फ्लिपकार्ट
देशातील आघाडीची ई कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टची वाटचाल अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. दुकानात जाऊन शॉपिंग करणाऱ्यांना घरपोच खरेदी आणि वस्तू मिळण्याची सुविधा देणारे हे स्टार्टअप आजच्याघडीला अतिशय अग्रगण्य आहे. या स्टार्टअपची ही अनोखी यशोगाथा…
शॉपिंग करायला जाणे हा एके काळचा लोकांचा छंद असायचा. ती बाजारातली गर्दी… सणासुदीला नवीन वस्तूंसाठी लागलेली रीघ… त्यासाठी संपूर्ण एक दिवस जरी दिला तरीही वेळ पुरत नसे… त्यात दुकानदारासोबत केलेली घासाघीस व ती करून बचत केल्याचा आनंद… हे सर्व मात्र आता कालबाह्य झालंय…
२००७ पर्यंत तर कुणी कल्पनाही केली नव्हती की शॉपिंग करण्याच्या पद्धतीमध्ये इतका चमत्कारिक बदल घडेल आणि ही सर्व प्रक्रीया केवळ एका अॅप वरून करता येईल. पण आज ते सर्व शक्य आहे. भारताला ऑनलाइन शॉपिंगची सवय लावली ती फ्लिपकार्टने.
सचिन बन्सल आणि बिनी बन्सल (आडनावामुळे जरी वाटत असले तरी हे दोघे भाऊ नाहीत) आयआयटी दिल्ली मध्ये आपले बी. टेक. चे शिक्षण पूर्ण करत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वजण आपल्या घरी गेले होते. केवळ काही जणांना आपले प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केले नसल्यामुळे सुट्टी मिळाली नव्हती. त्यात सचिन व बिनी यांचाही समावेश होता. गंमतीने असेही म्हटले जाते की, जर हे दोघे प्रामाणिक विद्यार्थी असते आणि त्यांनी आपला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला असता, तर कदाचित फ्लिपकार्ट जन्मालाच आले नसते. एकाच लॅब मध्ये प्रोजेक्ट करत असलेले सचिन व बिनी यांची तेव्हा भेट झाली. आणि एकाच ठिकाणी अनेक दिवस काम केल्यामुळे मैत्रीही झाली.
दोघेही आपली डिग्री पूर्ण करून नोकरी निमित्त बंगळुरूला आले. दोघेही वेगवेगळ्या कंपनीत जॉब करू लागले. काही काळ काम करून सचिनला २००६ मध्ये ऍमेझॉन मध्ये संधी मिळाली. बिनीने देखील ऍमेझॉन मध्ये प्रयत्न केला आणि तो ही २००७ मध्ये जॉईन झाला. तेव्हा ऍमेझॉन ही कंपनी जरी भारतात असली तरी ती भारतात विक्री करत नव्हती.
