बालाजी वेफर्स
महाराष्ट्रातल्याच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये घर-घरात पोहोचलेल्या व अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मुखी नाव असलेल्या बालाजी वेफर्सची ही यशकथा…
चंदुभाई विराणी यांनी १९८२ साली बालाजी वेफर्स बनवण्याची सुरुवात आपल्याच घराच्या प्रांगणातून अवघ्या १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून केली. आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल २ हजार कोटीहून अधिक आहे. राजकोट शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावरील वजदी नावाच्या गावात बालाजी वेफर्सचा ५० एकरमध्ये पसरलेला भव्य कारखाना आहे. आत प्रवेश करताच एक सुंदर व मोहक असे बालाजींचे मंदिर आहे. यावरुनच त्यांची बालाजींवरची श्रद्धा तसेच ब्रँडच्या नावाचे मूळ लक्षात येते. कारखान्याच्या परिसरात २ हजाराहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. गोशाळा, बायोगॅस प्लाण्ट, वॉटर ट्रीटमेंट प्लाण्ट आहे. कुठेही कंपनीचा बोर्ड किंवा नाव पेंट केलेले दिसत नाही. पण याच प्लाण्ट मध्ये आज तशी ५ हजार किलो बटाटा प्रोसेस होतो.
गुजरातमधील जामनगर जिल्हा काहीसा दुष्काळग्रस्त भाग. याच भागातील अतिशय मागासलेले व कुठल्याही सुविधा नसलेले कलावड तालुक्यातील धुंधोराजी हे २ हजार लोकवस्ती असलेले खेडेगाव. या गावातील पोपटभाई विराणी आपल्या कुटुंबासह शेती करत होते. ४ मुले व २ मुलींचा मोठा परिवार. जेमतेम दोन वेळची भाकर मिळत होती. त्यातच १९७२ सालचा भयंकर दुष्काळ आला. पावसाचा थेंब नव्हता. शेती करणं अवघड झालं होतं. समोर कुठलाही मार्ग दिसत नव्हता. आपले आयुष्य तर गेले, पण आता मुलांच्या भविष्यासाठी काही तरी हालचाल करणे गरजेचे आहे. आणि म्हणून पोपटभाईंनी आपली पिढीजात जमीन विकली. त्यातून २० हजार रुपये आले. ते पैसे आपल्या मेघजीभाई, भिकुभाई व चंदुभाई या मुलांना व्यवसाय करण्यासाठी दिले. मुलांनीही लगेच उत्साहात गाव सोडलं. धाकटा भाऊ कनूभाई आपल्या आई-वडिलांसोबत गावीच थांबला. आता ते राजकोटला आले. शेतीची पार्श्वभूमी असल्याने शेतीशी संबंधित काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या मोठ्या भावाच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी खते आणि कृषीविषयक साधने खरेदी-विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. विकताना मात्र ही खते बनावट असल्याचं त्यांच्या लक्ष्यात आलं. विराणी बंधूंसाठी हा फार मोठा धक्का होता. वडिलोपार्जित जमीन विकून व्यवसायासाठी वडिलांनी दिलेले पैसा आता मात्र मातीमोल झाले होते.
फसवणुकीमुळे होता नव्हता तो सर्व पैसा गेला. आता पुढे काय करायचं हा एक यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. अखेर त्यांनी दारोदार फिरून काय नवीन करता येईल यासाठी खूप प्रयत्न केलेत. महत्प्रयासाने विराणी बंधूंना एक कॉलेज कॅन्टीन चालवायला मिळालं. यावेळी चंदुभाई अवघा १७ वर्षांचा होता. ज्या वेळेस कॉलेज मध्ये पहिलं पाऊल ठेवायचं वय असतं त्यावेळी हा किशोरवयीन मुलगा कॅन्टीनमध्ये काम करायचा. मात्र लवकरच हे कॅन्टीनसुद्धा बंद पडलं. १९७४ मध्ये विराणी बंधू राजकोटमधील ऍस्टन सिनेमागृहाच्या कॅन्टीनमध्ये नोकरीस लागले. कॅन्टीनमध्ये काम करता करता ही मुले तिकीट खिडकीवर तिकीटे देखील विकायची. कधी कधी डोअरकीपरचे काम देखील करायची. रात्री सिनेमा संपल्यानंतर फाटलेल्या खुर्च्यांचे कव्हर शिवणे, तुटलेल्या खुर्च्या रिपेअर करणे, साफ सफाई करणे, असे देखील कामे करायचे. आणि या बदल्यात त्यांना चोराफरी आणि चटणी मिळायची. त्यावर त्यांचे रात्रीचे जेवण असे. इतकं सगळं काम करण्यासाठी त्यांना केवळ ९० रुपये ऐवढा पगार मिळायचा. त्यातील त्यांच्या खोलीचे भाडेच ५० रुपये होते. त्यांना गावी देखील पैसे पाठवावे लागत होते. एका रात्री तर चक्क या बंधूंनी ही भाड्याची खोली सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला व तसे केलेही. कारण भाडे देण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. अर्थात नंतर त्यांनी ते पैसे घरमालकाला आणून दिले.
