थायरोकेअर
कोइमतूर शहराजवळील एका अत्यंत दुर्गम खेड्यात अरोकिया स्वामी वेलूमणी या भूमिहीन शेतकऱ्याचा १९५९ मध्ये जन्म झाला. अगदी लहानपणापासूनच दारिद्रयाचे ‘ऐश्वर्य’ उपभोगलेला (याच शब्दात ते आपल्या पूर्व परिस्थितीचे वर्णन करतात) हा तरुण आज तब्बल या ५८०० कोटींच्या उद्योगाचा मालक आहे. आणि या उद्योगाचे नाव आहे थायरोकेअर. आज याच उद्योगाची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत.
वेलूमणी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे पालक हे भूमिहीन शेतकरी होते. त्यामुळे प्रपंच चालवणे म्हणजेच दोन वेळची जेवणाची सोय करणे देखील त्यांच्यासाठी अवघड होते. कुटुंबात आई-वडील व चार भावंडे असे सात जण व कमावता मात्र एकच व्यक्ती. जसे मुले मोठी होऊ लागली तसे त्यांच्या आईने देखील काहीतरी करण्याचा निश्चय केला. म्हणूनच त्यांनी कशी बशी एक म्हैस पाळली. म्हशीच्या दुधाची विक्री करून थोडे पैसे येऊ लागले. त्याच जोरावर त्यांनी मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला.
अर्थात शाळेत जाण्या मागचा उद्देश वेगळा होता. शाळेत जाताना एका हातात पाटी व दुसऱ्या हातात वाटी असेच जावे लागत होते. म्हणजेच शाळेत विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते. त्यामुळे मुलांचा किमान एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटतो म्हणून मुलांना शाळेत पाठवू लागले. वेलूमणी शाळेत असताना आठवड्यातले दोन दिवस त्यांना शर्ट न घालताच जावे लागे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे केवळ एकच शर्ट होता व तो दर दोन दिवसांनी धुतला जायचा. अशाच परिस्थितीत त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झाले. इयत्ता ११वीचा ग्रुप फोटो त्यांना मिळाला नाही कारण त्याकरता देण्यासाठी त्यांच्याकडे दोन रुपये देखील नव्हते. पण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर माझी परिस्थिती उत्तम होती असा ते म्हणतात. कारण मला किमान दोन वेळचे जेवण तरी नियमितपणे मिळत होते. पण माझ्याच वर्गात शिकणारे असे अनेक विद्यार्थी होते ज्यांना पुरेसे जेवण हेदेखील स्वप्नवत वाटत असे. आणि त्याचमुळे ते नेहमी बोलत असताना “गरिबीचं ऐश्वर्य” असा शब्दप्रयोग करतात.
पुढील शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर जावे लागणार होते. भूमिहीन असल्याने स्वतःचे म्हणून करायला शेत देखील नव्हते. त्यामुळे नोकरीच करावी लागणार हे निश्चित होते. पण ती नोकरी देखील चांगली मिळावी याकरता शिक्षण गरजेचे होते. आणि म्हणूनच त्यांनी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात उच्च शिक्षण घेतलेल्या मुलांनाच गोरी बायको मिळते असा प्रघात त्या काळात होता, असेही ते गंमतीने सांगतात. रामकृष्ण मिशन विद्यालय येथे त्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला.
कोइमतूर मधली त्या काळातील सर्वात मोठी व प्रतिष्ठित कंपनी साउथ इंडिया विसकॉस या रेऑन तयार करणाऱ्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरी मिळावी असे त्यांचे स्वप्न होते. आणि म्हणूनच त्या कंपनीसाठी लागणारे शिक्षण म्हणजेच बीएससी केमिस्ट्री या पदवीला त्यांनी प्रवेश घेतला व लवकरच ती यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पदवी प्राप्त केल्यानंतर उत्साहाने याच कंपनीत त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. पण कुठल्याही प्रकारचा अनुभव नसल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. हेच उत्तर पुढे आणखी काही कंपन्यांमध्ये मिळाले. तरी, अखेर जेमिनी कॅप्सूल्स या कंपनीमध्ये त्यांना नोकरी लागली. १९७८ साली केवळ दीडशे रुपये मासिक पगारावर त्यांनीही नोकरी स्विकारली. या दीडशे मधून देखील पन्नास रुपये स्व खर्चासाठी ठेवायची व उर्वरित शंभर रुपये मनीऑर्डरने आपल्या घरी पाठवायचे असा त्यांचा प्रपंच होता.
