घोटी – इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळासा आहे. गेल्या दोन दिवसात २१६ मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात दमदार पावसामुळे दोन दिवसात तालुक्यातील मोठ्या व लहान धरणप्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम व वैतरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे.
इगतपुरी या पावसाच्या तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. मंगळवारी ७१ मिमी पाऊस झाला होता. तर आज (१३ ऑगस्ट) सकाळी ८ वाजेपर्यंत चोवीस तासात १४५ मिमी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यात एकूण २२०१ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण सरासरीच्या ६५ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद,वैतरणा सह पूर्व भागातही समाधान कारक झाल्याने काहीशी चिंता दूर झाली आहे
इगतपुरी तालुक्यात भावली धरण गेल्याच आठवड्यात भरून वाहू लागले. तर दारणा धरणाला मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्रोत असल्याने हे धरणही ९२.१३ टक्के भरले आहे. त्यामुळे दारणा धरणातून आज नऊ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर भवली धरणातूनही ७०० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दोन दिवसांच्या जोरदार पाण्याने तालुक्यातील धरणसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाम धरणात ८३ टक्के, कडवा धरणात ५१ टक्के, मुकणे धरणात ४६ टक्के तर वाकी धरण ३१ टक्के भरले आहे. वैतरणा धरणही ६० टक्के भरले आहे. या सर्वच धरणात एका दिवसामध्ये सरासरीच्या दहा टक्के झपाट्याने वाढ झाली आहे.