नवी दिल्ली – इंडोनेशियातील दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर बचाव पथकाने आपली शोध मोहीम अधिक तीव्र केली. यात आता विमानाच्या अवशेषांसोबतच प्रवाशांच्या शरीराचे तुकडेही सापडत आहेत. अद्यापही शोधकार्य सुरूच आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या सोकर्णो हत्ता या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शनिवारी दुपारी उडालेले श्रीविजय एअरलाइन्सचे बोइंग विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. त्यानंतर बचाव दल सातत्याने जावा समुद्रात शोध घेत आहे.
शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास या विमानाने उड्डाण केले. आणि २ वाजून ४ मिनिटांनी या विमानाचा संपर्क तुटला. वास्तविक, ९० मिनिटांनी हे विमान पोंटीयनाक येथे उतरणे अपेक्षित होते. त्यापूर्वीच ते दुर्घटनाग्रस्त झाले. वैमानिक आणि क्रू मेम्बर्ससह या विमानात एकूण ६२ प्रवासी होते. त्यात १० मुलांचाही समावेश होता. जकार्ता पोस्टच्या वृत्तानुसार, या अपघातातून कोणीही जिवंत वाचण्याची शक्यता नाही.
या विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी एक हेलिकॉप्टर, १० युद्धनौका, व्यावसायिक डायव्हर्स, आणि स्थानिक मच्छिमारांना मदतीला घेण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हा सर्वात दुःखद काळ होता. फ्लाईट रडारनुसार, हे विमान उड्डाणानंतर जवळपास ११ हजार फूट उंचीवर पोहोचले. त्यानंतर ते अचानक २५० फूट खाली आले. आणि विमानाशी संपर्क तुटला.
श्रीविजय एअरलाइन्सकडे जवळपास १९ बोइंग विमाने आहेत. इंडोनेशियाशिवाय दक्षिण पूर्व आशियामध्ये या कंपनीची विमाने जातात. सध्या इंडोनेशियामधील ही तिसऱ्या क्रमांकाची एअरलाइन्स आहे. ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान २७ वर्षे जुने होते. विशेष म्हणजे एक विमान २५ वर्षांपर्यंत सेवा देऊ शकते. म्हणजेच ज्यांचे आयुर्मान संपले आहे, अशी विमाने देखील या कंपनीच्या सेवेत आहेत.
दरम्यान, इंडोनेशियन विमान कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणा फारशा चांगल्या नसल्याने संपूर्ण युरोपात त्यांची विमाने बंद करण्यात आली होती. यात सुधारणा केल्यावर २०१८ मध्ये येथील कंपन्यांना ब्लॅक लिस्टमधून काढण्यात आले होते.