थिबा पॅलेस
ब्रम्हदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला “थिबा पॅलेस” हा भव्य ऐतिहासिक राजवाडा हे आपल्या कोकणातील प्रमुख शहर रत्नागिरीतील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. कुणाला पटणारही नाही पण एकेकाळचा ब्रम्हदेशाचा राजा हजारो मैल दूरवर, कुठलाच संबध नसलेल्या रत्नागिरीत सुमारे तीस वर्षे राहिला. एवढेच नाही तर त्याने आपला शेवटचा श्वासही रत्नागारीच्या थिबा पॅलेसमधेच घेतला. अतिशय सुंदर नक्षीकाम असलेल्या, भव्य, दिव्य थिबा पॅलेसला आपण आज आपल्या देखो अपना देश या मालिकेत भेट देणार आहोत.

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
थिबा पॅलेसचे धागे ब्रम्हदेशाशी (आताचा म्यानमार) जोडले आहेत. सन १८८५ च्या दरम्यान इंग्रजांनी म्यानमारवर हल्ला केला. तत्कालीन राजा थिबा याचा पराभव करुन ब्रम्हदेशावर कब्जा केला. तेथे सात वर्षे राज्य करणार्या थिबा राजाचा सगळा मुलुख ताब्यात घेतला. त्यामुळे थिबा राजा हा म्यानमारवर राज्य करणारा शेवटचा राजा ठरला. पण तो कोकणातील रत्नागिरीत का आला?
तर इंग्रजांची नीती अशी होती की, थिबा राजाला म्यानमारमध्ये नजरकैदेत जरी ठेवले तरी तो कालांतराने उठाव करेल. तसेच प्रजेशी त्याचा संबध राहू नये म्हणून इंग्रजांनी थिबा राजाला त्याच्या संपूर्ण कुटुंबास बंदिवान केले. तसेच १८८६ साली बोटीने भारतात मद्रासमार्गे रत्नागिरी येथे आणले. प्रथम तो बेकर बंगल्यात राहिला व त्यानंतर सन १९१० मध्ये रत्नागिरी शहरालगत सुमारे २७ एकर जागेवर थिबा राजासाठी पॅलेस बांधण्यात आला. ब्राम्ही पद्धतीने बांधलेल्या या प्रशस्त कौलारु राजवाड्याच्या बांधकामास त्याकाळी तब्बल १ लाख ३७ हजार रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते.

आपल्या मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूरवर आणि आपल्या लोकांपासून तुटलेल्या या थिबा राजाचा तीस वर्षांच्या नजरकैदेनंतर मृत्यू झाला. १९१९ साली वयाच्या ५८ व्या वर्षी त्याचा दुर्देवी अंत झाला. मृत्यूनंतरही थिबा राजाचे दुर्देव संपले नाही. त्याचे शव ब्रम्हदेशात नेऊन अंत्यसंस्कार करायची राणी सुपायलाची इच्छा होती. परंतु सहा महिने इंग्रजांनी परवानगीच दिली नाही. अखेर ब्रम्हदेशाच्या या राजावर केवळ ८/१० लोकांच्या उपस्थितीत रत्नागिरीत सामान्य नागरिकांप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कालांतराने राजाची मुलगी फाया हिने रत्नागिरीतील गोपाळ सावंत यांच्याशी विवाह केला. फायाची मुलगी टूटू हिनेही रत्नागिरीतील शंकर पवार यांच्याशी विवाह केला. सन १९७६ मध्ये टूटूच्या पतीचे निधन झाल्यावर मात्र टूटू हलाखीच्या परीस्थितीत सापडल्या. एकेकाळची राजाची नात अन्नपाण्याला मुकली. शेवटी तर शेणाच्या गोवर्या थापून तिने अलिकडेच भाड्याच्या घरात शेवटचा श्वास घेतला. टूटू ही थिबा राजाची शेवटची वंशज होती.

असा आहे थिबा पॅलेस
रत्नागिरी शहरातील हा ऐतिहासिक थिबा पॅलेस तीन मजली आहे. राजवाड्याचे बांधकाम जरी ब्राम्ही शैलीचे असले तरी बांधकामात कोकणातील घरांप्रमाणे जांभा दगडाचे चिरे वापरण्यात आले आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या थिबा पॅलेसमध्ये अनेक कक्ष आहेत. तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. थिबा पॅलेसचा परिसर अत्यंत रमणीय आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरुन अथांग अरबी समुद्राचे दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम असून खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसविण्यात आलेल्या आहेत.
सध्या राजवाड्यात राजाचे कुणीही वंशज राहत नाहीत. राजवाड्याचे रूपांतर आता म्युझिअम मध्ये करण्यात आले आहे. यात अनेक प्राचीन मूर्ती, दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. थिबा पॅलेस व थिबा पाॅईंट यामुळे हा संपूर्ण परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. या ठिकाणाहून दिसणारा सूर्यास्त पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येथे हजेरी लावतात.

सूर्यास्तावेळी येथील भाट्ये बीच व खाडी, राजिवडा बंदर, भगवती किल्ला हा सर्व परिसर खूपच सुंदर दिसतो. परंतु या सौंदर्यात मनाला सुखावणार्या वातावरणात मनात नकळत कुठेतरी थिबा राजाचा दुर्देवी चेहरा दिसत राहतो. थिबा पॅलेसला भेट देणार्या पर्यटकांच्या मनाला थिबा राजाची ही कहाणी विषण्ण करुन जाते. तरीही हा दुर्लक्षित ऐतिहासिक ठेवा एकदा अनुभवायलाच हवा.
कसे पोहचाल
रत्नागिरी शहर हे कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्टेशन आहे. तसेच हे शहर मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने रस्ते मार्गे जोडलेले आहे. कोकणात विमानतळ असले तरी अद्याप विमानसेवा उपलब्ध नसल्याने मुंबई अथवा गोवा विमानतळावरुन येथे जावे लागते.
कुठे रहाल
रत्नागिरी परिसरात अनेक उत्तम हाॅटेल्स, रिसाॅर्टस व होम स्टे उपलब्ध आहेत.










