नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा होता. आणीबाणीच्या काळात जे काही घडले ते चुकीचेच होते. पण सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीपेक्षा तेव्हाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात काँग्रेसनं देशाची संघटनात्मक चौकट काबीज करण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता, असं काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि भाराताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी वरील मत मांडलं.
आपण नेहमीच काँग्रेसमधील अंतर्गत लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. या पक्षानं स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. या देशाला राज्यघटना दिली आहे आणि समतेचा देखील पुरस्कार केला आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.
केंद्रातलं वर्तमान सरकार देशाच्या लोकतांत्रिक प्रणालीला नुकसान पोहोचवत आहे. देशातल्या प्रत्येक संस्थेच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. राष्ट्रीय स्वयम सेवक संघ महत्त्वाच्या संस्थांमध्ये त्यांच्या विचाराची लोकं घुसवत आहे. मीडियासह न्यायालयांनाही त्यांनी सोडलं नाही. भविष्यात आम्ही भाजपला पराभूत केलं तरीसुद्धा आम्ही त्यांच्या विचाराच्या लोकांना या संस्थांमधून काढणार नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
ऑनलाइन संवादात सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राहुल गांधी म्हणाले, आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी दिली जात नाही. न्यायिक यंत्रणेकडून आम्हाला जास्त अपेक्षा नाहीयेत. आरएसएस-भाजपकडे आर्थिक ताकद अधिक आहे. व्यावसायिकांना विरोधी पक्षांच्या बाजूनं उभं राहू दिलं जात नाही. लोकशाही व्यवस्थेवर विचार करून केला गेलेला हा हल्ला आहे.