त्यांच्या कष्टाळू स्वभावाने सिनेमागृहाचे मालक गोविंदभाई खूष झाले. १९७६ मध्ये त्यांनी विराणी बंधूना कंत्राटी पद्धतीवर कॅन्टीन चालविण्यास दिले. नवऱ्याला व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांच्या बायका देखील आल्या. त्या टोस्टेड सॅण्डविच तयार करायच्या. सुरुवातीला ते वेफर्स स्थानिक विक्रेत्याकडून खरेदी करत आणि विकत. पण ते विक्रेते अनेकदा न सांगता गावाला निघून जात, त्यांचा माल दुसऱ्याला विकत आणि यामध्ये काहीच पैसे सुटत नव्हते. म्हणून १९८२ साली त्यांनी एक तवा घेतला आणि बटाटा वेफर्स तयार करुन विकू लागले. हा चंदूभाई विराणी आणि त्यांच्या बंधूच्या आयुष्यातील सर्वांत महत्वाचा टप्पा ठरला.
त्यांचे मसाला वेफर्स हे देखील चांगला विकला जाणारा पदार्थ होता. पण तो सतत खराब होण्याची भीती असे. बटाट्याच्या वेफर्स मध्ये फायदा आहे हे त्यांच्या ध्यानी आले. आपल्या घरच्याच कंपाऊंड मध्ये त्यांनी १० हजार रुपये गुंतवून स्वतः वेफर्स बनवायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्यांच्या पूर्ण कुटुंबात केवळ चन्दूभाईंनाच उत्तम वेफर्स बनवता येतात. फक्त कॅन्टीनपुरतं मर्यादित न राहता आता हे वेफर्स दुकानांत देखील विकण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी या वेफर्सला ‘बालाजी’ हे नाव दिलं. पैसे वसुली हा एक मोठा या व्यवसायातील अडसर होता. काही दुकानदार तर त्यांना भिकाऱ्याची वागणूक देत. खराब असे सांगून कुणी अर्धे खाल्लेले पाकीट परत करत, तर कुणी फाटक्या नोटा देत, तर कुणी मागील वेळचे पैसे दिलेत असे सांगत. मात्र याची तमा न बाळगत शेवटचा ग्राहक संतुष्ट झाला पाहिजे या एका ध्येयाने चंदू आणि विराणी बंधूंनी स्वतःला झोकून दिले.
एका दुकानापासून सुरुवात करत २०० निष्ठावान ग्राहकांपर्यंत हा आकडा गेला. बटाटे सोलणे व काप करणे, यासाठी लागणारे मशीन फार महाग होते. म्हणून त्यांनी तसेच मशीन घरीच तयार केले. दरम्यान त्यांनी वेफर्स बनविण्यासाठी एक कूक पण कामावर घेतला. मात्र त्याच्या नेहमीच्या सुट्ट्यांमुळे विराणी बंधूंनाच हे वेफर्स तळावे लागत. मागणी वाढत असल्याने त्यांनी वेफर्स तयार करणारी यंत्रे आणि तंत्र खरेदी केले. १९८२-८९ दरम्यान व्यवसाय वाढला, मात्र नफा तसाच वेफर्सप्रमाणे बारीक राहिला.
१९८९ मध्ये बॅंकेतून ३ लाख ६० हजार रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी १ हजार चौरस मीटरची जागा विकत घेतली. २ तव्याचे आता ८ तवे झाले. तीन वर्षांत त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ३ कोटी रुपये झाली. याच वेळी त्यांनी प्रती तासाला १ हजार किलो वेफर्स तयार करणारे ५० लाख रुपयांचे स्वयंचलित यंत्र खरेदी केले, मात्र वारंवार हे यंत्र बिघडायचे. कंपनीची माणसे रिपेअरिंग ला आली की ते भले मोठे बिल द्यायचे. मशीनची स्थिती मात्र तशीच होती. अनेक महिने काहीही उत्पादन न करता हे यंत्र तसेच पडून राहिले. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. शेवटी ते मशीन त्यांनीच नीट करवून घेतले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर या प्रसंगाने आम्हाला इंजिनीअर देखील बनवले. येणारी प्रत्येक अडचण आम्हाला काहीतरी नवीन शिकवून जात होती व आम्हीही तितक्याच ताकदीने पुन्हा कामला लागत होतो.
