पेटीएम
विजय शेखर शर्मा २०२० च्या भारतातील तरूण अब्जाधीशांपैकी एक. अडीच अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेला, ज्याचा भारतात दुसरा तर जगात पहिल्या शंभर मध्ये नंबर लागतो. तोच विजय अगदी काही वर्षांपूर्वी खिशात दहा रुपये घेऊन स्वस्तात जेवण कुठे मिळेल याचा शोध करत असे. त्याचे स्टार्टअप पेटीएमचा सध्या खुप बोलबाला आहे. त्याची ही यशकथा….
उत्तर प्रदेशातील अलिगड शहरात १९७८ साली विजयचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. वडील तिथल्याच एका शाळेत शिक्षक होते. वडिलोपार्जित अशी कुठलीही संपत्ती जरी नसली तरी त्याला वारसांमध्ये चांगले संस्कार आणि उत्तम विचार मिळाले. अवघ्या १२ वर्षांचा विजय जेव्हा स्लीपर घालून शाळेत जायचा त्यावेळेला त्याच्या वर्गातील अनेक मुलं अनवाणी येताना पाहून त्याला दुःख होत असे आणि या जीवनाच्या अशा रुपावर त्याने एक सुंदर काव्य रचले होते. आपल्या गावातून इंजिनिअरिंगसाठी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी विजय हा केवळ दुसराच.
बारावीपर्यंत संपूर्ण शिक्षण हिंदी मीडिअम मध्ये झालेलं. त्यामुळे मनात भीती होतीच. त्यात अलिगड सारख्या छोट्या शहरातून दिल्ली सारख्या महानगरात जायचं, हे मोठं धाडसाचं काम होतं. पण तरीही स्वतःवर विश्वास ठेवून विजयला दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पण तिथला प्रवास हा अधिकच खडतर होत गेला. सगळ्यात मोठी अडचण त्याच्यासमोर होती ती म्हणजे भाषेची. आजपर्यंत सर्व शिक्षण हिंदीतूनच घेतलं व आता मात्र सर्व काही इंग्लिश मध्ये! ही कल्पनाच मोठी भयावह होती. त्यामुळे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम सोपा की अवघड हे समजण्यापूर्वीच तो अभ्यासक्रम समजून घेणंच त्याला अधिक त्रासदायक ठरत होतं.
विजय स्वतः वर्णन करतो की, त्याची त्या काळातील अवस्था ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील त्या मुलाप्रमाणे होती. ज्याला शिक्षकांचे ओठ हलताना दिसत होते, पण त्याचा अर्थ समजत नव्हता. आणि म्हणून त्याने इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी इंग्लिशची तयारी करायचे ठरवले. तासन् तास वाचनालयात बसून अनेक पुस्तक त्यांनी अभ्यासली.
इंग्लिश करता अनेक जुनी पुस्तक वर्तमानपत्र आणि मासिके त्याने नियमितपणे वाचले. सोबत एक डिक्शनरी घेऊन बसत असे. ही सवय त्याने स्वतःला लावून घेतल्यामुळे त्याच्या इंग्लिशमध्ये सुधारणा होऊ लागली. आणि त्याचसोबत त्याला इंजिनिअरिंगचा अभ्यास ही करु लागला. मुळात हुशार होताच. त्यामुळेच तो कॉलेजमध्येही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ लागला. पण हे सर्व करत असताना त्याची वाचनाची सवय त्याने तशीच ठेवली. अचानक एका रविवारी बाजारातून फोर्ब्स मॅग्झिन आणले आणि यात त्याला अनेक मोठ्या ब्रँडच्या सक्सेस स्टोरीज जसे अॅपल, इंटेल, एचपी, याबद्दल वाचायला मिळाल्या. या सर्वांच्याच बाबतीत एक साधर्म्य होतं आणि ते म्हणजे या सर्वांनीच आपली सुरुवात अतिशय सामान्य परिस्थितीतून केली होती. म्हणजे ह्या सर्व मोठ्या कंपन्या गॅरेजमधूनच सुरु झाल्या होत्या. यामुळे तो प्रेरित झाला आणि त्याच्या मनात आपणही काहीतरी सिलिकॉन व्हॅली मध्ये जाऊन करावं हा विचार सुरू झाला. पण आर्थिक दृष्ट्या ते परवडणारं नव्हतं म्हणून आपण भारतातच काहीतरी करायचं ही खूणगाठ त्याने बांधली.
