फिनिक्स भरारी
चित्रपटांच्या तिकीटांचे ब्लॅक मार्केटिंग, हाऊसफुल्लचा बोर्ड आणि हवी ती सीट मिळविण्याबाबत अगदी समर्पक उत्तर शोधून काढलंय ते अवघ्या २४ वर्षाच्या आशिषने. फिनिक्स पक्षाप्रमाणेच अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून बाहेर पडत मोठी झेप घेणाऱ्या आणि सिनेमागृहांमधील तिकीटांचे घरबसल्या बुकींग करता येणाऱ्या “बुक माय शो” या स्टार्टअपची यशोगाथाही एखाद्या चित्रपटातील कथेसारखीच आहे….
आशिष हेमराजानी हा मुंबईतच लहानाचा मोठा झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला आशिषने मिठीभाई कॉलेज मधून आपली पदवी मिळवल्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित सिडेनहॅम इन्स्टिटयूट मधून एमबीए केले. व्यवस्थापन कौशल्य संपादन करत असतांना जीवनाचे व्यवस्थापन करण्यास योग्य असे दोन मित्र त्याला लाभले. परीक्षित दर आणि राजेश बालपांडे, हे दोघेही आशिष सोबतच एमबीएचे शिक्षण घेत होते. पदवी संपादन करून तिघांनाही चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. आशिषला जे. वॉल्टर थॉमसन ह्या ऍडव्हर्टायझिंग फर्म मध्ये चांगल्या पगाराची तर राजेश हा देखील एका इन्व्हेस्टमेंट बँकेत. सर्व काही स्थिर स्थावर सुरु होते.
आशिष एकदा दक्षिण आफ्रिकेतील एका झाडाखाली निवांत बसलेला असतांना रेडिओ वरील रग्बी मॅचच्या तिकीट विक्रीची जाहिरात ऐकली. आणि त्यातून त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवेची. याबद्दल तो खूप उत्साहित झाला आणि आपला दौरा लवकरच संपवून भारतात परतला. अवघ्या २४ वर्षांच्या आशिषने आपली २ वर्षाची नोकरी सोडायला जरा ही विलंब केला नाही. ही कल्पना त्याच्या पालकांना फारशी आवडली नाही, पण लवकरच त्यांची सहमती मिळवण्यात तो यशस्वी झाला.
वेब पोर्टल वरील या कामासाठी त्याला ऐका तंत्रज्ञान तज्ज्ञाची आणि वित्त व्यवस्थापनात तरबेज अशा विश्वासू व्यक्तीची आवश्यकता होती. त्याने त्वरित आपले मित्र परीक्षित व राजेश यांना ह्यात पार्टनरशिप देऊ केली. व त्या दोघांनीही आशिषला साथ देण्याचे ठरवले. १९९९ साली त्याने आपल्या बेडरूम – म्हणजेच तेव्हाचे हेड ऑफिस मधूनच ह्या नवीन प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. “बिग ट्री एंटरटेनमेंट” ह्या नावाने त्यांनी आपली कंपनी रजिस्टर केली. ज्या मोठ्या झाडाखाली बसून त्याला ही कल्पना सुचली, त्या झाडाबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी त्यांनी कंपनीला हे नाव देण्याचे ठरवले.
या कंपनी अंतर्गत तिकीट बुकिंग वेब पोर्टल सुरु करण्यात आले. ह्या पोर्टलचे “गो फॉर टिकिटिंग” हे ब्रँड नाव ठरवण्यात आले. पुढे २००२ साली त्यांनी ह्याला बदलून “इंडिया टिकिटिंग” असे आपले ब्रँड नाव केले. पण व्यवसायाच्या वाढत्या स्वरूपाला केवळ भारतापुरते मर्यादित न ठेवता ते जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी नवे नाव शोधणे सुरु केले. ह्या करता २००७ साली त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची स्पर्धा घेतली आणि विजेत्याला एक आय पौंड बक्षिस म्हणून देण्याचे जाहीर केले. तेव्हा एका इंजिनिअर इंटर्नशिप करणाऱ्याने आत्ताचे “बुक माय शो” हे नाव सूचवले. हेच नाव कंपनीच्या ध्येय धोरणांशी जुळते असे वाटले म्हणून निवडण्यात आले. या वेब पोर्टल वरून लोकांना आपल्या पसंतीच्या सिनेमागृहात, आपल्या पसंतीचा सिनेमा, आपण स्वतः निवडलेल्या सीटवर बसून पाहण्यासाठी आपल्या घरूनच तिकीट बुक करणे शक्य होणार होतं.
