मोलकरणीचा दागिण्यांवर डल्ला
नाशिक – घरकाम करणाºया मोलकरणीने महिलेच्या घरातील लाखाच्या दागिण्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत घरमालकीने संशय व्यक्त केल्याने मोलकरणी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणू राम कनोजिया (२६ रा. त्रिमुर्तीचौक, सिडको) असे संशयित मोलकरणीचे नाव आहे. याबाबत श्रध्दा जितूकुमार साळुंखे (रा. खंडेरावनगर, पाथर्डी शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साळुंखे यांच्याकडे रेणू कनोजिया ही महिला घरकाम करते. दि.१४ ते १८ दरम्यान साळुंखे यांच्या घरातील बेडरूमच्या कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ७ हजार ५०० रूपये किमतीचे दागिणे चोरीस गेले. अचानक घरातील दागिणे बेपत्ता झाल्याने मोलकरणीवर संशय व्यक्त करण्यात येत असून अधिक तपास उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.
—
वापरायला दिलेल्या दुचाकीचा अपहार
नाशिक – वापरण्यासाठी दिलेल्या मोटारसायकलची एकाने परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना नाशिकरोड येथे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसानी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत.
आकाश मोहन हांडोरे (३० रा.हांडोरे मळा,विहीतगाव) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. अनिल ग्यानचंद भाटीया (रा.मुक्तीधाम मागे,आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. भाटीया यांच्या दुकानाची घरपट्टीवर वारसांची नावे लावायची होती. तसेच नवीन विद्यूत जोडणी घ्यायची होती. त्यामुळे ते मनपा कार्यालयात गेले असता ही घटना घडली. १० आॅक्टोबर रोजी संशयीतांने भाटीया यांना गाठले.यावेळी भाटीया यांच्या ताब्यातील एमएच १५ सीबी ५४०४ ही पॅशन प्रो दुचाकी त्याने काही दिवसांसाठी वापरण्यासाठी घेतली. अनेक दिवस उलटूनही त्याने दुचाकी परत न केल्याने भाटीया यांनी चौकशी केली असता संशयीताने परस्पर मोटारसायकली विल्हेवाट लावल्याचे समोर आले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
—
कारची काच फोडून लॅपटॉप चोरी
नाशिक – पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व महत्वाची कागदपत्र चोरून नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पगार (रा.कळवण) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पगार सोमवारी (दि.१५) कामानिमित्त शहरात आले होते. मुंबई नाका परिसरातील गोकुळ हॉटेल नजिकच्या चोंडेश्वरी किराणा दुकाना समोर त्यांनी आपली क्रेटाकार (एमएच ४१ एएम ५५७५) पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉप,चार्जर तसेच कोटक आणि स्टेट बँकेचे चेकबुक व महत्वाची कागदपत्र असा सुमारे ३५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.