त्याच्यासाठी प्रेरणास्थान होते सबीर भाटीया. एक भारतीय ज्यांनी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मध्ये ‘याहू’ या कंपनीची व ‘हॉट मेल’ नामक ई मेल सर्व्हिस प्रोव्हायडरची स्थापना केली. “मला सबीर भाटीया सारखं व्हायचं आहे” असं तो सतत स्वतःला सांगे. आयटी क्षेत्रात भारतीय लोक देखील मोठे होऊ शकतात, हे त्याचं जिवंत उदाहरण होतं.
या सर्व प्रेरणेतून त्याने १९९७ साली आपल्या हरी नावाच्या मित्रासोबत चक्क एक आयटी कंपनी सुरू केली. यात त्या दोघांना एक सर्च इंजिन तयार करायचे होते. भारतातील वाढत्या इंटरनेटच्या प्रसारामुळे सर्च इंजिनचे वाढणारे महत्व त्याला त्याच वेळी लक्षात आलं होतं. पण सामान्य कुटुंबातील जबाबदाऱ्या व आई, वडिलांच्या आग्रहामुळे त्याला अखेर नोकरीच पत्करावी लागली.
विजयला सुरुवातीपासूनच एका मुक्त पक्षाप्रमाणे भरारी घ्यायला आवडतं. त्याला कधीही एखाद्या घोड्याप्रमाणे त्याच वाटा पुन्हा पुन्हा गिरवायला आवडत नाहीत. आणि म्हणूनच २००१ साली त्याने नोकरी सोडली आणि याहूच्या विचारसरणीवर त्याने स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या काही मित्रांसोबत वन नाईंटी सेवन कम्युनिकेशन नावाची कंपनी सुरू केली. कंपनीची सुरुवात चांगली झाली. परंतु काही काळ गेल्यानंतर ज्या मित्रांच्या विश्वासावर त्याने आपलं करिअर निर्धारित करण्याचा विचार केला होता त्या मित्रांनी अर्ध्या रस्त्यात साथ सोडली व कंपनी जवळजवळ दिवाळखोरीला पोहोचली. आधीच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विजयला हा फार मोठा धक्का होता. यातून सावरण्यासाठी त्याला आठ लाख रुपयांचं कर्ज काढावे लागले, तेही २४ टक्के व्याजदराने. त्यामुळे कंपनीतून येणारे उत्पन्न आता त्याला पुरेसे होत नव्हते. कामासोबतच नोकरी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आणि नोकरीतून येणारे उत्पन्न तो आपल्या व्यवसायात लावू लागला. रडतखडत का होईना पण त्याचा व्यवसाय सुरू होता.
परिस्थितीशी झगडत असताना त्याच्या बहिणीचे लग्न ठरले आणि त्याकरता त्याच्या वडिलांनी दोन लाख रुपयांचं कर्ज काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं सर्व रेकॉर्ड क्लीन असूनही त्यांना कर्ज मिळालं नाही. आधीच डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आणि आता पुन्हा बहिणीच्या लग्नाची तयारी व याकरता त्याला आपल्या कंपनीतील ४० टक्के भाग विकावा लागला. त्यातून जे पैसे आले त्याने आपल्या घरगुती गरजा व कंपनीवरील कर्ज फेडले.
आपला चाळीस टक्के भाग विकत असतांना त्याला फार दुःख झाले आणि अशी वेळ आपल्यावर का आली याची कारणमीमांसा करू लागला. त्याच्या असं लक्षात आलं की, यामागे प्रमुख दोन कारणं आहेत. एक म्हणजे त्याच्या कंपनीचे ग्राहक त्याला कधीही वेळेवर पेमेंट करत नव्हते. त्यामुळे व्यवसायात कॅश फ्लो ला किती महत्त्व आहे हे त्याच्या लक्षात आले. आणि दुसरे म्हणजे सामान्य व गरीब कुटुंबांना नेहमीच सहन करावे लागणारे, ते म्हणजे वित्त संस्थांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी. त्याच्या वडिलांचा संपूर्ण रेकॉर्ड क्लिअर असून देखील त्यांना कर्ज मिळाले नाही. आणि म्हणूनच त्याने एक असा व्यवसाय करायचे ठरवले ज्यातून सर्वसामान्यांना देखील या वित्त व्यवस्थेमधून पैसे मिळण्यास व देण्यास सुविधा होईल. आणि यातूनच उगम झाला तो पेटीएमचा.
