छंदालाच आपले करिअर बनवणाऱ्या व त्यातून अनेक व्यवसाय निर्माण करणाऱ्या मध्यमवर्गीय तरुण विशाल गोंडल याची ही यशस्वी कहाणी…
आपण अनेकदा ऐकतो की जर तुम्ही तुमच्या छंदाला तुमचे करिअर बनवले तर काम हे काम न वाटता तेही छंदच होऊन जाते. आणि ही जीवनाची कल्पना सत्यात उतरवून दाखवली आहे विशाल गोंडल याने. मुंबईच्या एका माध्यमवर्गीय कुटुंबात विशालचा जन्म १९७६ साली झाला. घरच्यांनी चांगल्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यामुळे विशालला शालेय शिक्षणासोबतच कालानुरूप आवश्यक सर्वच शिक्षण देण्याचा प्रयत्न त्याच्या पालकांचा होता. त्यासाठीच त्यांनी ८०च्या दशकात आर्थिक ओढाताण सहन करून एक कॉम्प्युटर घेऊन दिला. विशालला मुळातच खेळात विशेष रुची होतीच. म्हणूनच त्याला कॉम्प्युटरवरील गेम्स देखील आवडू लागले. अर्थात हा काळ होता ८०च्या दशकातला. तेव्हाचे कॉम्प्युटर गेम्स देखील सीआरटी स्क्रीनवरील ब्लॅक अँड व्हाईट होते. पण या सगळ्यामागचे शास्त्र जाणून घेण्यात विशालला अधिक रुची होती. विशालचे कुतूहल या गेम्सच्या निर्मितीबद्दल होते. या मागचे शास्त्र अभ्यासायला त्याने सुरुवात केली. गेम्स आणि प्रोग्रामिंग बद्दल त्या काळात फारशी माहिती मिळत नव्हती. पण विशालने चिकाटी सोडली नाही आणि त्या संबंधित पुस्तके तो वाचू लागला. आणि या अभ्यासाच्या जोरावर त्याने चक्क एक गेमच तयार केला.
विशालचे कॉम्प्युटर आणि गेम प्रोग्रामिंगवरचा हात इतका सफाईदारपणे बसला होता की त्याला इयत्ता आठवीमध्ये असतांना एक बँकेचा प्रोजेक्ट देखील मिळाला होता. साधारण त्याच वर्षात, म्हणजे वायाच्या १३व्या वर्षात त्याने “आय लव इंडिया” नावाचा एक गेम तयार केला होता. हा गेम प्रचंड गाजला कारण यात चक्क भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धावर आधारित होता. आणि या गेमचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्ही जिंकण्यासाठी पाकिस्तानचे सर्व सैन्य मारल्यानंतर त्यांचा मेजर व स्वतः नवाज शरीफ यांना देखील मारू शकत होते. हा गेम त्या काळात फार लोकप्रिय झाला. अगदी भारतीय लष्कराकडून देखील याची दखल घेण्यात आली होती. यामुळे त्याचा आत्मविश्वास अधिकच बळावला.
नंतर त्याने आपली गेमिंग मधली प्रगती सुरूच ठेवली. त्याने आता चांगले प्रोजेक्ट देखिल केले. एकदा तर त्याने एक अनोखा गेम बनवला. या गेम मध्ये ठार करण्याचे टार्गेट होते “कोका कोला”च्या बाटल्या. आणि हा गेम त्याने जाऊन पेप्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दाखवला. त्या काळात पेप्सी आणि कोक यांच्यातील स्पर्धा अतिशय शिगेला पोहोचली होती. त्यांना हा गेम इतका आवडला की त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना तो देण्याचे ठरवले आणि न मागता विशालला सहा लाख रुपये दिले. यावेळी त्याचे वय होते अवघे १६ वर्षे.
