आपल्यापैकी बरेच जण केरळ सहलीला जाऊन आले असाल. केरळ म्हणजे मुन्नार, टेक्केडी, अलेप्पी व कोवलम (त्रिवेंद्रम) असे एवढेच आपल्याला माहिती आहे. परंतु केरळमधील एक आगळे वेगळे ठिकाण म्हणजे वारकल. तर आज आपण या वारकल बीचची सहल करुया. आपल्या देखो अपना देश या हटके पर्यटनस्थळांच्या माहितीपर मालिकेत.
केरळातील तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील वारकल हे एक व्यावसायिक, औद्योगिक आणि पर्यटनाचे केंद्र आहे. त्रिवेंद्रमच्या उत्तरेला ३६ किलोमीटर अंतरावर समुद्र किनारी हे वारकल नावाचे गाव आहे. या समुद्र किनार्याला पापनाश समुद्र किनारा असेही म्हणतात.
येथील स्थानिक लोकांचे असे मानणे आहे की, या स्वच्छ पाण्यात स्नान केल्यास पापांचा नाश होतो. हा समुद्र किनारा डोंगर रांगेला लागूनच आहे. एका बाजूला अथांग अरब सागर तर दुसर्या बाजूस नारळ सुपारीच्या बागा असल्याने येथे खुप छान निसर्गरम्य परिसर तयार झाला आहे. हा भाग केरळातील शांत , रमणीय असून फारशी वर्दळ नसल्याने अतिशय स्वच्छ असा सागर किनारा आपणास बघावयास मिळतो.
येथे जवळच जनार्दन स्वामींचे तब्बल दोन हजार वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिरास वारकल मंदिर असेही संबोधले जाते. दरवर्षी या मंदिरात १० दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. त्यास आरत्तू असे म्हणतात. वारकलपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.
येथे जवळच सुमारे २०० एकर परिसर व्यापलेला शिवगिरी आश्रम आहे. याठिकाणी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने भेट देतात. वारकल येथे दिसणारा विलोभनीय सूर्यास्त पाहण्यासाठी येथे असंख्य जण येतात.
कसे पोहचाल
त्रिवेंद्रम इंटरनॅशनल विमानतळ येथून फक्त ४१ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वारकल पुन्नामूड येथे रेल्वे स्टेशनही असल्याने वारकल सर्वच मार्गांनी जोडलेले आहे. पनवेल ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग येथून फक्त १२ किमी अंतरावर आहे.
काय बघाल
वारकला अक्वेरीयम, पद्मनाभ स्वामी टेंपल,
शिवगिरी मठ, जर्नादन स्वामी मंदिर.
कुठे रहाल
केरळ हे पर्यटनाचे दृष्टीने प्रगत राज्य असल्याने वास्तव्यासाठी सर्वत्र अतिशय सुंदर हाॅटेल्स, होम स्टे व रिसाॅर्टस उपलब्ध आहेत.
जाण्यासाठी योग्य काळ
ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा कालावधी पर्यटनासाठी चांगला असतो.
(यापुढे केरळला जाल तेव्हा वारकल बीच व परिसरासाठी एक दिवस नक्की राखून ठेवा)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!