श्री क्षेत्र मार्लेश्वर-रत्नागिरी
मंडळी नमस्कार ,
कोविडच्या सावटामध्ये कुठेही पर्यटनास न जाऊ शकलेल्या असंख्य पर्यटन प्रेमींना घरबसल्या वेगवेगळ्या आणि हटके पर्यटन स्थळांची माहिती व्हावी, या उद्देशाने आपण सुरु केलेली ही पर्यटन विषयक मालिका दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत आहे. देखो अपना देश मध्ये बोलता बोलता २४ पर्यटन स्थळांना आपण सचित्र भेट दिली. आज या मालिकेतील २५ व्या पर्यटन स्थळी आपणांस घेऊन जाताना मला मनस्वी आनंद होत आहे. सापांचा मुक्त संचार असलेल्या शिव मंदिराचे आज आपण या लेखाद्वारे दर्शन घेणार आहोत.
देशांतर्गत पर्यटन करतांना प्रत्येक सहलीत आपण बहुदा एकतरी शिव मंदिरास भेट देतोच. आजही आपण निसर्गरम्य कोकणातील अशाच एका अप्रसिध्द मार्लेश्वर शिवमंदिरास भेट देणार आहोत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर म्हणजे डोंगरात एक गुहा आहे आणि या मंदिरात अनेक साप मुक्तपणे फिरत असतात. परंतु त्यांचा कुणालाही उपद्रव होत नाही. आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या शिव मंदिराविषयी जाणून घेऊ या.
श्री क्षेत्र – मार्लेश्वर
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा हायवेवरील संगमेश्वर जवळ फक्त ३८ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत हे क्षेत्र वसले आहे. असंख्य लहान-मोठ्या धबधब्यांनी वेढलेल्या पर्वतराजीत मार्लेश्वर येथे ही गुहा आहे. या डोंगराच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता असून पुढे मार्लेश्वर देवस्थानापर्यंत ५३० पायर्या आहेत.
या पायर्यांची नुकतीच डागडुजी केली असून कुणीही सहज मंदिरापर्यंत पोहचू शकते. या संपूर्ण परिसरात पोहचल्यावर अक्षरशः चारधामला आल्याचा भास होतो. कारण चारही बाजूला उंचच उंच डोंगर आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात फक्त समईचाच उजेड असतो. विशेष म्हणजे, सापांचा सर्वत्र मुक्तसंचार सुरु असतो. असे असले तरीही हे सर्प कुणालाही इजा करत नाहीत. या गुहेतील कपारीत भरपूर डूरक्या घोणस व बोआ जातीचे बिनविषारी साप आहेत. दरवर्षी मकर संक्रांतीला श्री देव मार्लेश्वर आणि नजिकच्या साखरपा गावातील गिरीजादेवी यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो. त्यास तब्बल २ लाख भाविक येतात.
भर पावसाळ्यात तर इथले निसर्ग सौंदर्य ओसंडून वाहत असते. मुख्यतः श्रावणापासून ते दिवाळी पर्यंत हा परिसर अप्रतिम सुंदर दिसतो. या परिसरात असंख्य धबधबे असले तरी मुख्य मंदिराच्या समोरच जणू शंकराच्या जटेतून प्रवाहित झालेल्या गंगेसारखा शुभ्र असा धारेश्वर कोसळत असतो.
येथील रम्य परिसर, काळजात धडकी भरवणारा बेधुंद धबधबा, आजुबाजुची वनराई आणि येथील प्रचंड शांतता यामुळे मार्लेश्वर हे भाविकांना, पर्यटकांना व ट्रेकर्सला एक वेगळाच आनंद देतो. आपल्यापैकी बरेच जण पर्यटनासाठी कोकणात जातात. परंतु बहुसंख्य पर्यटकांना समुद्राचे आकर्षण असल्याने व मार्लेश्वर देवस्थान त्याच्या विरुद्ध दिशेला असल्याने रेग्युलर पर्यटक फारसे फिरकत नाहीत. पण कोकणात जाऊन मार्लेश्वरला न जाणे म्हणजे “मार्लेश्वर नहीं देखा तो कुछ नहीं देखा” असे म्हणावेसे वाटते. मात्र आता पुढील कोकण सहलीत तुम्ही मार्लेश्वरासाठी एक दिवस नक्कीच द्याल, हे नक्की.
कसे जाल
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथून मार्लेश्वर येथे सहज पोहचता येते. कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर येथे रेल्वेने व पुढे रस्तामार्गेही पोहचता येते. कोकणात सिंधुदुर्ग येथे विमानतळ आहे. परंतु तेथे अद्याप फ्लाईटस सुरु झालेल्या नसल्याने आज तरी मुंबई विमानतळाचाच पर्याय आहे. आणि तेच जवळचे विमानतळ आहे. येथून मार्लेश्वर रस्तेमार्गे ३०० किलोमीटर अंतरावर आहे.
कुठे रहाल
संपुर्ण कोकण परिसराप्रमाणेच येथेही काही घरगुती व्यवस्था असून देवरूख व संगमेश्वर येथे काही हाॅटेल्समधे राहण्याची व जेवणाची व्यवस्था होते.
केव्हा जावे
तसे तर वर्षभर येथे केव्हाही गेले तरी चालते. परंतु पावसाळ्यात इथलं निसर्ग सौदंर्य अधिकच खुलतं. त्यामुळे जुलै ते डिसेंबर हा कालावधी निवडावा.
काय पहाल
संपुर्ण रत्नागिरी परिसरावर निसर्गाने मनसोक्त उधळण केलेली आहे. त्यामुळे सागर किनारे, गणपतीपुळे-हेदवी-आंर्जेला गणेश मंदिर, ऐतिहासिक जलदुर्ग, थिबा पॅलेस, पावसचा मठ, विविध वाॅटर स्पोर्टस अशी चार दिवसांची आनंददायी सहल सहज होऊ शकते.
आनंद
माझ्या सारख्या नवशिक्या लेखकाचे अनुभव आपण गोड मानून या लेखमालेला आपण सर्वजण उदंड प्रतिसाद देत आहात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे लेख जगभर फिरवले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.