सध्या जगभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भव्यदिव्य स्टॅच्यू, मुर्ती, इमारती इ. बनवणे व अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करणे अशी एक नवीनच रीत सुरु झाली आहे. आपल्या देशातही गुजरात मध्ये बडोद्या जवळ केवडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्याच प्रकारात मोडतो. असेच एक भव्यदिव्य पक्षी स्मारक दक्षिण भारतात केरळ राज्यात उभारले आहे. चला आपण आज केरळ राज्यातील कोल्लम (पूर्वीचे क्विलाॅन) जवळील जटायू नेचर पार्कला भेट देऊ या…
जटायू नेचर पार्कला जटायू अर्थ सेंटर किंवा जटायू राॅक असेही म्हटले जाते. जटायू नेचर पार्कची स्थापना जरी ४ जुलै २०१८ साली झाली असली तरी याचे काम जवळपास १० वर्षे सुरु होते. जटायूची ही प्रतिकृती प्रसिद्ध फिल्ममेकर राजीव आंचल यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. केरळातील कोल्लम शहराजवळ चड्यमंगलम येथे एका डोंगरावरील खडकावर ही प्रतिकृती बनविण्यात आली आहे.
जटायूच्या या प्रतिकृतीची लांबी २०० फूट, जाडी १५० फूट तर उंची ६५ फूट आहे. हे शिल्प बनविण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च आला. सुमारे ६५ एकरात बनविलेली ही प्रतिकृती समुद्र सपाटीपासून १००० फूट उंचीवर असल्याने येथे रस्ता बनविण्यात आला आहे. त्यामुळे कुठल्याही वयाची व्यक्ती येथे सहज पोहचू शकते. या प्रतिकृतीच्या आत संग्रहालय व ६ D थिएटर आहे. या थिएटरमध्ये १० मिनिटांचा जटायू निर्मितीची फिल्म दाखविण्यात येते.
हे जटायुचे स्कल्पचर जगातील सर्वात मोठे पक्षाचे स्कल्पचर म्हणून नोंद झाली आहे. केरळ हे एक सुंदर राज्य आहे. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या भागात एका हिरवाईने नटलेल्या डोंगराच्या पठारावर हे शिल्प बनवल्याने त्या परिसराची सुंदरता अधिकच वाढली आहे. तसेच हे शिल्प तयार होतांना येथे महिलांची मोठी मदत झाल्याने आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला काम करतांना आढळतात. रामायणातील कथेनुसार जटायूचा एक पंख रावणाने छाटला असल्याने या शिल्पासही एकच पंख आहे.
या जटायु शिल्पामुळे आता केरळ सहलीत एक मुक्काम वाढला आहे. त्यानिमित्ताने हिल स्टेशन्स, समुद्र किनारे, पुरातन मंदिरे अशी विविधता असलेल्या केरळ राज्यात पर्यटकांना एक नवीन आकर्षण उपलब्ध झाले आहे.
वास्तविक आपल्याकडे संपूर्ण रामायण झाले पण आपण पर्यटन व्यवसायात रामायणाची सांगड घालण्यात कमी पडत आहोत. केरळ सारख्या राज्याने जटायू पार्क बनवून आपली कल्पकता जगाला दाखवून दिली आहे. अशा या आगळ्या वेगळ्या जटायु पार्कला आपण एकदा भेट द्यायलाच हवी.
कसे पोहचाल
जटायू पार्क येथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ राजधानी तिरुअनंतपुरम येथे आहे. येथून ५१ किमी अंतर आहे. तसेच रेल्वेमार्गाने कोट्टरकारा येथे पोहचून पुढे रस्तेमार्गे या ठिकाणी पोहचता येते.
कोठे रहाल
या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसली तरी जवळच कोल्लम येथे भरपूर चांगली हाॅटेल्स उपलब्ध आहेत.
काय बघाल
येथून जवळच वारकला बीच, कोल्लम बीच, तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!