१९९०-९१ च्या बदलत्या आर्थिक धोरणांमुळे त्यांच्यासमोर नवे आव्हान उभे ठाकले, ते म्हणजे परदेशी कंपन्यांचे. “पेप्सिको – लेज” सारख्या जागतिक बलाढ्य स्पर्धकांसमोर टिकाव धरणे फार महत्वाचे होते. त्यासाठी त्यांनी संवादावर अधिक भर वाढवला. प्रत्येक डिस्ट्रिब्युटर, होलसेलर व रिटेलर्स यांना थेट कंपनीशी संवाद साधण्याची मुभा दिली. यातून त्यांना अनेक नवीन उपाय व सल्ले मिळत गेले. त्यातूनच प्रॉडक्ट अधिकाधिक उत्तम करण्यास त्यांना मदत झाली. त्यांच्या मते “आमचा फोकस का केवळ गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान यावर आहे. आम्ही टार्गेटसाठी माणसं कामाला लावत नाही, तर फक्त ग्राहकाचे समाधान व त्याच्या पैशांचा योग्य मोबदला यावर लक्ष देतो. बाकी सगळे आपोआप होते.”
२००३ मध्ये १२०० किलो प्रति तास वेफर्स तयार करणारे यंत्र त्यांनी बसविले. मात्र पूर्वाश्रमीचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने यावेळी अपयश त्यांना पहावे लागले नाही. २००० ते २००६ दरम्यान गुजरात मधील ९० टक्के वेफर्सची बाजारपेठ बालाजीने काबीज केली. नमकीन मध्ये सुद्धा ते आघाडीवर होते. आज बालाजी दर दिवशी आठ लाख किलो बटाट्याच्या वेफर्सची, तर १२ लाख किलो नमकीनची निर्मिती करते. दररोज तब्बल ८ लाख वेफर्सच्या पाकिटांची निर्मिती केली जाते.
एका तव्यानिशी सुरु झालेला बालाजीचा हा व्यवसाय वलसाडच्या ३५ एकर व वाजदी येथील ५० एकर जागेत स्थिरावलाय. सुरुवातीला ३ कामगार होते, तर आज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अडीच लाख लोकांना बालाजी रोजगार देत आहे. एवढंच नव्हे तर बालाजीचा हा व्याप अमेरिका, लंडन आणि युरोपात देखील विस्तारला आहे. परदेशात बालाजीचे ६००च्या वर वितरक आहेत. तब्बल ४० हून अधिक देशात बालाजी वेफर्स विकले जातात.
बालाजी आपल्या कर्मचाऱ्यांना एक कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागविते. कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या ५५०० कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्के कर्मचारी महिला आहेत. बालाजी त्यांना दुपारचं जेवण अवघ्या १० रुपयांमध्ये पुरविते. संकटसमयी वा त्यांच्या गरजेच्यावेळी कंपनी पूर्णपणे त्यांच्या पाठिशी उभी राहते. कंपनीची वाटचाल एक अभ्यासच आहे. त्यामुळेच दररोज शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी बालाजीला भेट देत असतात. चंदुभाई स्वत: या मुलांसोबत संवाद साधतात. त्यांच्या शंकांचं निरसन करतात. कलावड रोड कारखान्यानजिक एक मोठी गोशाला देखील आहे. या गोशालेत २०० ते ३०० गायींची निगा राखली जाते.
आज त्यांच्या पुढच्या पिढीने देखील व्यवसायात भाग घेण्यास सुरुवात केली आहेत. भिकूभाईंचा मुलगा केयूर हा आर अँड डी तर दुसरा मुलगा मिहीर हा मार्केटिंग पाहतो. चन्दूभाईंचा मुलगा हा इतर टायअप्स, कंपनीचे बांधकाम आणि विस्तार पाहतो. इतर भावंडे अजून शिक्षण घेत असून लवकरच तेही सक्रीय होतील.
वार्षिक २५ टक्केच्या विकास दराने प्रगती करणाऱ्या बालाजी वेफर्सला अनेक भारतीय व परदेशी कंपन्यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. पण चंदुभाई व त्यांच्या बंधूंनी त्यांना नम्रतापूर्वक नकार दिला. त्यांचे म्हणणे आहे “आम्ही हे रोप वाढवण्यासाठी लावलंय, कापण्यासाठी नाही. आणि आज याचा वटवृक्ष झालाय. तो आज हजारो नव्हे तर लाखो परिवारांना पोसतो आहे.”
निव्वळ १० वी पर्यंत शिक्षण झालेले चंदुभाई २ हजार कोटीहून अधिकची उलाढाल असलेला हा बालाजी उद्योगसमूह सांभाळत आहेत. दुष्काळाला न डगमगणारे चंदुलालचे वडिल पोपटलाल आणि वारंवार अपयश येऊन देखील न डगमगता व्यवसाय करणारे चंदुलालचे अन्य बंधू यांच्यामुळेच आज ‘बालाजी’ने वेफर्सच्या जगात अढळ स्थान मिळविले आहे.