अशा प्रसंगांमधून त्याला या क्षेत्रातील संधी आणि व्यवसायवाढीची क्षमता याबद्दल कल्पना आली. वयाच्या सोळाव्या वर्षीच आपल्या घरातील अडगळीच्या खोलीत त्याने कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केले. या इन्स्टिट्यूटमध्ये तो आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असे. ही इन्स्टिट्यूट चालवत असतांना त्याने फॅक्ट नावाची आयटी कंपनी स्थापन केली. ही कंपनी अनेक प्रोग्रामिंगचे प्रोजेक्ट घेऊ लागली. आणि आता विशालला चांगले पैसे देखील मिळू लागले. प्रोग्रामिंगच्या जोरावर हे सर्व मिळत असतांना देखील त्याची पहिली पसंती ही गेमिंगच होती. त्यामुळे त्याने आता कंपन्यांसाठी नव-नवीन गेम्स तयार करायला सुरुवात केली.
आपल्या कर्मचाऱ्यांना गेम्सच्या माध्यमातून शिकवणे व एंगेज ठेवणे ही बाब कंपन्यांना देखील फारच भावली. आणि म्हणून विशालला अनेक गेम्सच्या ऑर्डर मिळू लागल्या. आता त्याची लोकप्रियता वाढतच होती. शालेय शिक्षण पूर्ण करून आता विशाल ने आर. ए. पोतदार महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतरही विशालचे पूर्ण लक्ष केवळ गेम्स तयार करण्याकडे होतं. त्याने एक नवीन कंपनी खास गेम्स तयार करण्यासाठी स्थापन केली. या कंपनीला नाव देण्यात आले ‘इंडिया गेम्स’.
एके दिवशी विशाल आपल्या ऑफिस मध्ये अगदी बरमुडा आणि टी शर्ट घालून बसलेला होता. त्याचवेळी अचानक दोन सद्गृहस्थ टाय सूट घालून आले आणि विशालला भेटायला. परिचय झाल्यानंतर असे लक्षात आले की, दोन व्हेंचर कॅपिटॅलिस्टकडून ते आले होते आणि इंडिया गेम्स मध्ये गुंतवणूक करू इच्छित होते. विशालसाठी हे फारच अनपेक्षित होतं, म्हणून त्याने विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला. या सर्व गोष्टी बद्दलचे ज्ञानही फार कमी होते म्हणून आपल्या वडिलांना मार्ग विचारला. त्याच्या वडिलांच्या मते जे काही करायचं ते स्वबळावर करावे. कर्ज काढून व्यवसाय करण्यात काही अर्थ नाही. हे उत्तर विशालने व्हेंचर कॅपिटलिस्टना दिले. त्यावर व्हेंचर कॅपिटल म्हणाले आम्ही तुला कर्ज देणार आहोत पण ते तुला कधीही परत फेडायचे नाही. त्या बदल्यात फक्त तू आम्हाला तुझ्या कंपनीतील भाग देणार आहेस. हे ऐकून विशालला हायसं वाटलं आणि त्याने हे प्रपोजल स्वीकारलं. आता विशालकडे पैसा खेळायला लागला. आणि आपल्या पाच सहकाऱ्यांच्या मदतीने इंडिया गेम्स आता मोठे स्वप्न पाहू लागले.
हे सर्व सुरू असताना विशाल प्रोग्रामिंग मध्ये देखील अग्रेसर होता. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सी प्रोग्रामिंग या स्पर्धेमध्ये त्यांने उत्तम क्रमांक पटकावला. यासोबतच तो अनेक खेळ खेळत असे. व्हॉलीबॉल मध्ये तर त्याने चक्क नॅशनल लेव्हल पर्यंत मजल मारली होती. पण कामाच्या व्यापामुळे त्याच्याकडे आता इतका सर्व करण्यासाठी वेळ पुरत नव्हता आणि म्हणून अगदी अखेरच्या वर्षाला असताना देखील त्याने कॉलेजमधील शिक्षण बंद करण्याचे ठरवले आणि केवळ एक वर्ष बाकी असताना त्याने आपली डिग्री गमावली.
