नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वासाळी ग्रामपंचायतीत २०१७-१८ पासून ते आजपर्यंतच्या सर्व विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप वासाळी, रामनगर, कचरवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे. १४ वा वित्त आयोग, पेसा कोष, ग्रामनिधी, मुद्रांक शुल्क, जमीन महसूल व नागरिकांनी भरलेल्या घरपट्टी व विविध करांतुन जमा होणाऱ्या निधीत मोठी अनियमितता झाली आहे. अनेक कामे न करताच निधी खर्च झाल्याचे दाखवून सरपंच काशिनाथ कोरडे व ग्रामसेवक चव्हाण यांनी मोठा अपहार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.दौलत कोरडे तसेच निवृत्त तहसीलदार पांडुरंग कोरडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीमधून गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तातडीने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई आणि वसुली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. इगतपुरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांना ग्रामस्थांनी आज तक्रारीचे निवेदन दिले.
आदर्श गावाचे गावकऱ्यांना स्वप्न दाखवून आदिवासी ग्रामस्थांना सरपंच काशीनाथ कोरडे यांनी विविध आश्वासने दिली. यामुळे ग्रामपंचायतीकडे कोणीही कामे आणि त्यावर किती खर्च केला याबाबत विचारणा केली नाही. दौलत कोरडे यांनी माहितीच्या अधिकारात यासंदर्भात माहिती मिळण्याचा अर्ज केला. त्यामुळे त्यांना सातत्याने ग्रामसेवक व सरपंचांनी विनवणी करून कशासाठी माहिती पाहिजे ? तुम्हांला घरकुल देतो पण माहिती अर्ज मागे घ्या असे सांगितले. परिणामी दौलत कोरडे यांना अधिक संशय वाढला. ग्रामसेवक यांनी माहिती उपलब्ध करून दिल्यावर ही माहिती कोणाला सांगू नका व दाखवू नका असे सांगितले. मिळालेल्या या माहितीतून बरीच कामे न करताच निधी खर्च केला असल्याचे उघड झाले. ग्रामस्थांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असता कामे न करताच पेसा, वित्त आयोग व ग्रामनिधी यांतून मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. अंदाजपत्रक न घेताच आणि नावालाच कामे दाखवून अनेक कामांवर खर्च दाखवण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार करतांना पुरवठादार, कंत्राटदार यांचे खात्यात पैसे देण्याऐवजी बेअरर धनादेश देऊन सरपंच व ग्रामसेवक यांनी गैरव्यवहार केलेला आहे. त्यातून सरपंच काशीनाथ कोरडे आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी गैरव्यवहार केला असल्याचे निवेदनात नमूद आहे.
सरपंच काशीनाथ कोरडे, ग्रामसेवक चव्हाण यांच्या गैरकारभार विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सरपंच, ग्रामसेवकाच्या मनमानी भ्रष्ट कारभाराची चौकशी करून अपहार केलेल्या रक्कमेची वसुली करून कारवाई करावी अशी मागणी निवृत्त तहसिलदार पांडुरंग कोरडे, दौलत कोरडे, किसन कोरडे, चिंधु डहाळे, दिनकर खादे, कैलास कचरे आदी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे. गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास सचिव यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत.
माहीती अधिकारातून लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट
सरपंच काशीनाथ कोरडे यांनी भुलभुलैया दाखवणारे शब्द देऊन भोळ्या ग्रामस्थांना आदर्श गाव निर्माण करण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यांच्या कारभाराचा संशय आल्याने माहीती अधिकारातून लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले. हे अत्यंत क्लेशदायी असून सरपंच ग्रामसेवकावर कारवाईसाठी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. यावर कारवाई होईपर्यंत आम्ही लढा देणार आहोत.
– पांडुरंग कोरडे, ग्रामस्थ तथा निवृत्त तहसीलदार