केंद्र सरकारने मागील वर्षी नवीन केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहिर केलेल्या लेह-लडाख प्रांतातील अशाच ऐका ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत. आपल्या आवडत्या *देखो अपना देश* या मालिकेत.
आपल्या देशावरील सन १९६२ चे चीन आक्रमण ही आपली एक अशी जखम आहे जी आजही ताजी आहे. जेव्हा आपण अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील लाईट अँड साऊंड शो बघतो तेव्हा हे लक्षात येते की, आपल्या सैन्याने किती नेटाने ते युद्ध लढले होते. तसेच गंगटोक जवळील नथुला पास आणि बाबा मंदिर येथे भेट दिल्यावरही आपल्या सैन्याचा पराक्रम लक्षात येतो.
रेझान्ग ला पास हे ठिकाण लडाखच्या दक्षिण पूर्व भागात छुशूल व्हॅलीच्या जवळ आहे. पेंगोग लेक ते त्सो मोरीरी लेक या रस्त्यावर छुशूल व्हॅली आहे. या मार्गावर रेझान्ग ला पास आहे. हिमालयातील दोन डोंगरांमधील खिंडीला पास असे म्हटले जाते. “ला-पास” हा मुळ तिबेटीयन भाषेतील शब्द आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६००० फूट उंचीवरील हे ठिकाण येथे झालेल्या भारत-चीन युद्धामुळे प्रसिद्धिस आले.
आपल्या देशाचा इतिहास हा जवानांच्या साहसाचा, बलिदानाच्या अनेक घटनांनी घडलेला आहे. अशीच एक घटना १८ नोव्हेंबर १९६२ या तारखेस रेझांन्ग ला पास येथे घडली. भारतीय सैनिक नोव्हेंबरच्या थंडीत गस्तीवर असतांना पहाटेच्या वेळी ५००० चीनी सैनिकांनी प्रचंड दारुगोळ्यासह हल्ला चढवला.
आपल्या सैन्यानेही अचानक झालेल्या हल्याने बिलकुल डगमगून न जाता जीवाची बाजी लावून त्यांना परतवून लावले. या ठिकाणी झालेल्या युद्धात शत्रूला परतवून लावले नसते तर हा लेह लडाखचा सुंदर परिसर चीनने बळकावला असता. याठिकाणी चीनचे १३०० पेक्षा जास्त व आपले १२० सैनिक मारले गेले होते. या १३ कुमाऊ रेजिमेंटच्या तुकडीचे नेतृत्व मेजर शैतानसिंह यांनी केले होते. त्यावेळी छुशूल व्हॅलीत प्रचंड बर्फ होता. तरीही १४० सैनिकांनी माघार न घेता ५००० चिनी सैनिकांना टक्कर देत माघारी धाडले. त्यांच्या शौर्याची दखल घेऊन या युद्धात लढलेल्या अनेक सैनिकांना भारत सरकारने मानाचे पुरस्कार देऊन गौरविले आहे.
अशा या अद्वितीय शौर्याचे प्रतिक म्हणून एक स्मारक रेझान्ग ला पास येथे बनविण्यात आले. आजही आपला तिरंगा येथे डौलाने फडकत आपल्या बहाद्दूर जवानांना मानवंदना देत आहे. यालाच छुशूल वाॅर मेमोरीयल म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी येथे १८ नोव्हेंबरला केंद्र शासनाच्या वतीने मानवंदना दिली जाते.
विशेष म्हणजे युनेस्कोने प्रकाशित केलेल्या जगभरातील आठ शौर्य युद्धाच्या यादीमध्ये रेझान्ग ला पास युद्धाची नोंद केली गेली आहे. तुम्ही लेह-लडाखच्या सहलीत पेंगोंग लेक पाहून जर त्सो मोरीरी लेक ला जाणार असाल तर या ठिकाणी थांबून या योद्ध्यांना श्रद्धांजली वाहूनच पुढे जा. येथून चीनची सीमा अगदी जवळ असल्याने येथील सैन्याची चौकी आजही महत्वाचे ठिकाण आहे.
पेंगोंग लेक येथे अनेक पर्यटक भेट देतात पण छुशुल वाॅर मेमोरिअलला भेट देत नाही, हे दुर्देव आहे. कारण आपल्याला थ्री इडियट या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेला पेंगोंग लेक माहित असतो पण प्रतिकूल हवामानात अपुर्या शस्त्रसाठ्यानीशी जिवाची बाजी लावून लढलेल्या आपल्याच जवानांचा इतिहास माहित नसतो.
येथे केव्हाही भेट दिली तर तुम्हाला १०/२० मराठी जवान नक्कीच भेटतील व येथील गौरवगाथा तुम्हाला सैनिकांच्या तोंडूनच ऐकायला मिळेल. अशा या निसर्गसुंदर मात्र भारतीय सैनिकांच्या पराक्रमाने यशस्वी भूमीस आपण नक्कीच भेट द्यायला हवी.
कसे पोहचाल
लेह येथून रेझान्गला पास हे ठिकाण २१० किलोमीटर असून रस्तेमार्गे येथे पोहचता येते.
लेह येथे विमानतळ असून लेह येथून टॅक्सीने आपण ४ तासात येथे पोहचू शकतो.
भारतीय रेल्वे अद्याप येथे पोहचू शकली नाही, कारण डोंगराळ भाग व प्रतिकूल हवामान.
कुठे रहाल
येथून सुमारे २०० किलोमीटरवर पेंगोंग लेक आहे. येथे भरपूर हाॅटेल्स व टेंट मधे राहण्याची व्यवस्था आहे.
योग्य कालावधी
मे पासून ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी पर्यटकांसाठी योग्य असून येथे इतर वेळी प्रचंड थंडी असते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!