ज्वालादेवी (हिमाचल प्रदेश)
मंडळी नमस्कार,
आपल्या देखो अपना देश या मालिकेत आज आपण जाणार आहोत ज्वालाजी येथे. हिमाचल प्रदेश म्हणजे शिमला-कुल्लू-मनाली किंवा फार झाले तर धरमशाला व डलहौसी अशी सहल बरेच पर्यटक करतात. पण आपल्या याच हिमाचल प्रदेशात एक नैसर्गिक चमत्कार असलेलं ज्वालादेवी हे ठिकाण आहे. त्याची आज सफर करुया..

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
निसर्गाची मुक्त उधळण असलेलं भारतातील एक प्रमुख राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. येथे पावसाळ्यात पडणारा पाऊस व नंतर पडणार्या बर्फाचे पाणी यामुळे येथे हिरवीगार जंगले आहेत. येथे बर्फाच्छादित डोंगर आहेत, देवदार, पाईनची जंगले आहेत. वर्षभर खळाळत वाहणार्या नद्या आहेत. यामुळे हा परीसर पर्यटकांना सदैव आकर्षित करतो.
अशा या निसर्गरम्य हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यापासून ३० किलोमीटर अंतरावर ज्वालामुखी गावात ज्वाला देवीचे मंदिर आहे. ज्वाला देवी मंदिराला जोता वाली का मंदिर व नगरकोट असे म्हणतात. कालिधर पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य हे आहे की, या मंदिरात देवीची कुठलीही मूर्ती नाही. येथे पृथ्वी मधून ज्योतीची उत्पत्ती झालेली आहे व या अग्नी ज्योतीची पूजा-पाठ या मंदिरात केली जाते. ज्वालाजी हे मंदिर शक्तीपीठातील एक मंदिर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी सती देवीच्या जिभेचा भाग पडलेला आहे.
खूप वर्षांपूर्वी एका गुराख्याला असे आढळले की, त्याची एक गाय कधीच दूध देत नव्हती, त्याचे कारण शोधण्यासाठी त्याने त्या गायीचा पाठलाग केला. तेव्हा त्याला असे दिसले की, जंगलात एका मुलीने त्या गायीचे दूध पिले व नंतर लुकलुकत्या प्रकाशात गायब झाली. या गुराख्याने आपल्या राजाकडे जाऊन त्याने ती कथा राजाला सांगितली. सतीची जीभ या भागात पडली आहे, अशी आख्यायिका राजाला माहित होती. म्हणून त्या पवित्र जागेचा शोध घेण्याचे आदेश राजाने दिले. त्याचवेळेस त्या गुराख्याकडून अजून एक अशी माहिती मिळाली की, एका डोंगरावर एक ज्वाला जळत आहे. त्यावरून राजाला हे पवित्र ठिकाण सापडले. त्याने तिथे पवित्र ज्योतीचे दर्शन घेऊन एक मंदिर बांधले. नियमित पूजा-अर्चा यांची व्यवस्था केली. या मंदिरातील ही ज्वाला बिना तेल वाती शिवाय दगडांमधून धगधगते आणि हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

या मंदिराबद्दल पुराणांमध्ये काही प्रसिद्ध कथा आहेत. मंदिराचा उद्धार व नुतनीकरण पांडवांनी केला आहे, असे म्हणतात. तसेच अजून अशी एक कथा आहे की, याठिकाणी माता देवी भक्त गोरखनाथ हे देवीची पूजा आराधना करत असत. एकदा गोरखनाथाला खूप भूक लागली होती. तेव्हा गोरखनाथ देवीला म्हणाले की, तुम्ही आग लावून पाणी गरम करा, तोवर मी भिक्षा मागून आणतो. तेव्हा देवीने आग लावून पाणी गरम करून ठेवले. त्यावेळेस गोरखनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले. तेवढ्या वेळेत युगामध्ये परिवर्तन झाले आणि कलियुग आले. भिक्षा मागण्यासाठी गेलेले गोरखनाथ परत आले नाही. तेव्हापासून देवी अग्नी लावून गोरखनाथाची वाट पहात आहे, अशी मान्यता आहे. पुन्हा सत्ययुग येईल व त्या सत्ययुगात पुन्हा बाबा गोरखनाथ परत येतील. ते येईपर्यंत ज्वाला (अग्नि) जळत राहील. येथील एका कुंडात पाणी उकळत आहे. असे दिसते त्याला गोरख डब्बी असे म्हणतात.
मंदिरात दोन चांदीचे उंच दरवाजे आहेत. मंदिरामधील वरचा भाग सोन्यासारखा चमकणाऱ्या विशेष धातूच्या प्लेट पासून बनवलेला आहे. दरवाजावर एक मोठी घंटा आहे. ती घंटा नेपाळच्या राजाने देवीला अर्पण केलेली आहे. पूजा करण्यासाठी देवीचे मंदिर चौकोनी आकाराचे बनलेले आहे. या मंदिरात एक दगडाची चट्टान आहे. ज्याला महाकाली देवीचे उग्र रूप असे मानतात. दरवाज्यावर दोन सिंहाच्या मूर्ती आहेत. येथे रात्रीच्या आरतीला खूप जास्त महत्त्व आहे.
चला तर मग, अशा वेगळ्या ठिकाणी जायला आवडेल ना.