कंपनीचा विस्तार चांगला सुरू होता. सगळं काही सुरळीत असताना २००० साली अचानक डॉट कॉम बस्ट फुटला. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या संबंधित सर्वच कंपन्या अडचणीत आल्या. त्यात इंडिया गेम्स काही वेगळी नव्हती. सर्वच काम थांबलेत, काम पूर्ण झालेले देखील पैसे मिळत नव्हते, नवीन येणाऱ्या ऑर्डर्स कमी झाल्या होत्या. २००१ मध्ये या फसलेल्या चक्रातून बाहेर पडण्याकरता विशालने एक धाडसी पाऊल उचलण्याचे ठरवले. त्याकाळी मोबाईलचे इन्कमिंग व आउटगोइंग चे रेट्स अगदी ८ ते १६ रुपये प्रति मिनीट होते. त्यामुळे मुळातच मोबाईल फोनचा वापर अतिशय कमी होता. तरीही विशालने आपल्या जवळचे वीस लाख रुपये लावून मोबाईल गेमिंग डेव्हलप केले. आणि नशिबाचा भाग म्हणा की कर्म सिद्धांत पण २००० च्या दशकात मोबाईलची संख्या अधिक अधिक वाढू लागली. विशाल नी तयार केलेल्या गेम्सला प्रचंड मागणी येऊ लागली. २००५ सालापर्यंत भारतातील मोबाईल गेमिंग क्षेत्र फार झपाट्याने वाढू लागले होते आणि यात अग्रेसर होते ते इंडिया गेम्स. भारतातील एकूण मोबाईल गेम्स पैकी ६० टक्के मोबाईल गेम्स हे इंडिया गेम्स ने बनवलेले असत.
त्याच वर्षी विशाल गोंडल ने एक घोषणा केली की, इंडिया गेम्स या कंपनीचा ७६ टक्के भाग हा टॉम ऑनलाइन या कंपनीला विकला आहे. २००७ साली युटीव्ही कम्युनिकेशन्स कंपनीने एक मोठा भाग खरेदी करून आता विशालच्या कंपनीचा ९० टक्के हून अधिक भाग हा परकीय मालकीचा झाला. पण इतके होऊनही कंपनीचा सीईओ हा मात्र विशाल गोंडल राहिला. आणि अखेरीस डिस्नी एंटरटेनमेंट ने संपूर्ण कंपनी इंडिया गेम्स विकत घेतली. त्यावेळेला कंपनीचे मूल्यांकन दहा कोटी डॉलर्स इतके करण्यात आले होते.
डिस्नी कंपनीने युटीव्ही कम्युनिकेशन म्हणजेच पर्यायाने खरेदी केल्यानंतर मात्र विशालला शांत बसवत नव्हते. विशालला सतत खेळांचा छंद होता. मैदानी खेळ त्याला खेळायला फार आवडतात. आज देखील काही जण सांगतात की, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर रोज सकाळी लाल टी शर्ट, लाल रंगाचे बूट घालून विशाल लोकांना धावताना दिसतो. आजपर्यंत विशालने अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
२००८ साली विशालने स्वेट अँड ब्लड वेंचर ग्रुप सुरू केला. यातील सर्वच सदस्य मोठमोठे गुंतवणूकदार आहेत. अवघ्या तीस वर्षांमध्ये इतकी कमाई केली, आर्थिक अडचणीमुळे एखादा चांगला बिझनेस मोठा होण्यापासून वंचित राहू नये याकरता या व्हेंचर कॅपिटल कंपनीची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत लोकांना व्यवसायासाठी उद्योगासाठी लागणारे भांडवल सहज उपलब्ध करून दिले जाते तेही बिनव्याजी व पैशाची परतफेड करण्याची आवश्यकता नाही. त्या बदल्यात केवळ कंपनीचा काही भाग द्यावा लागतो. गेमा इंटरटेनमेंट, डॉग्न्स्ट, ब्लॉग्स व किको या चार कंपन्यांना विशालने गुंतवणूक पुरवली आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे विशालला मुळातच फिटनेस व स्पोर्ट्स यात विशेष रुची होती. एकदा जीममध्ये असताना त्याने एक स्मार्टवॉच घातले होते की ज्यामध्ये तुम्ही चाललेले अंतर समजते. यासोबतच आपल्या ट्रेनरशी चर्चा करत असताना विशालच्या असं लक्षात आलं की, ती बाजारात उपलब्ध असलेले फिटनेस गॅजेट्स हे केवळ लोकांनी विकत घेणे इतकेच मर्यादित आहेत अनेक लोक नव्याचे नऊ दिवस असा व्यायाम सुरू करतात आणि हळूहळू त्यांचा उत्साह ढासळतो. म्हणूनच विशालने स्वतःच्या अनुभवातून शिकून लोकांना उपयुक्त व त्यासोबतच परवडणारे असे हेल्थ रिलेटेड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. संपूर्ण फोकस क्वॉलिटी आणि ग्राहकाचे समाधान यावर दिल्या कारणाने विशालच्या कंपनीकडे रिपीट कस्टमर्स म्हणजे एकदा येऊन पुन्हा परत घ्यायला येतात.