विजय ह्या बाबतीत एक द्रष्टा सिद्ध झाला. ऑगस्ट २०१० मध्ये ज्या काळात पेटीएम ची सुरुवात करण्यात आली त्याकाळात भारतात क्वचितच कोणी अशा सेवेबद्दल कल्पना करू शकेल किंवा यावर विश्वास ठेवू शकेल अशी स्थिती होती. सुरुवातीला पेटीएम चा उपयोग लोक केवळ रिचार्ज करणे व बिल भरण्यासाठी करत होते. पेटीएम ची गती अतिशय मंद होती. आणि मग तो मोठा निर्णय आला ज्याने भारताची अर्थव्यवस्था मंदावेल अशी भाकीत होऊ लागली. पण त्याच एका निर्णयाने विजय च्या पेटीएम ला मात्र गरुड झेप घेण्याची संधी दिली. पंतप्रधानांनी नोट बंदीचा निर्णय घोषित केला. आणि ह्या निर्णयाने भारतात सगळ्यात जास्त फायदा जर झाला असेल तर तो पेटीएम ला झाला. आजपर्यंत कॅश वर अवलंबून असलेले लोक आता मात्र यु पी आय आणि तत्सम पर्यायांचा विचार करू लागले. आणि २०१० पासून अस्तित्वात असलेल्या व लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केलेले पेटीएम हे सर्वांच्याच पसंतीस पहिले ठरले.
पेटीएम ने सुरुवातीला तरुणांची मने जिंकली आणि मग हळूहळू ज्येष्ठांनी ही पेटीएमला स्वीकारले. नोटबंदी मुळे सर्वच कंपन्या आता ऑनलाईन पेमेंट अथवा कॅशलेस पेमेंट साठी आग्रह धरू लागल्या. त्यामुळेच पेटीएमने आपल्या सेवा सर्व कंपन्यांना पैशाची आवक व जावक या दोन्हीसाठी देऊ केल्या. पेटीएम कॅशबॅक ऑफर्समुळे त्याची लोकप्रियता वाढत होती. आता पेटीएम हे केवळ रिचार्ज करण्याचे ॲप नसून जवळजवळ सर्वच बँकींग सुविधा ह्या ॲप मधून ग्राहक उपभोगू शकतात मग त्यात रेल्वे अगर बसचे रिझर्वेशन असेल, कुठल्या वस्तूंची खरेदी असेल किंवा अगदी कर्ज मिळवणे असेल. या सर्व सेवा आता पेटीएम देऊ लागले आहे. पेटीएमने आता तर चक्क डिजिटल सोनं विकत घेणे व विकणे याची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हे सर्व करत असताना पेटीएमनेही आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली आहे. रिझर्व बँकेकडून एक व्हर्चुअल बँक म्हणून ते प्रमाणित आहेत. त्यांच्या प्रत्येक सेवा या पासवर्ड व ओटीपी ने सुरक्षित केल्या आहेत.
वार्षिक १८ % दराने आपली वाढ करत पेटीएम चे अँप आजवर ४५ करोड वेळा डाऊनलोड झाले असून २० कोटी ट्रॅन्झॅक्शन दर महिन्याला होत आहेत. अब्जाधीशांच्या यादीत जाणारे पेटीएम हे भारतातील पहिले ऑनलाइन पेमेंट एप्लीकेशन आहे. पेटीएमला आजवर अडीच अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक मिळाली असून आजचे त्यांचे मूल्यांकन १६ अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार जसे अलीबाबा, सोफ्टबँक, टीरो प्राईस यांनी आपली गुंतवणूक केलीच पण पेटीएम ला खरी पावती मिळाली जेव्हा रतन टाटांच्या टाटा सन्स कॉर्पोरेशनने यात भागीदारी घेतली.
मिळालेले फंडिंग मुख्यत्वेकरून आपल्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा अधिक सुखकर करणे व खेडोपाडी पेटीएमला पोहोचवणे याकरता वापरल्या गेल्या. पेटीएम आज स्वतः एक गुंतवणूकदार झाला आहे व अनेक कंपन्या त्यांनी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच पेटीएम मॉलची सुरुवात झाली. ज्यात तब्बल दीड लाखाहून अधिक विक्रेते रजिस्टर्ड आहेत. म्हणजे आज ते स्वतः एक स्वतंत्र ई-कॉमर्स पोर्टल म्हणून देखील काम करत आहेत.
पेटीएम चा एक मूलमंत्र आहे, भविष्यात लोकांना काय हवं आहे त्याचा अंदाज घ्यायचा व त्या सुविधा अतिशय सृजनशील पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायच्या व तेही अगदी सुलभ करून.
या वर्षाखेर पर्यंत पेटीएम हे सोळा देशांमध्ये आपले पाय भक्कम रोवणारे असून ह्यातून १२६ दशलक्ष नवीन यूजर्स मिळणायची शक्यता आहे. जागतिक पातळीवर ऑनलाइन पेमेंट साठी चे सर्वांचेच पहिले पसंतीचे स्टेशन पटकावण्याचा पेटीएमचा मानस आहे.