पण अवघ्या काही महिन्यातच दोघेही कामातील तोच तोच पणाला कंटाळले आणि डोक्यात विचारांचं काहूर माजलं. काय करता येईल? नोकरी बदलली तरी परिस्थिती फार बदलणार नाही. कामात नाविन्य असायला हवं. कामात आनंद देखील वाटला पाहिजे. किती दिवस आपली बुद्धिमत्ता आणि मेहनत दुसऱ्यासाठी काम करण्यात लावायची. काही तरी स्वतःच करायला हवं. आणि दोघेही पर्याय शोधू लागले. ऍमेझॉन मध्ये असल्याने त्यांची इ-कॉमर्स मध्ये रुची वाढली होती. म्हणून एक वेबसाईट तयार करण्याचा विचार त्यांनी केला. या वेबसाईटवर तुम्ही कुठल्याही प्रॉडक्ट्सची माहिती व त्या प्रॉडक्ट्सच्या वेगवेगळ्या इ-कॉमर्स साईट्स वरील किमती व उपलब्धता तपासू शकता. या करता त्यांचा अभ्यास सुरु झाला. त्यांनी अनेक इ-कॉमर्स साईट्स बघितल्या. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सर्वच भारतीय साइट्स फारशा मोहक किंवा ग्राहकाला खिळवून ठेवतील अशा नाहीत. आणि कुठल्याही ग्राहकाला त्या साईट्स वरून शॉपिंग करावी असे कदाचितच वाटेल. बाजारात असलेल्या साईट्सच्या तुलनेत आपण नक्कीच चांगली साईट बनवू शकतो हा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. तंत्रज्ञानाच्या बाबतीत दोघेही तज्ज्ञ होते. पण व्यवसाय हा केवळ तुमच्या ज्ञानामुळे होत नाही तर तुमच्या निर्णय क्षमतांमुळे होतो हे त्यांना हळूहळू लक्षात येऊ लागले. फार वेळ वाया न घालवता दोघांनी लगेचच आपली नोकरी सोडली आणि सप्टेंबर २००७ साली फ्लिपकार्टची स्थापना झाली. दोघांनी आपल्या बचतीमधून एकूण ४ लाख रुपये जमवले आणि हेच होते त्यांचे पहिले भांडवल.
व्यवसायाची घडी बसवतांना फार क्लिष्ट होऊ नये म्हणून त्यांनी सुरुवातीला फक्त पुस्तके ऑनलाइन विकायचे ठरवले. पुस्तके निवडण्यामागे मुख्य कारण म्हणजे त्याचे विक्रेते सहज उपलब्ध होतात, फार व्हरायटी नसते, यादी प्रमाणात असेल व वाहतुकीला देखील सोपे. आणि यामुळे खर्च देखील कमी होईल अशी अपेक्षा होती. पण २००७ साली व्यावसायिकांना ऑनलाइन बिझनेसचे महत्व पटवून देणे व त्यांचा विश्वास मिळवणे हे जणू शिवधनुष्य पेलण्या इतकेच कठीण काम होते. विक्रेते त्यांच्या या कल्पनेवरच विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण हे दोघेही दृढ निश्चय करूनच व्यवसायात उतरले होते आणि त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. फार प्रयत्नांनंतर त्यांना काही विक्रेत्यांना आपलंस करण्यात यश आलं. तेव्हा कुठे ऑक्टोबर २००७ साली त्यांनी आपली वेबसाईट लॉन्च केली.
ऑक्टोबर महिन्याअखेर त्यांना आपली पहिली ऑर्डर मिळाली. मेहबूबनगर, तेलंगाणा (तेव्हाचे आंध्र प्रदेश) येथील एका तरुणाने ही ऑर्डर केली होती. व्यवसायाची पहिली-वहिली ऑर्डर मिळाल्याने त्यांना फार आनंद झाला होता पण तो आनंद फार काळ टिकणारा नव्हता. कारण ऑर्डर पुरवण्यासाठी जेव्हा विक्रेत्याला सांगितले तेव्हा ते पुस्तक उपलब्ध नसल्याचे विक्रेत्यानी सांगितले. आपली पहिलीच ऑर्डर फेल झाली तर बाजारात नाव खराब होईल. म्हणून सचिन व बिनी दोघेही तडक बाहेर निघाले. संपूर्ण बंगळुरू धुंडाळून काढल्यानंतर त्यांना ते पुस्तक मिळवण्यात यश आलं. त्या पुस्तकाची डिलिव्हरी दिल्यानंतर मात्र ते आता अधिक सतर्क झाले. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी केलेल्या आटोकाट प्रयत्नात त्यांची व्यासासायाबद्दलची समर्पण भावना दिसून येते. खरं तर त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट होते. त्यांना एक चांगली सर्व्हिस देणारी इ-कॉमर्स कंपनी व्हायचं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ग्राहकाचे पूर्ण समाधान होणे अत्यंत गरजेचे होते. नाहीतर अश्या अनेक कंपन्या बाजारात होत्या ज्या वस्तू तर विकत होत्या. पण ग्राहकांच्या सुविधेचा विचार करत नव्हत्या. २००७ च्या अखेर पर्यंत त्यांनी अजून २० ऑर्डर्स पुरविल्या.
