विविध मागण्या शासनदरबारी पोहोचवण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून इंजि.हर्षद बुचुडे व पत्रकार भास्कर सोनवणे सातत्याने पाठपुरावा करत होते.
नाभिक समाज शासनाकडून दुर्लक्षित
वर्षानुवर्षे अन्याय सहन करणारा नाभिक समाज शासनाकडून दुर्लक्षित आहे. बहुजन समाजातील मुख्य घटक असणारा नाभिक समाज धनगर समाजाचा बांधव असल्याने मुख्यमंत्री महोदयांकडे विविध मागण्या मांडल्या. त्या पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
– गोपीचंद पडळकर, आमदार विधान परिषद