चार वर्षे त्या कंपनीत काम केल्यानंतर अचानक एके दिवशी त्यांच्या कंपनीला टाळे लागले. ते स्वतः म्हणतात “जे होतं ते चांगल्या साठीच होतं, कारण जर ती कंपनी बंद झाली नसती तर कदाचित मी आजही त्याच कंपनीमध्ये आपल्या रिटायरमेंटची वाट पाहत बसलो असतो.” वयाच्या २३व्या वर्षी त्यांना पुन्हा नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडावं लागलं आणि ही दैवी योजनाच म्हणावी लागेल. त्याचदरम्यान भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई यांच्याकडे जागा निघाल्या होत्या. यांनी त्या जागेसाठी अर्ज केला व सायंटिफिक असिस्टंट म्हणून त्यांची निवडही झाली.
१९८२ साली त्यांना ही सरकारी नोकरी लागली होती. आणि आधीच्या दीडशे रुपये पगाराच्या तुलनेत आता मात्र ८८० रुपये महिना इतका पगार त्यांना मिळू लागला. स्वतःच्या गरजा भागवून देखील आता ते घरी चांगला पैसा पाठवू शकत होते. त्यामुळे त्यांचे घरचे देखील बेहद खूष होते. चार वर्षांनी म्हणजे १९८६ मध्ये त्यांचा विवाह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी सुमती यांच्याशी झाला. याच नोकरीत असताना त्यांनी आपले एमएससी व त्यासोबतच थायरॉईड बायोकेमिस्ट्री यात आपली पीएचडी देखील संपादन केली.
सर्व काही अगदी सुखवस्तू आणि शांततेत सुरु होते. १९९५ मध्ये त्यांना अशी जाणीव होऊ लागली की या नोकरीच्या चक्रात आपण अडकलो आहोत व आयुष्यात काहीही नाविन्यपूर्ण करण्यासारखे राहिले नाही. आणि म्हणूनच त्यांनी चटकन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून स्वतःचा काहीतरी निर्माण करायचं या जिद्दीवर त्यांनीही मार्केटचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयाची अनेक जणांनी निंदा केली. इतकी चांगली नोकरी सोडून या वयात काहीतरी नवीन सुरु करायचं हे अनेकांना हास्यास्पद वाटत होतं. त्यांच्या जवळचे नातेवाईक व परिवार त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण ते आपल्या निश्चयावर ठाम होते. आणि या निर्णयात त्यांना संपूर्ण साथ लाभली ती त्यांच्या पत्नी सुमती यांची.
त्यांचाच संशोधनाचा असलेला विषय म्हणजे थायरॉइड याच्या टेस्ट लॅब मध्ये त्यांनी फार वेळ घालवला. टेस्टिंग करण्याच्या विविध पद्धती, विविध मशिनरी यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. लवकरच आपणही एक टेस्टिंग लॅब सुरू करण्याच्या शक्यतेचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. भारतात लॅब अनेक आहेत पण अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या लॅबची भारताला गरज आहे व तशा लॅब भारतात फार कमी आहेत. आणि ज्या आहेत त्यांचे दर सामान्यांना परवडणारे नाहीत. मार्केटची ही गरज ओळखून त्यांनी एक हायटेक लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी एका लॅब मधून एक जुने थायरॉईड टेस्ट करणारे मशीन विकत घेतले. त्या लॅब मध्ये त्या मशीनचा वापर केवळ एकच तास होत होता. यांनी त्या लॅबच्या मालकाला त्याच्याकडे आलेल्या सॅम्पल टेस्ट मोफत करून देणार असे सांगितले. यांनी विविध हॉस्पिटलमधून आणि वेगवेगळ्या भागांमधून सॅम्पल्स मिळवायला सुरुवात केली. यांनी घेतलेल्या मशीनची कपॅसिटी दिवसाला ३०० टेस्ट करण्याची होती. त्यातील पन्नास टेस्ट या मशीन मालकाच्या व उर्वरित अडीचशे टेस्ट मिळवण्याचा यांचा आटोकाट प्रयत्न असायचा. व्यवसायाला उत्तम सुरुवात झाली. अशा पद्धतीने १९९५ साली “थायरोकेयर” या कंपनीची स्थापना झाली. कंपनीसाठी पहिले भांडवल म्हणून वेलूमणी यांनी आपल्या प्रोविडेंट फंड मधून एक लाख रुपये काढले होते व त्यातूनच मुंबईतील भायखळा या भागात चक्क एका गॅरेजमध्ये या कंपनीची सुरुवात झाली.
