पिंपळगाव मोर – दिवसागणिक वाढणारी बिबट्यांची संख्या आता स्थानिक नागरिकांना उपद्रव ठरू लागली आहे. बिबटे आता मानवी वस्तीकडे आगेकूच करत असून हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
इगतपुरी तालुक्यातील खेड येथील देवाचीवाडी येथे राहणाऱ्या किरण पुंडलिक डगळे (वय.६) या चिमुरडीवर मंगळवारी २ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बाहेरून घरी परतत असताना घराच्या परिसरातच बिबट्याने हल्ला करून जखमी केले. बिबट्याने हल्ला केला त्यावेळी तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या आजोबांनी आरडाओरडा करून बिबट्याच्या तावडीतून तिची सुटका केली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी करून बुधवारी संध्याकाळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील गेल्या काही महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून लहान बालके बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत.