नाशिक : इगतपुरी तालुक्यात गेल्या ४ महिन्यापासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आता पर्यंत ४ जणांचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला. २ दिवसांपूर्वी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अधरवड येथे ३ वर्षीय बालिकेचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी दि. १९ ला सायंकाळी ६ च्या सुमाराला पिंपळगाव मोर येथील ६ वर्षीय बालकाचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला. यामुळे परिसरात तीव्र घबराट पसरली आहे. लोकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक आदींची तातडीने उचलबांगडी करावी, युद्धपातळीवर प्रशिक्षित वन अधिकाऱ्यांचे पथक बोलवून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी केली आहे. उपवनसंरक्षकांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यात गेल्या ४ महिन्यापासून नरभक्षक बिबट्या सक्रिय झाला आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अधरवड येथील ३ वर्षीय बालिकेचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला. ही घटना ताजी असतांनाच आज गुरुवारी पिंपळगाव मोर येथील भैरवनाथ मंदिर भागातून नरभक्षक बिबट्याने १० वर्षीय बालकाचा बळी घेतला. यामुळे इगतपुरी तालुक्यात निष्क्रिय वन अधिकाऱ्यांबाबत तीव्र स्वरूपाचे संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासह मोठ्या प्रमाणावर घबराट पसरून लोकांमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे.
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे सांगितले की, इगतपुरी तालुक्यासह या भागातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्या प्रकरणी कोणताही गम ना पस्तावा नसल्याचे गंभीर चित्र आहे. गेल्या आठवड्यातच नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपाययोजना अपेक्षित असतांना निष्क्रियता असल्याने बालकाचा नाहक बळी गेला. या भागात माणसाच्या रक्ताला चटावलेला बिबट्या असल्यानेच एकामागोमाग बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. या भागातील वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक यांचा या भागात कोणताही संपर्क नसून त्यांचे मोबाईल कायमच बंद असतात. त्यामुळे लोकांच्या संतापात भर पडली आहे. वन अधिकारी आणि वनरक्षक कायमच नशेत राहत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रशिक्षित वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झालेल्या असल्याने सध्या ह्या भागात सावळागोंधळ वाढतच आहे. कार्यरत असलेले वन अधिकारी आणि कर्मचारी अप्रशिक्षित असून नेमके कोण वनरक्षक येथे काम करतात हे कोणालाही माहीत नाही. अनेक वर्षांपासून एकच कर्मचारी या भागात ठाण मांडून बसले आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाने बदल्यांचे नियम गुंडाळून सुरू असलेले चक्र आता लोकांच्या जीविताला धोका निर्माण करीत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात वनविभाग अस्तित्वात आहे की नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या भागातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करून नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन नाशिकच्या उपवनसंरक्षकांना देण्यात येणार आहे.
असंवेदनशील वन अधिकारी आणि कर्मचारी
वन विभागाच्या असंवेदनशील वन अधिकारी आणि कर्मचारी बळी गेलेल्या कुटुंबाला कुठलाही दिलासा देण्यात सपशेल अपयशी ठरले. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना योग्य उपचार देण्यात आले नाहीत. कुठलाही अधिकारी कर्मचारी रुग्णालयात भेटीला न जाता कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतात. मयताच्या अंत्यविधीमध्येही हे लोक सहभागी झाले नाही.