नाशिक – पंचवटीतील इंद्रकुंड देवस्थानच्या प्रांगणात शितळादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज (११ ऑगस्ट) शितळा सप्तमी आहे. या पार्श्वभूमीवर नारळीपौर्णिमेच्या दिवशी इंद्रकुंड देवस्थानात शितळामातेची मूर्ती विराजमान झाली.
काळाराम मंदिर संस्थानकडून ही दगडात कोरलेली दीड फूट उंचीची रेखीव मूर्ती उपलब्ध करुन देण्यात आली. रामाच्या रथाजवळ ही पुरातन मूर्ती होती. तेथून ती इंद्रकुंड देवस्थानच्या प्रांगणात आणण्यात आली. चेन्नई येथून घडीव दगडाचे सुंदर मंदिर मागविण्यात आले. कोरोनाच्या काळात ते नाशिकला पोहोचताच त्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. गणेश मंदिरासमोर हे नवे मंदिर उभे आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या यजमानपदी गणेश पटेल होते. त्यांनी सपत्नीक पूजाविधी केले. ढेकणे महाराज मंदिरातील पं. सूर्यकांत राखे गुरुजी यांनी पौरोहित्य केले. त्यांच्या समवेत ५ ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला इंद्रकुंड देवस्थानचे विश्वस्त व प्रभागातील नगरसेवक गुरुमित बग्गा, सुधाकर नेवे, रवींद्र कुलकर्णी, देवेंद्र पटेल,पप्पू शाह,बाळू पटेल, काळाराम मंदिर देवस्थानतर्फे सहकार्य करणारे विश्वस्त मंदार जानोरकर तसेच दीक्षित गुरुजी, हरिभाऊ जोशी, संतोष अत्रे, निखिल थोरात व भाविक उपस्थित होते. यावेळी सामाजिक अंतर पाळून कोरोनाचे संकटातून देश व विश्व मुक्त होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. शितळादेवीला संतुष्ट केल्याने संसर्गजन्य रोगाचे संकट दूर होते, अशी धारणा आहे. उग्र तापातून शीतलता मिळवण्यासाठी तसेच मुलांना होणाऱ्या गोवर, कांजिण्या आजारातून मुक्त होण्यासाठी देवीची आराधना केली जाते.