नाशिक – इंदिरानगर येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी गंगापूररोडवर कारमध्ये मृतावस्थेत आढळली आहे. हॉटेल गंमत जंमत परिसरात या युवतीचा मृतदेह तिच्याच कारमध्ये आढळल्याने आत्महत्या की खुन असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही युवती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीपर्णा सुबेंद्रनाथ रॉय (२०) ही तरुणी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. सोमवारी (७ डिसेंबर) दुपारच्या सुमारास ती एम.एच.३१ डीके ५१८८ या स्वतः च्या कारने महाविद्यालयात गेली. तसे तिने घरी सांगितले. सायंकाळी उशीरापर्यंत ती न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच न सापडल्याने अखेर त्यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र, मंगळवारी (८ डिसेंबर) रात्री गंगापूर धरणाजवळील गंमत जंमत हॉटेल हॉटेल परिसरात एका कारमध्ये तरुणी बेशुध्द अवस्थेत असल्याची माहिती नाशिक तालुका पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ती तरुणी मृतावस्थेत आढळली. तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. ही तरुणी इंदिरानगरची रहिवासी श्रीपर्णा असल्याचेच स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या तरुणीवर मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरु होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या तरुणीने आत्महत्या केली की तिचा खुन झाला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शवविच्छेदनानंतर याचा खुलासा होणार आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नविता घुगे करीत आहेत.