– तिसऱ्या अपत्यामुळे इगतपुरीच्या प्रांताधिकाऱ्यांचा आदेश
– अदा केलेले मानधन वसुली करण्याचेही फर्मान
इगतपुरी : तिसऱ्या अपत्याचा जन्मदाखला उपलब्ध नसतांना अंगणवाडी सेविकेकडील माहितीच्या आधारे महिला पोलीस पाटील संगीता केशव केवारे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील मायदरा धानोशी येथील ही घटना असून नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटलाला अपात्र करण्याची ही पहिलीच घटना आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे पोपट पांडुरंग केकरे यांनी सबळ पुराव्यांसह तक्रार दाखल केली होती. याबाबत दोन्ही पक्षकारांना वाजवी संधी देऊन न्यायिक कामकाज पार पाडण्यात आले. संगीता केवारे यांच्याकडील पोलीस पाटील पदाचा कार्यभार अपात्रतेमुळे काढण्यात आला असून एप्रिल २०१८ पासून त्यांना दिलेल्या एकूण मानधनाची तातडीने वसुली शासनजमा करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील मायदरा धानोशी येथील पोलीस पाटील संगीता केशव केवारे यांना ३ अपत्य असल्याबाबत पोपट पांडुरंग केकरे यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केली. यासह पोलीस पाटील यांचे पती केशव केवारे हे पत्नीच्या कामकाजात हस्तक्षेप करून गावातील वाद सोडवण्याऐवजी वादामध्ये वाढ करतात असेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी निवाड्याचे कामकाज सुरू केले. तहसीलदार इगतपुरी, मंडळ अधिकारी टाकेद बुद्रुक, आरोग्य सेविका अडसरे बुद्रुक, वैद्यकीय अधिकारी खेड आदींचे चौकशी अहवाल कामकाजात नोंदवण्यात आले. तिसऱ्या अपत्याचा जन्माचा दाखला आढळत नसल्याबाबत ग्रामसेवकांनी जबाब नोंदवला. मायदरा येथील अंगणवाडी सेविका शामा केवारे यांचा जबाब आणि त्यांच्याकडील घरपोच आहार वाटपाच्या रजिस्टरवरून पोलीस पाटील संगीता केशव केवारे यांना तिसरे अपत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संगीता केशव केवारे यांना पोलीस पाटील पदावरून अपात्र केल्याबाबतचा आदेश इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी काढला.
एप्रिल २०१८ पासून संगीता केवारे यांना मानधन म्हणून अदा केलेली सर्व रक्कम अतिप्रदान झाल्याचे समजून तात्काळ वसूल करावी असेही आदेशात नमूद आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील अपात्र होण्याची ही पहिलीच घटना असून तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. तक्रारदार पोपट पांडुरंग केकरे यांनी म्हटले आहे की, महिला पोलीस पाटील संगीता केवारे हिचा सर्व कारभार पतीराज केशव केवारे हे झेरॉक्स पोलीस पाटील म्हणून वावरत होते. त्यांनी गावात वाद मिटवण्याऐवजी त्यामध्ये वाढ केल्याचे दिसते. तिसऱ्या अपत्यामुळे अपात्रता झाल्याने गाव आणि वाड्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. शासनाची फसवणूक झाल्यामुळे पदच्युत पोलीस पाटील संगीता केवारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे.