मार्तंड सूर्य मंदिर
आपल्या देशात दोन सुर्य मंदिरं आहेत हे किती भारतीयांना माहीत आहे? याचे उत्तर आहे, अर्थात फारच थोड्या. पण होय, भारतात दोन सूर्य मंदीर आहेत. ओडिसा राज्यातील कोणार्कचे सूर्य मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु दुसरे सूर्य मंदिर हे काश्मीर खोर्यातील दक्षिण भागात अनंतनाग जवळ मटन येथे आहे.

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
मार्तंड सूर्य मंदिराबद्दल आपल्याला फारशी कल्पना नाही. आपण श्रीनगर येथून प्रसिद्ध पहेलगाम येथे जातांना रस्त्यात अनंतनाग हे गाव लागते. अनंतनाग जवळ पूर्वीचे मार्तंड व सध्याचे मटन येथे एका पठारावर हे सुवर्ण मंदिर बांधण्यात आले आहे. अशा या प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या सूर्य मंदिराची आज आपण आपल्या देखो अपना देश या मालिकेतून सैर करणार आहोत.
हे मंदिर साधारण १७०० वर्षांपूर्वी सूर्यवंशीय राजा ललितादित्य याने बांधले आहे. भगवान सूर्याची उपासना करण्यासाठी या मंदिराची निर्मिती केली गेली, असल्याचा उल्लेख सापडतो. या मंदिराची विशेष बाब म्हणजे हे मंदिर आपली स्थापत्यकला आणि सुंदरता यासाठी विख्यात आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या लक्षात आलेच असेल की, मंदिर मुळातच काश्मीर खोर्यात असल्याने आजूबाजूच्या परिसरातील चारी बाजूंना असलेले बर्फाच्छादित पर्वत, देवदार वृक्ष, सर्वत्र हिरवळ अशी निसर्गाची मुक्त उधळण असते. त्यामुळे मंदिर आणि परिसराची सुंदरता अधिक वाढली आहे. हे मंदिर रोम येथील डेरीक वास्तुशैलीशी मिळते जुळते आहे.
या मंदिरास प्रचंड मोठे अंगण लाभले आहे. या भव्य-दिव्य मंदिरास सुमारे ८४ कक्ष होते. आता त्याचे भग्न अवशेष पहावयास मिळतात. मंदिराच्या बांधकामात स्थानिक दगड व चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमे दिशेकडे असल्याने हिंदू धर्म ग्रंथामध्ये या मंदिराचे विशेष महत्व आहे. मार्तंड सूर्य मंदिर काश्मीरी वास्तुशैलीत बांधलेले बहुधा एकमेव उदाहरण असेल. असे म्हटले जाते की, या मंदिरातून भव्य काश्मीर खोर्याचे दर्शन होते.