पुढच्या सहा महिन्यातच कंपनी नफ़्यात आली. त्या जोरावर त्यांनी एक फ्लॅट भाडे तत्वावर ऑफिससाठी घेतला. दिवसागणिक त्यांचा व्यवसाय वाढत होता. कंपनी मध्ये हे दोघेच असल्याने वेबसाईट सांभाळणे, ऑर्डर्स मिळवणे, पुस्तकांची डिलिव्हरी पहाणे, विक्रेत्यांशी संवाद, ही सर्व कामं त्यांनाच पाहावी लागत होती. पण याचा फायदा असा की व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे बारीक लक्ष होते. आणि त्यामुळेच त्यांची प्रगतीही तितकीच झपाट्याने होत होती. २००९ च्या अखेरीस त्यांनी ४ करोड रुपयांची पुस्तके विकली होती. आता फ्लिपकार्ट हे वाचकांच्या मनात घर करू लागलं होतं. तसेच त्यांच्या वाढत्या व्यवसायाकडे गुंतवणूकदारांचे देखील लक्ष लागले होते. २००९ मध्ये एक्सएल पार्टनर्स यांनी सुमारे ८ करोड रुपयांची गुंतवणुक केली. या गुंतवणुकीच्या जोरावर, फ्लिपकार्ट ने आता विस्तार करायला सुरुवात केली. २००९ अखेरीस आता त्यांच्याकडे भारतातील वेगवेगळ्या शहरात ३ ऑफिस थाटले होते आणि आता त्यांचा संसार हा १५० कर्मचाऱ्यांचा झाला होता.
त्यांच्या ह्या गतीला प्रमुख कारण होते ते म्हणजे सचिन-बिनी ह्या दोघांमधले कोऑर्डिनेशन. सचिन हा नव-नवीन कल्पना मांडत तर बिनी त्या कल्पनांना उतरवण्यासाठीचे सर्व व्यवस्थापन करत. भारतातील ऑनलाइन बाजारपेठ हळूहळू वाढत होती पण अजूनही ऑनलाइन खरेदीसाठी अनेकजण बिचकतच होते. आणि म्हणून फ्लिपकार्टने २४*७ कस्टमर केअर सुरु केले. सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर देऊ लागले आणि विश्वास संपादन करू लागले. २०१० साली त्यांना टायगर ग्लोबल कडून ८० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. या गुंतवणुकीमुळे फ्लिपकार्टला पंख पसरण्यास आकाश मोकळे झाले. आणि आतापर्यंत केवळ पुस्तके विकणाऱ्या फ्लिपकार्टने इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं. २०१० साली फ्लिपकार्टवर मोबाईल फोन मिळू लागले.