आपल्या पतीला व्यवसायात आपण देखील मदत करावी याकरता सुमती यांनी आपली स्टेट बँकेतील नोकरी देखील सोडली. वेलूमणी सांगतात “तेव्हा मला महिन्याला दहा हजार रुपये मिळत होते. त्यातून देखील आम्ही दोन हजार रुपये बाजूला टाकत उर्वरित आठ हजारांमध्ये संसार करत होतो. खरंतर मनुष्याच्या गरजा फारच कमी असतात. आपण बहुतांश वेळेला जी खरेदी करतो ती इतरांना दाखवण्यासाठी करत असतो. आपल्या स्वतःच्या वापरासाठी असलेल्या वस्तू फार क्वचित खरेदी करतो” असं ते म्हणतात.
हळूहळू त्यांनी अनेक मशीन विकत घेतले. एका मशिनची कपॅसिटी ३०० तर दहा मशिनची ३००० इतकी कपॅसिटी त्यांच्याकडे तयार झाली. आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करता त्यांनी स्वतः अनेक हॉस्पिटल्समध्ये अनेक डॉक्टरच्या भेटी घेतल्या. ज्या हॉस्पिटलमधून सॅम्पल कलेक्ट करायचं असेल त्यांनी थायरोकेर ऑफिसला कॉल करावा. तो कॉल सुमती यांनी रिसीव्ह करून सॅम्पल कुठून आणायचे आहे याची माहिती वेलूमणी यांना द्यावी. वेलूमणी सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात दिवसभर फिरत व काही ठराविक मिनिटानंतर ऑफिस मधील लँडलाईन वर पीसीओ वरून कॉल करून आणखी कुठल्या सॅम्पल आणायचे आहेत, त्याबद्दलची माहिती घेत.
संपूर्ण मुंबई शहरातील प्रवास हा एकतर लोकल ट्रेनमध्ये असायचा किंवा पायी फिरून असायचा. कारण टॅक्सी त्यांना परवडणारी नव्हती. लहानपणापासूनच गरिबीत राहिल्यामुळे त्यांना पायी चालण्याची अतिशय सवय होती व त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. वाढत्या व्यवसायासाठी आता त्यांना काही कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणार होते. वेलूमणी स्वतः पदवी मिळाल्यावर नोकरीसाठी किती फिरले होते हे त्यांना आठवले. केवळ अनुभव नसल्याने त्यांना नोकरी मिळत नव्हती. अशीच वेळ अनेक तरुणांवर येत असेल व हुशार व चांगले काम करू शकणाऱ्या नारुणांना नोकरी मिळत नाही. आपण तसाच त्रास त्या तरुणांना नाही द्यायचा म्हणून त्यांनी एक नियम घालून घेतला आणि तो म्हणजे केवळ फ्रेशर्स म्हणजे कुठलाही अनुभव नसलेलेच कर्मचारी घ्यायचे. आज देखील थायरोकेअर मध्ये १२०० हुन अधिक कर्मचारी आहेत व त्यातले केवळ २ टक्के कर्मचारीच अनुभवी आहेत.