ऑनलाईन तिकीट विक्रीचा व्यवसाय वाटला होता तितका सोपा आणि सहज कधीच नव्हता. १९९० – २००० चा काळ म्हणजे भारतातील इंटरनेट सेवा आत्ताच कुठे आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यात इंटरनेट साठी लागणारे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप सर्वांकडेच उपलब्ध नव्हते. त्याकाळात क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असणे व त्याचा खरेदीसाठी वापर करणे ही संकल्पना फारशी रुळलेली नव्हती. त्यामुळे तिकीट विकत घेतांना ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ते यशस्वी होईल याची शाश्वती बऱ्याचदा नसायची. सर्वात मोठी अडचण ठरत होती ती म्हणजे थिएटर मध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग चे सॉफ्टवेअर. अनेक थिएटर्स कडे हे सॉफ्टवेअर नव्हतेच आणि फार कमी लोक ते विकत घेण्याची तयारी दाखवत होते. त्यामुळे ग्राहक तयार असून तिकीट विक्रेताच ते पुरवण्यासाठी तयार नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी आपले बिझनेस मॉडेल थोडे बदलले.
‘बुक माय शो’ आता स्वतःच बल्क मध्ये तिकिटं विकत घेऊ लागला. त्यांनी शेकडो मोटर बाईक रायडर्स ना कामावर ठेवले. आपल्या पोर्टलवर तिकीट बुक केलेल्यांना घरपोच तिकिटं पुरवावी लागली. ‘बुक माय शो’चे हे सेमी ऑनलाईन स्वरूप ग्राहकांच्या पसंतीला खरे उतरू लागले. आणि ‘बुक माय शो’ ने आता ह्याच मॉडेलवर १२ शहरात आपला विस्तार केला. आता ‘बुक माय शो’ कडे रायडर्स व्यतिरिक्त १५० हून अधिक कर्मचारी होते. सर्वच शहरात ग्राहकांची पसंती लाभली पण ह्या मॉडेल मुळे त्यांना बंधन घातले गेले. त्यांच्या विस्ताराला कुठे तरी मर्यादा येत होत्या.
ऑफलाईन बिझनेस मुळे त्यांच्या खर्चात वाढ होत होती आणि आता त्यांना इन्व्हेस्टर्सची आवश्यकता वाटू लागली. अगदी सुरुवातीच्या काळात इन्वेस्टर्स च्या शोधात त्यांनी जे पी मॉर्गन चेज यांना आपले बिझनेस प्रपोझल (केवळ एक पानी) फॅक्स केले होते. आणि केवळ त्यांचा बिझनेस प्लॅन वाचून जे पी मॉर्गन चेज यांनी अडीच कोटी रुपये त्वरित मंजूर केले. सर्व काही सुरळीत होते. सर्व अडचणींवर मत करत ते देखील एक चांगला व्यवसाय करीत होते. डॉट कॉम उद्योग देखील भरभराट करीत होता. आणि म्हणूनच चांगला नफा दिसत असल्यामुळे जे पी मॉर्गन चेज यांनी त्यांच्या भांडवलाच्या भागीदाराने आपला हिस्सा रुपर्ट मर्डोकच्या न्यूज कॉर्पोरेशनला विकला. आणि त्या नंतर जे झाले ते अकल्पनीय होते.
