नाशिक – इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरु झाल्यापासून नाशिक जिल्ह्यात एकूण १ लाख ७० हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. यापैकी गेल्या पाच महिन्यात ३५ हजार नागरिकांनी खाते उघडले असून सर्वाधिक प्रमाण हे ग्रामीण भागातील आहे. कोरोनाकाळातील गेल्या पाच महिन्यात आधार संलग्न भुगतान सेवा (AePS) मार्फत दीड लाख ग्राहकांनी २० कोटी रुपये काढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना यांचा सर्वाधिक लाभ ग्राहकांनी घेतल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली आहे.
भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून इंडिया पोस्ट पेमेंट बँक प्रणाली तर्फे नागरिकांना आर्थिक व्यवहार करत असताना मदत करणे हे देखील उद्दिष्ट साध्य करत आहे. डाक सेवेच्या नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि मालेगाव अशा दोन विभागांमध्ये वर्गीकरण आहे. यापैकी नाशिक विभागात इगतपुरी, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी, सिन्नर आणि काही अंशी निफाड तालुक्याचा समावेश होती तर उर्वरित तालुके हे मालेगाव विभागात येतात.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा (AePS) मार्फत ग्राहकांना पोस्टमनद्वारे त्यांच्या घरी जाऊन पेमेंट देण्याची सेवा पोस्ट विभागामार्फत केली जात आहे. ग्रामीण भागातील खातेधारकांना बँकेतून पैसे काढावयाचे असल्यास तालुक्याच्या ठिकाणी पायपीट करून काढावे लागत असे मात्र, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने घरपोच सेवा दिल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पोस्टमनकडूनच फक्त आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक पद्धतीने अगदी ५ मिनिटात खाते उघडण्याची सुलभ सोय असल्याने ग्राहकांचा देखील ओढा या बँकेकडे वळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यावेळी खातेधारकांना बँकेच्या या सेवेचा फार उपयोग झाला. पैसे पोहोचविणारा पोस्टमन पैसे पोहचविण्यासोबतच नागरिकांच्या फोनला रिचार्ज करून देणे, त्यांचे ऑनलाईन वीजबिल भरून देणे आदी महत्त्वाच्या बाबींमध्ये मदत करत आहेत.
डाक विभागातर्फे लवकरच इयत्ता दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नवीन प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३७ हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी शासनस्तरावरून प्राप्त झाली असून लवकरच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्रचार्यांसोबत चर्चा करून हि प्रणाली डाक विभागामार्फत सुरु करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून त्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे त्यांना ताबडतोब मिळणार आहे.
आदिवासी विकास मंत्रालयातर्फे सुरु करण्यात येणाऱ्या खावटी योजनेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक संलग्न संस्था म्हणून काम करणार आहे त्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. प्रायोगित तत्वावर नाशिक जिल्ह्यातील कातकरी या आदिवासी समाजाच्या सर्वच नागरिकांचे खाते उघडण्यात आले असून हा प्रयोग लवकरच राज्यभर अवलंबिला जाणार आहे.
त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांनादेखील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये लवकरात लवकर समाविष्ट करुन त्यांना देखील या सुलभ सेवेचा लाभ घेता येणार असल्याचेही प्रवर डाक अधीक्षक श्री अहिरराव यांनी सांगितले.