मुंबई मनपा मुख्यालय
“देखो अपना देश” या आपल्या हटके पर्यटन स्थळांची माहिती देणार्या मालिकेतील आजचे ठिकाण हे कदाचित अनेकांनी कधीतरी पाहिले असेल, तरीही ते हटके आहे. कारण, आपण ते फक्त बाहेरुन पाहिले आहे. ही एक ऐतिहासिक इमारत असून अप्रतिम सुंदर व दिमाखदार वास्तुकलेचा नमुना आहे. चला तर मग आपण आज भेट देऊ या मुंबई महानगर पालिकेच्या सर्वांगसुंदर व भव्य इमारतीस……

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
आपण नेहमी मुंबईस जातो व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरीया टर्मिनस) या शेवटच्या रेल्वे स्टेशनवर उतरतो. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर उजवीकडे जी देखणी वास्तू लगेचच आपले लक्ष वेधून घेते तीच ही मुंबई मनपाची इमारत.

ही इमारत म्हणजे मुंबईच्या बदलत्या इतिहासाचा साक्षीदार आहे. स्वातंत्रपूर्व काळात दि. २५ एप्रिल १८८९ रोजी तत्कालीन ब्रिटीश व्हाॅईसराॅय लाॅर्ड रिपन यांनी या इमारतीची कोनशिला बसविली. दि. ३१ जुलै १८९३ रोजी या महाकाय तरीही सुबक इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले. फेड्रीक विल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तुशिल्पकाराने या इमारतीचे आराखडे बनवले. ही इमारत गाॅथिक वास्तुशास्र पद्धतीने बांधलेली आहे. या इमारतीच्या बांधकामात आपणास पौर्वात्य व पश्चिमात्य स्थापत्य कलेचा सुंदर संगम पहावयास मिळतो.

या इमारतीचे आर्किटेक्ट जरी ब्रिटीश असले तरी प्रत्यक्ष बांधकाम रावसाहेब सिताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली व्यंकू बाळाजी कालेवार यांनी विहीत मुदतीत बांधकाम पुर्ण केले हे विशेष. या इमारतील सर्वात आर्कषक बाब म्हणजे सभागृह होय. हे सुंदर सभागृह ६८ फुट लांब, ३२ फुट रुंद व ३८ फुट उंच आहे.
एकूणच सबंध इमारतीतील नक्षीकाम, झुंबर, लाकडावरील कलाकुसर खुपच छान आहे. राजस्थानातील राजे महाराज्यांच्या महालांनाही लाजवेल असे अप्रतिम देखणे नक्षीकाम असलेला हा हाॅल एकदा तरी पहावा असाच आहे. या इमारतीची उंची सुमारे २३८ फूट आहे.

या इमारतीचा खर्च त्याकाळी फक्त ११ लाख १९ हजार ९६९ रुपये इतका झाला. विशेष म्हणजे अंदाजित खर्चापेक्षा ६८ हजार ८१३ रुपये खर्च कमी आला. सुमारे सव्वाशे वर्षे झाली तरी आज सुद्धा ही देखणी वास्तू जशीच्या तशी उभी आहे. या इमारतीचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम हे सर्व पर्यटक, जगभरातील आर्किटेक्ट यांना बघता यावे म्हणून नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हेरिटेज वाॅकच्या माध्यमातून शुभारंभ केला आहे. युवा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हू संधी आता देशवासियांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही देखणी वास्तू आता आपणास आतूनही पाहता येणार आहे.

ही इमारत देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत असल्याने रस्ते, विमान, रेल्वे या सर्व मार्गाने हे शहर जोडलेले आहे. वर्षभर केव्हाही जावे व हा हेरिटेज वाॅक प्रत्येकाने अनुभवावा. आपण जेव्हा मुंबईस जाल तेव्हा मुंबईच्या गौरवशाली परंपरेचा हा ठेवा पाहण्यासाठी चार तास अवश्य मोकळा वेळ काढा. आपल्याला नक्कीच वेगळा आनंद मिळेल, हे निश्चित.