काही महिने उलटून गेले, पुस्तकांची विक्री तशीच चालू होती पण मोबाईल फोन मात्र विकले जात नव्हते. हा मोठा चिंतेचा विषय झाला. तातडीने मिटींग्स घेण्यात आल्या. ग्राहकांचे सर्वे करण्यात आले. बाजाराचा अभ्यास केला. तेव्हा असे लक्षात आले की लोक २००-५०० रुपयांची खरेदी ऑनलाइन सहज करू शकतात, पण जेव्हा मोठ्या रकमेचा विषय येतो तेव्हा ऑनलाइन पेमेंट करतांना लोक मागे सरकतात. त्यात मोबाईल फोन सारखी वस्तू घेतांना तिच्या लूक्स अँड फील बद्दल म्हणजे ती हातात घेऊन बघितल्याशिवाय निर्णय घेत नाहीत. यासाठी विचार मंथन करण्यात आलं आणि काही मोठे निर्णय घेण्यात आले. त्यातला इ-कॉमर्स साठी पहिल्यांदाच घेतलेला निर्णय, तो म्हणजे “कॅश ऑन डिलिव्हरी”. वस्तू तुमच्या हातात मिळाल्यानंतरच पैसे द्या. या निर्णयाने तर भारतातील इ-कॉमर्स ची संपूर्ण सिस्टिम बदलून टाकली. या निर्णयाचा काही अंशी फायदा झाला. याच निर्णयाला पूरक घेतला गेलेला दुसरा निर्णय. आणि तो होता रिटर्न पोलिसी – “खरेदी केलेली वस्तू न आवडल्यास १५ दिवसात तुम्ही ती परत पाठवू शकता. त्या बदल्यात तुम्हाला दुसरी वस्तू मिळेल किंवा पैसे परत मिळतील.” या निर्णयाने मात्र फ्लिपकार्टचा खर्च हा तिपटीने वाढणार होता. वस्तू ग्राहकाकडे पोहोचवणे, ती परत आणणे व पुन्हा दुसरी वस्तू पोहोचवणे यात वाहतुकीचा खर्च हा त्या वास्तू मधून मिळणाऱ्या नफ्याहून अधिकच होता. पण लोकांची विश्वासार्हता मिळवण्यासाठी हे गरजेचं होतं.
आणि या आयडियाने जबरदस्त काम केलं. आतापर्यंत घाबरून फ्लिपकार्ट न वापरणारे देखील बिनधास्तपणे फ्लिपकार्ट वरून शॉपिंग करू लागले. कंपनीला अपेक्षेपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळू लागल्या. २०११ मध्ये कंपनी १९% विकास दराने वाढू लागली. २००९ मधील ४ करोड रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत २०११ मध्ये ७५ करोड रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता फ्लिपकार्ट थांबायला तयार नव्हते, तसा वेळही नव्हता. त्यांच्या प्रगती सोबतच त्यांचा नफा वाढत होता. त्यांना जगभरातून गुंतवणूक मिळत होती. २०१२ मध्ये ९०० करोड रुपयांहून अधिकची गुंतवणूक मिळाली होती. आणि त्याकाळात इतकी गुंतवणूक मिळवणारी फ्लिपकार्ट केवळ दुसरी स्टार्टअप होती. सचिन आणि बिनी आता देशाच्या स्टार्टअप क्षेत्राची ओळख झाले होते.
जगातील सर्वात मोठ्या इ-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनची एन्ट्री २०१३ साली भारतात झाली. अनेक देशात आपले साम्राज्य स्थापन केलेल्या ऍमेझॉनशी स्पर्धा करणं कितपत शक्य होईल याची शाश्वती कुणालाच नव्हती. पण सचिन आणि बिनीला आपल्या कामावर विश्वास होता. आपल्या ग्राहकांचा विश्वास देखील त्यांनी संपादन केला होता. भारतीय कंपनी असल्याने व अगदी शून्यातून जग निर्माण केलं असल्यामुळे त्यांना भारतीय ग्राहकांची मानसिकता व ह्या व्यवसायातल्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचा पूर्ण अंदाज आला होता. त्यात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या गुंतवणूकदारांची. आधीच गुंतवणूक केलेले एक्सएल पार्टनर्स व टायगर ग्लोबल यांनी फ्लिपकार्टवर अधिक विश्वास दाखवत त्यांनी १४०० करोड रुपयांची गुंतवणूक केवळ २०१४ मध्ये केली. या पाठबळावर फ्लिपकार्टने त्वरित मिन्त्रा व जबॉन्ग या दोन फॅशन इ-कॉमर्स कंपन्या विकत घेतल्या. त्यामुळे आता फ्लिपकार्टने कपडे व सर्वच फॅशन संबंधित गोष्टींमध्ये देखील व्यवसाय करू लागले.
