झिरोधा
शेअर बाजारात गुंतवणूक करणे व त्यातून चांगले उत्पन्न कमवणे ही अनेक लोकांची अनेक वर्षांपासून असलेली एक सुप्त इच्छा असते. पण सर्वच जण असे करू शकत नाही आणि ह्याचे अनेक कारणं आहेत जसे योग्य व पुरेश्या ज्ञानाचा अभाव, योग्य मार्गदर्शन नसणे, ब्रोकरचे चार्जेस व कमिशन जास्त असणे इत्यादी. अनेकदा लोक घाबरतात की मला होणाऱ्या फायद्यापेक्षा ही ब्रोकरला द्यावे लागणारे कमिशन हे जास्त असेल आणि म्हणूनच अनेक जण या बाजारापासून दूर राहणंच पसंत करतात. पण यावर उत्तर शोधून काढलाय आणि यातूनच आपल्या स्वतःचा एक मोठा व्यवसाय सुरू केला आहे नितीन कामत याने.
नितीनचा जन्म १९७९ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात कर्नाटकातील शिमोगा या गावात झाला झाला. नितीनचे वडील सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एक्झिक्यूटिव्ह म्हणून कार्यरत होते. तर आई एक उत्तम वीणा वादक व शिक्षिका होत्या. वडिलांच्या नोकरीनिमित्त अनेक शहरांमध्ये फिरून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामात कुटुंबिय बंगळुरू येथे स्थायिक झालेत. नितीनचे महाविद्यालयीन शिक्षण बेंगळुरू येथेच पार पडले. पण कॉलेजला जायला लागल्यापासून त्याच्या वडिलांनी आपल्या ट्रेडिंग अकाउंटची माहिती नितीन सोबत शेअर करायला सुरुवात केली आणि यामुळे नितीनचे शेअर मार्केट बद्दलचे ज्ञान विकसित होऊ लागले. वयाच्या सतराव्या वर्षीच तो आपल्या वडिलांचे व त्यासोबतच स्वतःचेही ट्रेडिंग अकाउंट सांभाळू लागला.
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना नितीनचे शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करणं सुरूच होतं. कॉलेजमध्ये कमी आणि ट्रेडिंग मध्ये तो जास्त वेळ घालवत होता. यातून त्याला चांगलं यश देखील मिळत होता. पण २००१ साली आलेल्या बाजारातील मंदीमुळे त्याला आपल्या सर्व कमावलेला पैसा गमवावा लागला. एव्हाना त्याचं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालं होतं. आता मात्र त्याच्याकडे ट्रेडिंग करण्यासाठी भांडवलच शिल्लक नव्हते म्हणून त्याने नोकरी करण्याचे ठरवले. नोकरी करतांना देखील मला ट्रेडिंग करता आलं पाहिजे अशा स्वरूपाचीच नोकरी मी करेन असाच निश्चय स्वतःची करून त्याने नोकरी शोधण्यास प्रारंभ केला.
एका कॉल सेंटर मध्ये त्याने नोकरी स्विकारली. कॉल सेंटरमध्ये नोकरी स्विकारण्याचे महत्वाचं कारण म्हणजे तिथे नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट असल्याने दिवसा मला पूर्णवेळ ट्रेडिंग करता येईल व रात्री नोकरी करेल याच आशेवर तो नोकरी करू लागला. आता पुन्हा पूर्वीप्रमाणे नितीन उत्तम प्रकारे ट्रेडिंग करू लागला. त्याने केलेले ट्रेडिंग व कमावलेल्या प्रॉफिटची चर्चा ट्रेडर्स वर्तुळात चटकन पसरली. दिवसा ट्रेडिंग करायचं व रात्री नोकरी करायची हे चक्र सलग तीन वर्ष सुरू होतं. २००४-०५ साली नितीनकडे एक सद्गृहस्थ आले. त्यांनी आपला पैसा नितीनला देऊ केला. या पैशाने नितीनने ट्रेडिंग करावं व त्यांना नफा कमवून द्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्याबदल्यात नितीनला प्रॉफिट शेअरिंग करणार होते. ही नितीनच्या प्रोफेशनल ट्रेडिंग करिअरची सुरुवात होती. याकरता नीतीनने कॉल सेंटरची नोकरी सोडली.
