मुक्तेश्वर (उत्तराखंड)
आजही आपण एका हटके पर्यटनस्थळाला भेट देणार आहोत. ज्याद्वारे आपल्याला हिमालयातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाची अनुभूती मिळणार आहे. हे ठेकाण आहे उत्तराखंड मधील मुक्तेश्वर…

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
मुक्तेश्वर हे कुमाऊ या हिमालयीन पर्वतरांगेत वसलेले छोटे परंतु अत्यंत महत्वाचे पर्यटनस्थळ आहे. मुक्तेश्वर हे समुद्र सपाटीपासून साधारण ७५०० फूट उंचीवर आहे. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या मुक्तेशवरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. नैनितालपासून अवघ्या ७२ किलोमीटरवर असलेले मुक्तेश्वर हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे आणि येथून नंदादेवी या भारताच्या दुसर्या सर्वोच्च शिखर असलेल्या हिमालयीन पर्वत रांगेचे दर्शन होते.
मुक्तेश्वर हे नाव ३५० वर्षे जुन्या मुक्तेश्वर धाम या शिवमंदिरामुळे पडले असेल, असे वाटते. या गावाचे अगोदर मुक्तेसर असे नाव होते. सन १९४७ नंतर मात्र सर्वत्र याची नोंद मुक्तेश्वर अशी झालेली दिसते. आजही येथील स्थानिक जुने लोक मुक्तेसर असेच म्हणतात.

१८८३ पासून जनावरांच्या प्लेग पासून संरक्षणासाठी लागणार्या सिरमच्या उत्पादनाचे गाव म्हणून मुक्तेश्वर प्रसिद्ध होते. गुरांच्या इंपेरीयल बॅक्टेरीयोलाॅजिकल लॅबोरेटरीची स्थापना १९८९ मधे पुण्यात झाली व १८९३ साली संक्रमित झालेल्या प्राण्यांना विलगीकरण करण्यासाठी मूक्तेश्वर येथे स्थलांतरीत करण्यात आले. भारतीय व्हेटरनरी संशोधन केंद्र येथेच होते. कालांतराने ते इजतनगर येथे स्थलांतरीत झाले.
अनेक हिमालयीन वृक्ष, फळा-फुलांची जंगले, हिरव्यागार व अरुंद रस्त्यांमुळे मुक्तेश्वर हे ट्रेकींग, कॅंम्पिंग, राॅक क्लायम्बिंग, पॅराग्लायडींग यासाठी उत्तम ठिकाण आहे. हा प्रदेश उंच हिमालयात असल्याने येथील उन्हाळाही सुखकारक असतो.
हिवाळा अति थंड तर कधीकधी बर्फवृष्टीही होते. येथील मुख्य स्थळदर्शन मध्ये मुक्तेश्वरधाम मंदिर, चावली की जाॅली ही निसर्गरम्य व्हॅली आहे. येथे कुठूनही होणारे हिमालयाचे दर्शन तर नक्कीच डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. येथे आलेले पर्यटक नैनिताल, कौसानी, राणीखेत असा सहल कार्यक्रम बनवू शकतात.

कसे पोहचाल
येथून पंतनगर हे जवळचे विमानतळ आहे.
लालकुआ हे रेल्वे स्टेशनही ८५ किलोमीटरवर आहे.
रस्तेमार्गे मुक्तेश्वर नैनीतालला जोडले असल्याने सहज पोहचता येते.
कुठे रहाल
मुक्तेश्वर परिसरात काही चांगली हाॅटेल्स आहेत, तसेच नैनीताल येथून एक दिवसाची सहल करता येते. नैनिताल येथे भरपूर हाॅटेल्स आहेत.









