मुंबई – इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक पायाभरणी सोहळा मानापमान नाट्यामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना निमंत्रणे न मिळाल्याने हा सोहळा होऊ शकलेला नाही. या सोहळ्याबाबत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली होती. अखेर उद्धव ठाकरे यांना याबाबत खुलासा करुन हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करावे लागले.
ठाकरे यांनी म्हटले आहे की, एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे