आजपर्यंत आपण थंड हवेची ठिकाणं, समुद्र किनारे, अभयारण्ये अशा पर्यटनाच्या विविध पैलू दाखविणार्या स्थळांची सैर केली. आज आपण ‘देखो अपना देश’ या मालिकेत आपल्या जवळच्या एका ऐतिहासिक शहराला भेट देऊ या……
मांडू किंवा मांडवगड हे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील प्राचीन शहर आहे. मध्यप्रदेश राज्याच्या पश्चिम भागामध्ये धार शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर मांडू शहर वसलेले आहे. अकराव्या शतकात मांडू हे तारांगागड राज्याचा उपविभाग होता. मांडू शहर हे ऐतिहासिक स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आहे.
काही उपलब्ध शिलालेखानुसार, या शहराची स्थापना चंद्र सिंह नावाच्या व्यापार्याने केली. येथील ऐतिहासिक वारसा आणि नोंदी वरुन मांडू हे सहाव्या शतकातील एक भरभराटीचे शहर असण्याची दाट शक्यता आहे. पुढे दहाव्या आणि अकराव्या शतकामध्ये परमार राज्याच्या राज्यात मांडू शहराला अधिक महत्व प्राप्त झाले.
मांडू अथवा मांडवगडचे त्या काळातील ऐश्वर्य दाखविणारे हिंदोळा महाल, भव्य दरवाजे, जामी मस्जिद, मांडू किल्ला, होशंगशहाची समाधी, राणी रुपमतीचा महाल, बाज बहाद्दूर बुरुज, रेवा कुंड ही प्रमुख आकर्षणे आजही डौलाने सुस्थितीत उभी आहेत.
मांडू येथील जहाज महाल पाहून असे वाटते की, एखादे जहाजच समुद्रात झेपावण्यासाठी निघाले आहे. भक्कम दगडांनी बनलेला आणि त्यावरच्या अगणित तोफा असलेला हा मांडूचा महाल मांडूच्या वैविध्यपूर्ण इतिहासाचा मूक साक्षीदार म्हणून शतकानुशतके खंबीरपणे उभा आहे. येथील भव्य व अभेद्य दरवाजे इतिहासातील शाही विजयाचे साक्षीदार आहेत.
असाच अजून एक हिंदोळा महाल. या महालाच्या भिंतींच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे या महालाचे नाव हिंदोळा महाल असे पडले. हा महाल राजा होशंग शहाच्या काळात बांधला गेला. त्याकाळी हिंदोळा महालाचा वापर प्रेक्षक कक्ष, दिवाणे आम म्हणून केला जात असे.
येथील होशंग शहाची समाधी भारतातील पहिली संगमरवरी कलाकृती आहे, असे मानले जाते. ही समाधी अफगाणी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. या व्यतिरीक्त राणी रुपमतीला दररोज नर्मदेचे दर्शन घेता यावे यासाठी बनविलेला रुपमती महाल, जामी मस्जिद, रेवा कुंड, सनसेट पाॅईंट, सागर तलाव अशा अनेक पाॅईंटसला आपण भेट देऊ शकतो.
अलिकडे मध्यप्रदेश सरकारने राज्यातील पर्यटन व्यवसायाची क्षमता लक्षात घेऊन मांडवगडाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अनेक सुधारणा केल्या आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात दरवर्षी मांडू फेस्टिवलही आयोजित केला जातो आहे.
येथून जवळची पर्यटन स्थळे
महेश्वर ६३ किलोमीटर
इंदूर ९५ किलोमीटर
ओंकारेश्वर ११५ किलोमीटर.
उज्जैन- महेश्वर- इंदौर-मांण्डू-ओंकारेश्वर असे एक पर्यटनाचे सर्कीटच तयार झाले आहे.
कसे पोहचाल
जवळचे विमानतळ- इंदूर
जवळचे रेल्वे स्टेशन – इंदूर
इंदूर ते मांडू फक्त ८४ किलोमीटर आहे.
मांडू हे ठिकाण मुंबई-आग्रा महामार्गच्या मजिदपुरा येथून फक्त २२ किलोमीटर इतके जवळ असल्याने रस्ते मार्गेही जोडलेले आहे.
कुठे रहाल
मध्यप्रदेश टुरिझम बोर्डचे रिसाॅर्ट येथे आहे. तसेच अनेक छोटी-मोठी हाॅटेल्स येथे आहेत. मात्र बुकींग करुनच जावे.
अशा या ऐतिहासिक मांडवगड येथे पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी. तुम्हाला एक वेगळा अनुभव देवून जाईल, हे नक्की.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!