आपल्या पहिल्या क्लायंटला उत्तम प्रॉफिट गेल्यामुळे नितीन लवकरच आणखी काही लोकांनी संपर्क साधला आणि आता त्याच्याकडे अनेक लोकांचा पैसा गुंतवण्यासाठी येऊ लागला. याकरता त्याने रिलायन्स मनी ह्या ब्रोकर्सची एजन्सी घेऊन नितीन आता स्वतः सब ब्रोकर झाला. रिलायन्स मनी सोबत काम करताना त्याने कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण करून दिला. इतर सब ब्रोकरच्या तुलनेत नितीनचा टर्नओवर हा अनेकदा शेकडो पटीत असायचा. त्याच्या परफॉर्मन्समुळे त्याच्या क्लायंट्स व रिलायन्स मनी दोघेही खुश होते. यातून नितीनलाही उत्तम पैसा प्राप्त होत होता.
२००८ साली आलेल्या जागतिक मंदीमुळे भारताच्याही भांडवल बाजाराला मोठा फटका बसला होता. या मंदीच्या काळात आपल्या ग्राहकांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न नितीनने केला. बाजारातील अतिशय बिकट परिस्थितीमध्ये देखील आपल्या ग्राहकांना अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम नितीनने चोख बजावलं होतं. पण हे सर्व करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की लोकांना खरेदी विक्री करताना फार मोठे चार्जेस ब्रोकिंग फर्मला द्यावे लागत आहेत. अनेकदा सांगून देखील रिलायन्स मनी कडून चार्जेस बाबत कुठलाही बदल न केल्यामुळे नितीनने स्वतःची ब्रोकिंग फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.
२०१० साली झिरोधाची स्थापना झाली. झिरोधा या नावातूनच नितीन काही सुचवू इच्छितो. या नावाची फोड जर आपण केलीत तर त्यात ‘झिरो’ म्हणजे शून्य व ‘रोध’ म्हणजे अडसर अशी होते. कुठल्याही सामान्य व्यक्तीला सहजरित्या व कुठल्याही अडथळ्याशिवाय भांडवल बाजारात भाग घेता यावा याकरता कार्य करणारी कंपनी म्हणून झिरोधाला आपली ओळख निर्माण करायची आहे.
कंपनीच्या स्थापनेत नितीन इतकेच महत्व त्याचा भाऊ निखिल याला आहे. निखिल हा देखील एक उत्कृष्ट ट्रेडर असून आपल्या सर्व क्लायंटचे अकाउंट निखिल हाच सांभाळतो. निखिलला रिस्क मॅनेजमेंट चे देखील उत्तम ज्ञान आहे. झिरोधा ही भारतातील पहिली डिस्काउंट ब्रोकिंग फर्म आहे. याचा अर्थ आपण जर झिरोधा मधून शेअरची खरेदी विक्री केली तर त्यावर शून्य ब्रोकरेज लागते. केवळ वायदा बाजारातील खरेदी-विक्रीवर ब्रोकरेज घेतले जाते व ते देखील इतर ब्रोकरच्या तुलनेत अतिशय कमी आहे. अमेरिकेत डिस्काउंट ब्रोकर यांच्याकडे ८० टक्केहून अधिक व्यवसाय असला तरी भारतात पहिल्यांदाच डिस्काउंट ब्रोकरची संकल्पना कामत बंधूंनी आणली.
अतिशय कमी ब्रोकरेज मध्ये सेवा देत असून देखील अनेक अडचणींना झिरोधाला तोंड द्यावे लागते. झिरोधा समोर सर्वात मोठे आव्हान होते ते लोकांचा विश्वास संपादन करण्याचे. कारण इतक्या कमी ब्रोकरेजमध्ये सेवा पुरवत आहेत. याचा अर्थ यात काहीतरी फसवणुकीची शक्यता असेल किंवा सेवाच चांगली नसेल. लोकांच्या या विचारसरणीला खोटे ठरवून त्यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. पण जसा ग्राहकांचा विश्वास संपादन होत गेला तसं ग्राहकांनी देखील झिरोधाला मोठे होण्यात तितकीच मदत केली. पहिल्या तीन वर्षातच जाहिरातीवर एकही रुपया खर्च न करता तीस हजार ग्राहकांना जोडले व पाच हजार कोटी रुपये पर्यंतचे टर्नओवर केले.