गो-की नावाची कंपनी रजिस्टर झाली आहे. या कंपनीची स्थापना चक्क कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आली. स्वतःचे खेळांप्रतीचे प्रेम व त्यात असलेला उत्साह याचा प्रत्यय या व्यवसायात पडल्यानंतरच होईल. विशालच्या मते, जर तुम्हाला जीवन मूल्य शिकायचे असतील तर आपल्या मुलांना खेळ खेळायलाच लावा. कारण खेळांमधून त्यांना स्पर्धा म्हणजे हे समजेल, लोकांशी जुळवून घेणे, अपयश पचवणे असे अनेक गुण खिलाडू वृत्तीच्या माणसाकडे दिसतात.
गो-की हे अॅप तुम्हाला पूर्ण फिट केल्याशिवाय शांत बसणार नाही. यात पहिला व्हिडिओ जनरल माहितीचा आहे. या अंतर्गत कंपनीने अनेक गॅजेट्स बनवले आहेत. याद्वारा तुम्ही अनेक गॅजेट्स कनेक्ट करू शकता. सकाळी उठल्यापासून ध्यानासाठी बसणे, सूर्यनमस्कार करणे, व्यायाम करणे, आरोग्यासाठीचे व्हिडिओ लेक्चर्स, याच विषयाशी संबंधित लेख अशा अनेक गोष्टी या ॲप द्वारे करता येतात. याचे सर्वात मोठे फीचर म्हणजे डेटा एनलिसिस. तुम्ही दिवसा गणिक किंवा आठवड्याचे अथवा महिन्याचे किती खाल्ले, किती कॅलरी बर्न केल्या, वजन किती दिवसात कमी झाले, कुठला व्यायाम तुम्हाला जास्त रिझल्ट देतोय? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या अॅप मधून सहज मिळतात.
गो-की तुम्हाला चांगल्या प्रतीचे गॅजेट्स मग ते घड्याळ असतील, हेड बँड असेल, अॅप असेल किंवा अजून काही हे देतो. सोबतच तुम्हाला एक व्हर्चुअल कोच (प्रशिक्षक) देखील मिळू शकतो जो तुमच्यावर वैयक्तिक पूर्ण लक्ष देऊ शकेल. आज गो-की सोबत जगातील नावाजलेले १५०हून अधिक कोच जोडले गेले आहेत. गो-कीची वार्षिक सबस्क्रिपशन साधारण १२ हजार रुपयांपासून पुढे असते.
गो-की मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये अनेक उद्योजकांसोबत फिटनेस आयकॉन माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने आहेत. त्या सोबतच श्री. रतन टाटा आणि फिट पर्सनॅलिटी अक्षय कुमार यांनी देखील यात आपली गुंतवणूक केली आहे.
आज विशालचा हा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरला आहे. विशालच्या मते तंत्रज्ञानाचा वापर माणसाला फीट ठेवण्यासाठी व्हायला हवा, पण आज त्याच तंत्रज्ञानामुळे माणूस आळशी होत चालला आहे. विशाल आजही आपल्या फिटनेसलाच प्राधान्य देतो. तो आजही सर्व माहिती व्हाट्सअप्प वरच मागवतो. कारण त्यांच्या मते ई-मेल मुळे वेळ वाया जातो व मोठ्या स्क्रीन समोर बसलं की अधिकच कामे निघत रहातात. विशालचा एकच मूल मंत्र आहे “स्वतः फीट रहा आणि सर्वांना फीट रहाण्यास मदत करा”…
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!