पराशर लेक (हिमाचल प्रदेश)
बहूसंख्य पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे हिमालयातील पर्वत रांगाचा परीसर. हिमालयाचे सौंदर्य प्रत्येक ऋृतूत वेगवेगळे असते. अशा या आपल्या हिमालयात एकापेक्षा एक सुंदर अनेक नैसर्गिक तलाव आहेत. या तलावांचे प्राकृतिक सौंदर्य पाहतांना आपण देहभान विसरुन जातो. त्यातीलच एका विलोभणीय तलावावर आपण आज जाऊया…..
पराशर लेक हे ठिकाण हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात येते. मंडी शहराच्या उत्तरेला ५० किलोमीटरवर पराशर लेक आहे. या तलावाच्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेमुळे त्याची खोली आजपर्यंत कुणालाही मोजता आलेली नाही. हा निळ्याशार पाण्याचा सुंदर तलाव बर्फाच्छादित डोंगरांनी वेढलेला आहे. येथून आपल्याला वेगाने वाहणार्या व्यास नदीचे आक्राळ विक्राळ रुप बघायला मिळते.
हा तलाव समुद्रसपाटीपासून २ हजार ७३० मीटर उंचीवर आहे. साधारण अडीच एकराचा भूभाग या तलावाने व्यापलेला आहे. पराशर लेकच्या एका बाजूला पराशर ॠषींचे टुमदार मंदिर आहे. हे मंदिर १३ व्या शतकामध्ये बांधले आहे असे म्हणतात. या मंदिराची रचना त्रिस्तरीय पॅगोडा प्रकारातील आहे. या तलावामध्ये एक तरंगणारे नैसर्गिक बेट आहे. ज्यामुळे या तलावाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. तलावाच्या एकूण आकारमानाच्या साधारण ७/८ टक्के जागा या बेटाने व्यापलेली आहे. हे बेट हवेनुसार आपली जागा बदलते.
या तलावाबद्दल एक दंतकथा एकायला मिळते. पाच पांडवांपैकी एक असलेल्या भीमाने कुरुक्षेत्रातील युद्धानंतर हाताच्या कोपराने डोंगरावर खड्डा पाडून या तलावाची निर्मिती केली आहे, असे म्हणतात. नंतर पुढे पराशर ॠषींनी येथे ध्यानधारणा केली आणि या तलावाला पराशर तलाव असे नाव पडले. पराशर तलावात साधारण एप्रिल ते जून या कालावधीत तापमान आल्हाददायक असते. जुलै-ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस पडतो. तर हिवाळ्यात बर्याचदा हा तलाव काही प्रमाणात गोठलेला असतो. असे छोटेसे टुमदार तळे घनदाट जंगल, सुंदर मंदिर, थंड हवामान, पक्ष्यांचा किलबिलाट व परिसरातील बर्फाच्छादित डोंगर यामुळे या तलावाचे निसर्गरम्य सौंदर्य तुम्हाला नक्कीच आल्हाददायक व अविस्मरणीय अनुभव देऊन जाईल यात शंका नाही.
कसे पोहचाल
पराशर लेकला पोहचण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ चंदिगड येथे असून ते अंतर १६७ किलोमीटर आहे. दिल्ली ते मंडी रस्तेमार्ग व मंडी येथून पायी (ट्रेक) जाता येते तसेच गाडीनेही जाता येते. तलावापर्यंत रस्ता असल्याने कुठलेही वाहन सहज पोहचू शकते. दिल्ली ते पराशर लेक अंतर साधारण ४८० किलोमीटर आहे.
कुठे रहाल
या परिसरात काही गेस्ट हाऊसेस, रिसाॅर्टस आहेत. पण येथे कॅंम्पिंग करुन तंबूत राहण्यास पर्यटक जास्त पसंत करतात. येथील मंदिर परिसरातील धर्मशाळेतही राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
साधारण तापमान
एप्रिल ते जून ५ डिग्री ते २५ डिग्री सेल्सियस
जुलै ते सप्टेंबर १५ ते २५ डिग्री सेल्सियस
ऑक्टोबर ते मार्च ५ ते २५ डिग्री सेल्सियस
जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे
बिजली महादेव मंदिर १४ किलोमीटरवर आहे.
डेचेन माॅनेस्ट्री ८ किलोमीटरवर आहे.
१० किलोमीटरवर त्रियोगी नारायण मंदिर आहे.
कुल्लू ६४ आणि मनाली हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण फक्त ११० किमीवर आहे.