अवघ्या तीन वर्षांमध्ये व्यवसाय चांगलाच नावा-रुपाला येऊ लागला होता. आणि त्यांच्या ग्राहकांची संख्या देखील वाढत होती. त्यामुळे आता त्यांना आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये थोडा बदल करावा लागणार होता व त्याच आधारावर त्यांनी फ्रॅंचाईजी देण्याचा निर्णय घेतला. देशाच्या विविध भागातील वेगवेगळ्या १५ शहरांमध्ये त्यांनी फ्रेंचायसी द्यायला सुरुवात केली. १९९८ साली पर्यंत कंपनीचा टर्नओवर हा एक कोटी रुपयांहून अधिक पोहोचला होता.
अतिशय माफक दर व योग्य परीक्षण या गुणवत्तेवर आधारित त्यांचा हा व्यवसाय अधिकाधिक वाढत होता. आता ते केवळ थायरॉइड टेस्ट पर्यंत सीमित नव्हते तर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या ते सहजरीत्या करू लागले. भारतभरातील वेगवेगळ्या सेंटर्स मधून सँपल गोळा करून हे मुंबईतील हायटेक लॅब मध्ये आणले जाते व इथेच सर्व सँपल्स ची टेस्टिंग केली जाते.
२०१६ साल पर्यंत दिवसाला ५० हजार टेस्टिंग या लॅब मध्ये होत होत्या. २०१६ मध्ये त्यांनी थायरोकेयर या कंपनीचा आयपीओ म्हणजेच शेअर बाजारात भाग विकून पैसा उभा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वेलूमणी यांच्या पत्नी या पुढाकाराने सर्व कागदपत्रांचा भाग पाहत होत्या. आणि आयपीओला अवघे शंभर दिवस बाकी असताना वेलूमणी यांच्या पत्नी सुमती या कोसळल्या. आजपर्यंत कुठलाही लॉस न बघितलेले वेलुमणी यांना एक मोठा लॉस झाला होता तो म्हणजे त्यांच्या पत्नीच्या रूपात. आयुष्याशी झगडत असतांना खांद्याला खांदा लावून उभी असलेली, सर्व परिस्थितीत सोबत राहून जुळवून घेणारी त्यांची पत्नी सुगीचे दिवस येऊ लागताच साथ सोडून गेली. यातून ते सावरले व पुन्हा आयपीओ कडे लक्ष दिले.
कंपनीच्या आयपीओ ला २०१६-१७ साली ७३ पटीहून अधिकचे सबस्क्रीप्शन मिळाले होते. कंपनीच्या एकूण मालकी हक्कान पैकी ६५% अजूनही वेलूमणी यांच्याकडे आहेत. सामान्य जनतेकडे २० टक्के तर प्रायव्हेट गुंतवणूकदारांकडून पंधरा टक्के आहे.आज कंपनीचे मूल्यांकन साडे तीन हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. आज वेलुमणी यांच्यासोबत त्यांचे बंधू सुंदरराजा व त्यांचा पुतण्या आनंद व पुतणी अमृता हेदेखील कार्यभार सांभाळत आहेत. अवघ्या एक लाख रुपये भांडवल घेऊन सुरू केलेल्या कंपनीचा अवघ्या काहीच वर्षात ५८०० कोटी रुपयांचा वटवृक्ष झाला आहे.
भारतात कोरोना-१९ची सुरुवात होताच त्यांच्या कंपनीने त्वरित पाऊले उचलून या विषाणूच्या तपासणीची तयारी सुरु केली. १ एप्रिल २०२० रोजी कोरोना-१९ परिक्षणासाठी त्यांच्याकडे केवळ पाचशे टेस्ट होऊ शकत होत्या. पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अवघ्या एका महिन्यांमध्ये आपल्या तपासणी सुविधा थेट २० हजार टेस्ट प्रतिदिनपर्यंत नेली. आणि हे सर्व ते अगदी माफक दरात करत आहेत हे विशेष. थायरोकेअर चे फुल्ल बॉडी चेकअप प्लॅन्स देखील लोकप्रिय आहेत. ह्यासाठी तुमच्या घरी येऊन सॅम्पल घेतले जाते व रिपोर्ट देखील घरपोच मिळतो. आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेने थायरोकेअर ने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे.