अमरकंटक (मध्यप्रदेश)
नमस्कार मंडळी,
आपल्या देखो अपना देश या पर्यटन स्थळांची माहिती देणार्या लेख मालिकेत आपण आज भेट देऊया आपल्या शेजारच्या राज्यातील अमरकंटक या तीर्थक्षेत्रास. अमरकंटक ज्याला तिर्थराज (तिर्थक्षेत्रांचा राजा) या नावाने देखील ओळखले जाते.

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
अमरकंटक हे मध्यप्रदेश मधील अनुपपुर जिल्ह्यात आहे. कैलास पर्वतानंतर भगवान शंकराचे दुसरे वास्तव्य असलेले स्थान म्हणजे अमरकंटक. येथे भगवान शिव यांचे वास्तव्य असायचे, अशी मान्यता आहे. अमरकंटक हे विंध्या आणि सातपुडा पर्वतरांगांच्या दरम्यान स्थित आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १०६५ फूट उंचीवर असलेले अमरकंटक हे एक हिल स्टेशनही आहे.
नर्मदा नदी ही भारताच्या पवित्र नद्यांपैकी एक आहे. नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक येथे आहे. अमरकंटक नर्मदा नदीचे जन्मस्थान असण्या व्यतिरिक्त नर्मदा-सोन नद्यांच्या संगमाचेही स्थान आहे. अमरकंटक मधून उगम पावणारी नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते, तर सोन नदी ही पूर्वेकडे वाहते. या जागेबद्दल असे म्हटले जाते की भगवान शिव यांची पुत्री नर्मदा येथे जिवंत स्वरूपात वाहते.
नर्मदा नदी भगवान शिव यांनी स्वतःच आशीर्वादित केली आहे, असे म्हटले जाते. या नदीपात्रातील पवित्र पाण्यात स्नान करून सर्व पापांपासून मुक्तता मिळते. त्या व्यक्तीस वरदान लाभलेले जीवन लाभते, असा समज आहे.
अमरकंटक या जागेला महाभारत या धार्मिक महाकाव्याचेही महत्त्व आहे. असे मानले जाते की, पांडवांनी त्यांच्या वनवासाचा महत्त्वपूर्ण भाग येथे घालवला. काही लोकांचा असा विश्वास आहे की, प्रख्यात संस्कृत कवी कलिदास यांनी त्या जागेचे नाव “आम्रकोट” ठेवले.

अमरकंटक हिंदू धर्मातील अतिशय पवित्र स्थान मानले जाते. अमरकंटक हे मध्य भारताच्या विंध्य आणि सातपुडा डोंगर याच्यामध्ये महकाल डोंगरावर वसलेले आहे, त्याच्या चारही बाजूने टिक आणि मोहवाची झाडे आहे.
महाकाल पर्वतामधून उगम पावणाऱ्या या नदीला मैखाल कन्या असेही म्हटले जाते. (नर्मदा नदी बाबत पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत). पौराणिक कथेअनुसार नर्मदेचा विवाह राजकुमार सोनभद्राशी जुळला होता. पण काही कारणांमुळे हा विवाह संपन्न होऊ शकला नाही. त्यामुळे चिडून नर्मदेने आजन्म कुमारी राहण्याची शपथ घेतली. आणि रागाने उलट्या दिशेला म्हणजेच पश्चिमेला निघाली. तेव्हापासून नर्मदा नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागली. नर्मदेने कठीण तपश्चर्या केली. त्यात तिला शंकराने प्रसन्न होऊन अनेक वरदान दिले. ज्यामध्ये नर्मदा नदीला कितीही भयंकर पूर आला तरी त्यामुळे कुठलाही विनाश होणार नाही.
भारताच्या नर्मदा नदी बरोबरच्या सहा नद्या ज्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, सिंधू, कावेरी भाविक या नद्यांमध्ये अंघोळ करून पापक्षालन करतात. नर्मदेवर भगवान शंकराचा इतका आशीर्वाद आहे की तिच्या प्रवाहात मिळणाऱ्या शिवलिंगाच्या स्थापनेसाठी प्राण-प्रतिष्ठा करण्याची आवश्यकता नाही. त्या शिवलिंगाला बान शिवलिंग म्हणतात. नर्मदा नदीच्या भोवती अनेक अदृष्य शक्ती व देवता फिरत असतात, असेही म्हटले गेले की, गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा अजूनही नर्मदा देवीची परिक्रमा करत आहे.
या परिसराचे पर्यटकांना आकर्षण असण्याचे प्रमुख कारण म्हणजे या स्थानास असलेले धार्मिक महत्व, येथील घनदाट जंगले, असंख्य लहान-मोठे धबधबे आणि उंचीवरील असलेले आल्हाददायी ठिकाण यामुळे येथे पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. या अशा ठिकाणी जेथे सर्वच प्रकारची आवड असलेले पर्यटक खुष होतात.










