दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी हरिदास लोहकरे यांच्या प्रयत्नांनी ५७ लाखांचा निधी
….
निलेश काळे
पिंपळगाव मोर : इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधव स्वावलंबी, आत्मनिर्भर व्हावेत हा उद्देश नजरेसमोर ठेऊन खेड जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी विविधांगी प्रयत्न केले आहेत. त्यानुसार त्यांनी दिव्यांग बचत गटांची स्थापना केली. दिव्यांगांना स्वयंरोजगार निर्मिती करून स्वावलंबी करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे दिव्यांग लघुउद्योग केंद्र इमारत मंजूर करून पूर्ण सुद्धा झालेली आहे. ह्या केंद्रात दिव्यांगांच्या विविध सामग्रीसाठी हरिदास लोहकरे यांनी पुनःश्च ५७ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करून आणला आहे.
या केंद्रात लघुउद्योग कार्यान्वित झाले असून अनेक दिव्यांग बांधव प्रत्यक्षात काम करत आहेत. पेपर प्रक्रियेवर आधारित उत्पादने येथे घेतली जात आहेत. त्यात प्रामुख्याने सरकारी, निमसरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये वापरत असलेल्या विविध प्रकारच्या फाईल, पत्र व्यवहाराचे लिफाफे, मेडिकल, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोळ्या औषधे यांसाठी लागणारे पाऊच, मिठाई, कापड दुकानात लागणाऱ्या पेपर बॅग अशी उत्पादने दिव्यांग केंद्रात तयार केली जात आहे. अल्पावधीतच येथील उत्पादनांना मागणी वाढली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करून दिव्यांग बांधवांनी स्वतःला आम्ही कुठेही कमी नाही हे सिध्द केले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे दिव्यांग लघुउद्योग केंद्राचा उद्देश सफल झाला आहे.
एकच उद्योगावर अवलंबून न रहाता वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग सुरू करून बहुसंख्य दिव्यांगांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी दिव्यांगांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे या उद्योगातील अभ्यास, प्रात्यक्षिके, बारकावे, अनुभव वाढून त्यातील त्रुटी लक्षात घेऊन यश मिळवता येते. वेगवेगळ्या प्रकारचे लघुउद्योग सुरू करून अनेक दिव्यांग बांधवांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी प्रशिक्षण केंद्राची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून नाविन्यपूर्ण योजनेतून ५० लाखांचा निधी मंजुर झाला आहे. आता दिव्यांग बांधवांना लघुउद्योगाच्या ठिकाणीच प्रशिक्षणाचीही सोय होणार आहे. प्रशिक्षणाद्वारे लघुउद्योग सुरू करून दिव्यांग बांधवांचा विकास होण्याला मदत होईल. इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरातील इच्छुक दिव्यांगांना तेथे विविध प्रकारची प्रशिक्षणे घेता येणार आहेत.
दिव्यांग लघुउद्योग केंद्रातील सामुग्रीसाठीही ७ लाख ५० हजार मंजूर झाल्यामुळे केंद्रात लागणारे साहित्य व मशीन घेणे शक्य होणार आहे. त्यास जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना नाविन्यपूर्ण योजनेतून मंजुरी मिळाली आहे. दोन्ही योजना मिळून ५७ लाख ५० हजारांच्या निधीमुळे दिव्यांग बांधवांना यापुढे प्रशिक्षण व कामाच्या शोधात इतरत्र फिरावे लागणार नाही.
दिव्यांगांची प्रगती होण्यास हातभार लागेल