विलाॅन्ग खुल्ले (स्टोनहेंज)
आजचे आपले ‘देखो अपना देश’ या मालिके अंतर्गत आजचे हे ठिकाण खरोखरीच अनोखे आहे. त्याविषयी लिहितानाही मला खुप आनंद होत आहे. स्टोनहेंज बद्दल आपण फार कुतूहलाने चर्चा करतो. सगळ्यांना परिचीत असलेले आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा मान्यता मिळवलेले लंडनपासून ८५ किलोमीटरवर असलेल्या स्टोनहेंजची. येथे जगभरातून पर्यटक येतात. तथापी अशा प्रकारचे स्टोनहेंज जगामधे ६-७ ठिकाणी आहेत. भारतातही स्टोनहेंज आहेत, यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. होय ईशान्येकडील छोटेसे राज्य मणिपूर येथे स्टोनहेंज आहेत. आज आपण त्याची सफर करुया… चलो कुछ नया देखते है..

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
विलाॅन्ग खुल्ले हे मणिपूर आणि नागालॅंड या राज्यांच्या सीमेवरील खेडे गाव आहे. या गावाच्या प्रवेशद्वाराजवळच विविध आकाराच्या जमिनीत रोवलेल्या शिळा दिसतील. अगदी जगप्रसिद्ध स्टोनहेंज प्रमाणेच. गावात प्रवेश करतांना एका दरीच्या उतारावर या नजरेस पडतात.
येथील स्थानिक लोकांच्या मते या सर्व विशाल दगडांची रचना त्यांच्या पुर्वजांनी केली आहे. या दगडी शिळांचा परिसरातील पौराणिक कथांशी संबध जोडलेला आहे. येथील प्रत्येक शिळेची एक अनोखी कथा आहे. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, या प्रत्येक शिळेचे एक नाव आहे आणि रात्रीच्या वेळी सर्व शिळा एकमेकांशी पुरुषांचे आवाजात नावे घेऊन बोलतात.
येथील नागरिक हे या शिळांची नावे पण सांगतात. जसे कला, कानगा, हिला इत्यादी. परंतु दुर्देवाची गोष्ट म्हणजे, या अदभूत ठिकाणाची इतिहासात कुठेही नोंद आढळत नाही. या स्टोनहेंज मधील दगडी शिळांची उंची साधारण ७ मीटर आणि रुंदी एक ते दीड मीटर आहे. येथे एकूण अंदाजे १३५ स्टोनहेंज आहेत.

या आश्चर्यकारक ठिकाणाकडे आजही पुरातत्व विभाग अथवा इतिहास तज्ज्ञांचे लक्ष गेलेले नाही. सध्या या दुर्मिळ स्टोनहेंजला साध्या तारेचे कुंपण केलेले आहे. जर वेळेत याची नोंद घेतली नाही तर हा पुरातन वारसा लवकरच नामशेष होईल. आणि जगाला याचा इतिहास कदाचित कधीही कळणार नाही. एक मात्र नक्की की, जगात जे नामांकित सात स्टोनहेंज आहेत त्यात आपल्या स्टोनहेंजची किमान आठवे म्हणून तरी नोंद होणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे आपल्या मणिपूर राज्यात असे काही स्टोनहेंज आहे, हे आपणांस माहीत नाही तसेच स्थानिक लोकांनाही याबाबत फारशी माहिती नाही. या सगळ्या शिळा पाहतांना आपल्याही मनात प्रश्न निर्माण होतो की आपल्या पूर्वजांनी कशासाठी असे मोठमोठे दगड येथे आणून उभे केले असतील? का या शिळा रोवल्या असतील? या शिळा येथेच का रोवण्यात आल्या? हे जिकरीचे व आव्हानात्मक काम करण्यामागे नक्की काय कारण असेल?

खरंतर गमंत म्हणजे या ठिकाणच्या शिळा ज्या दगडांपासून बनवल्या आहेत तसा दगड मिळेल असे डोंगर येथे जवळपास नाहीत. मग हे दगड कसे व कोठून आणले असतील? हे दगड नक्की का उभे केलेत? हे कुणाला दफन केल्याच्या खुणा आहेत का? की काही शुभकार्यासाठी बांधलेल्या सभामंडपाचे खांब आहेत? अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला येथे मिळत नाही.
कारण याचा तसा उल्लेखही कुठे केलेला आढळून आलेला नाही. पण एक मात्र खरे की, त्याकाळी कुठलीही यंत्रसामुग्री नसतांना अशा अवजड शिळा कुणी उगाचच उभ्या करणार नाही. त्यामागे निश्चितच काही तरी कारण असेल आणि ते शोधणे गरजेचे आहे. त्याद्वारे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक बाब सर्वांसमोर येणार आहे.
कसे पोहचाल
येथे कोहिमा किंवा इंफाळ येथे विमानाने जाता येते. तर रेल्वेने नागालॅंड येथील दिमापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून टॅक्सी किंवा कारने जाता येते. इंफाळ पासून फक्त ३९ किलोमीटर अंतरावर विलाॅन्ग खुल्ले गाव आहे. येथे कच्चा रस्ता असल्याने व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने एसयुव्ही प्रकारच्या गाडीनेच जावे.