खरंतर स्वतः फॅशन प्रॉडक्ट्सचा व्यवसाय ते उभा करू शकले असते व ते त्यांना स्वस्त देखील झाले असते, पण आता त्यांच्या कडे तितका वेळ नव्हता. त्यांनी जर दिरंगाई केली असती तर ऍमेझॉनने त्यांना केव्हाच बाहेर फेकून दिले असते. म्हणून त्यांनी ह्या दोन्ही कंपन्या विकत घेऊन आपले पाय भक्कम रोवले. आता फ्लिपकार्टला प्रॉडक्ट्सची मर्यादा राहिली नव्हती आणि त्यामुळे त्यांचे उत्पन्न हे वाढतच होते. आता फ्लिपकार्टकडे भारतातील इ-कॉमर्स पैकी ६० टक्के व्यवसाय होता. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे ऍमेझॉनच्या एंट्रीमुळे देखील फ्लिपकार्टच्या उत्पन्नात फरक पडला नाही, उलट वाढच झाली. २०१८ अखेरीस ऍमेझॉन ने ३१% बाजार जरी काबीज केला असला तरी ३९% बाजार अजूनही फ्लिपकार्ट कडे आहे.
अर्थात फ्लिपकार्टच्या सर्वच निर्णय बरोबर ठरत गेले असं नाही. २०११ साली त्यांनी एक ऑन लाइन म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी विकत घेतली होती. पण पायरसीमुळे तो निर्णय सपशेल फेल झाला. तसेच फोनपे व पेटीएम पूर्वी त्यांनी पेझिपी नावाचे पेमेंट गेटवे सुरू केला होता. पण व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे तोही व्यवसाय त्यांना नुकसानीतच बंद करावा लागला.
९ मे २०१८ रोजी जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेन ‘वॉलमार्ट ‘ ने फ्लिपकार्ट मधील ७७% भाग विकत घेऊन फ्लिपकार्ट ला खरेदी केले. भारतीय तरुणांनी सुरु केलेले भारतातले सर्वात मोठे इ-कॉमर्स आता भारतीय मालकीचे उरले नाही. हा व्यवहार होण्यामागचे खरे कारण अधिकृतरित्या कळू शकले नाही. काहींच्या मते फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन यांच्यातील स्पर्धेमुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट, ऑफर्स या करता दोन्ही कंपन्याचा खूप पैसा खर्च होत होता. त्या सोबतच अनेक नव्या इ-कॉमर्स कंपन्याही बाजारात येत होत्या. या सर्व स्पर्धेमुळे फ्लिपकार्टला आता कॅश म्हणजेच पैश्याची कमतरता भासू लागली होती. ऍमेझॉन जागतिक पातळीचा खेळाडू असल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे टिकाव धरुन ठेवणं फ्लिपकार्टला आता मात्र अवघड होत होतं. काहींच्या मते कंपनीच्या प्रोमोटर्स मधेच काही मतांतर होते ज्याचा परिणाम व्यवसायावर झाला आणि म्हणून त्यांनी वेगळे होणेच स्वीकारले. कारण काहीही असो पण सत्य हेच आहे की फ्लिपकार्टला वॉलमार्ट ने १६ बिलियन डॉलर्स मध्ये विकत घेतले.
सचिन बन्सलने आता नेव्ही टेक्नॉलॉजिस नावाची एक फायनान्स टेक्नॉलॉजीची कंपनी स्थापन केली तर बिनी हा नवीन स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या तरुणांना सेटअप करण्यात आपल्या एक्स टू टेन एक्स टेक्नॉलॉजी या कंपनीमार्फत मदत करत आहे. फ्लिपकार्टला मात्र आता एक बलाढ्य पालक मिळाला असून त्यांना आता पैश्याचा तुटवडा कधीच भासणार नाही. उलटपक्षी आता फ्लिपकार्टसाठी जगातील नवे बाजार खुले झाले आहे.