झिरोधाच्या असलेल्या कमी ब्रोकिंग चार्ज सोबतच त्यांचे उत्कृष्ट सेवा व एनलिसिस करण्यासाठी लागणारे उत्तम सॉफ्टवेअर व ॲप्स यामुळे ग्राहकांच्या पसंतीस खरे ठरले. झिरोधा ने भारतात पहिल्यांदाच प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हातात खरेदी विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यापुर्वी तुम्हाला त्यासाठी आपल्या ब्रोकरच्या ऑफिस मध्ये बसून किंवा फोन करून या सूचना द्याव्या लागत होत्या.
झिरोधाच्या काईट नावाच्या अँप वर कुणीही अगदी सहज ट्रेड करू शकता. या एकाच अँप वरून शेअर, कमोडिटी, करन्सी सर्व प्रकारच्या वित्त साधनांमध्ये ट्रेड करता येतो. अकाऊंट ऑनलाइन उघडून त्यात पैसे देखील ऑनलाईन टाकता किंवा काढता येतात. पण केवळ सॉफ्टवेअर चांगले असून उपयोग नाही तर त्यासाठी तुमच्याकडे पुरेसे ज्ञान असायला हवे. आणि म्हणूनच नितीन कामत व निखिल कामत यांनी आपल्या या वेबसाईटवर व्हेअर सिटी नावाची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यात ट्रेड करण्यासाठी व त्याच्या ऍनॅलिसिस करण्यासाठी लागणारे सर्व चार्ट इंडिकेटर यांची माहिती व त्याचा उपयोग कसा करायचा या बद्दलचे ज्ञान अतिशय सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरुवातीच्या काळात जरी फार व्यवसाय मिळत नसला तरी आज दहा वर्षानंतर झिरोधा भारतातील पहिल्या पसंतीचे व सर्वात जास्त टर्नओव्हर असलेले ब्रोकिंग फर्म म्हणून नावाला आले आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या एकूण व्यवहारात पैकी दोन टक्के व्यवहार हे केवळ झिरोधा देत आहे. दिवसाला १५ लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या या कंपनीचे २०१९-२० सालचे प्रॉफिट हे साडेतीनशे कोटी रुपयांहून अधिक नोंदवले गेले आहे. नितीन कामत व निखील कामत या दोघांसह साधारण ८० ते १०० कर्मचाऱ्यांना यांना सोबत घेऊन आज कंपनीचे व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन एक अब्ज डॉलर हून अधिक आहे. आणि विशेष म्हणजे हा टप्पा गाठण्यासाठी त्यांनी आजवर कोणाचीही आर्थिक पाठबळ स्वीकारले नाही. त्यामुळे केवळ स्वतःच्या हिमतीवर व स्वतःच्या पैशाने उभी केलेली ही कंपनी आज दिवसागणिक नवे रेकॉर्ड निर्माण करत आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी व सर्वात जास्त व्यवसाय निर्माण करणारी ब्रोकिंग फर्म म्हणून आज झिरोधा ओळखली जाते. आणि विशेष म्हणजे आपल्या या गुणवैशिष्ट्यांचा जोरावर झिरोधा कडे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.
(टीप: भांडवल बाजारात गुंतवणूक करणे हे अतिशय जोखमीचे ठरू शकते त्यामुळेच संपूर्ण ज्ञान व अभ्यास केल्याशिवाय व योग्य आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करू नये. या लेखाद्वारे केवळ झिरोधा या स्टार्टअपची यशोगाथा देण्याचा प्रयत्न आहे. यातून कोणाही वाचकाला भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणे किंवा परावृत्त करणे असा कुठलाही उद्देश नाही.)