२००२ साली डॉट कॉम बूम – फुगा फुटला! आणि सर्वच आय टी क्षेत्राला त्याची झळ बसली. ‘बुक माय शो’ला देखील ह्याचा मोठा फटका बसला. नवीन उद्योगांसाठी ते आणखी वाईट होते आणि त्यापैकी एक बिगट्री एंटरटेनमेंट होती. त्यांचा व्यवसाय आत्तापर्यंतच्या सर्वात खालच्या थरावर पोहोचला होता. सर्व गुंतवणूकदारांनी हात मागे खेचले; रुपर्ट मर्डोकच्या न्यूज कॉर्पोरेशने देखील आपली गुंतवणूक मागे घेतली. परिस्थिती अधिकाधिक बिकट होत गेली. त्यांना बर्याच कर्मचार्यांच्या पगारात कपात करावी लागली. त्यांनी इतर शहरातील कार्यालये बंद केली आणि केवळ मुंबई व दिल्ली या प्रमुख शहरांवर लक्ष केंद्रित केले. त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या १५० वरून ६ वर आली. सर्व प्रकारच्या खर्चात कपात केली. येणारा प्रत्येक रुपया हा व्यवसायातच लावला. २००२ ते २००६ ह्या काळात त्यांना एकही गुंतवणूक मिळाली नाही. परिस्थिती इतकी बिकट होत गेली की संध्याकाळचे जेवण कसे मिळेल किंवा लोकांचे पगार कसे करायचे याचे देखील त्यांच्या कडे उत्तर नसे.
या परिस्थितीमुळे त्यांना अनेक गोष्टींची जाणीव होऊ लागली. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत होता. आता मात्र दोनच पर्याय उरले होते. एक म्हणजे बिझनेस बंद करायचा आणि येत असलेल्या ऑफर्स स्वीकारून एखादी नोकरी पत्करायची किंवा आपल्या वैयक्तिक सेविंग्जही ह्याच व्यवसायात घालायच्या आणि पुन्हा जोमाने उतरायचे. व्यवसाय जरी कोसळला होता तरी त्यांचा आत्मविश्वास कधीच ढासाळला नव्हता. त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला अगदी नव्या जोमाने आणि नव्या पद्धतीने.
डॉट कॉम त्सुनामी संपल्यानंतर, उत्तम इंटरनेट, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सुविधा आणि पायाभूत सुविधा इत्यादींसह भारतातील बाजारपेठ पूर्णपणे बदलली. आता इंटरनेटमुळे एक नवी क्रांती या देशात होत होती. त्याला जोड मिळाली ती अद्ययावत बँकिंग सुविधांची. म्हणूनच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग यांचा वापर वाढू लागला. २००२ ते २००४ या काळात भारतभर मल्टिप्लेक्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. आता झपाट्याने मोठं होण्यासाठी आणि पूर्वी घेतलेल्या अनुभवावरून आपले काम सोपे करण्यासाठी त्यांनी ऑटोमेटेड तिकीट बुकिंग सॉफ्टवेअर हे मल्टिप्लेक्स ना विकायला सुरुवात केली. पूर्वी हेच सॉफ्टवेअर त्यांनी फ्री वितरित केले होते. पण आता ह्या पडत्या काळाने त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या होत्या. त्यातली ही एक – कुठली ही गोष्ट फुकट दिली तर त्याची किंमत रहात नाही. आता त्यांनी आपले कॉल सेन्टर्स पुन्हा कार्यान्वित केले पण हे कॉल सेन्टर्स केवळ मल्टिप्लेक्स साठीच काम करत होते. ह्यात त्यांचे कुठले हि स्वतःचे प्रॉडक्ट नव्हते. ह्या कॉल सेन्टर्स मधून मिळणाऱ्या तिकीट विक्रीसाठी त्यांनी आता मल्टिप्लेक्सकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. कळत नकळत पणे त्यांना आता त्यांचे बिझनेस मॉडेल सापडले होते. ह्या सर्व गोष्टींना आता भरघोस प्रतिसाद मिळत होता. २००७ पर्यंत त्यांच्या व्यवसायाचे मुल्यांकन शून्य वरून २४ कोटीपर्यंत पोहोचले होते. परिस्थिती बदलत होती आणि आता ते एका मोठ्या कमबॅक साठी तयार होते!
आता पुन्हा त्यांचा गुंतवणुकीसाठी शोध सुरु झाला आणि मार्च २००७ मध्ये त्यांना नेटवर्क १८ कडून १४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. ह्याने त्यांची मालकी आता ६०% वर आली पण त्यांना हात पाय हलवायला जागा मिळाली. आता पुन्हा त्यांनी टिकीट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. पण आता ते अधिक सतर्क झाले होते. त्यांनी आपल्या सर्व खर्चांवर आळा घालण्याचे ठरवले होते. अगदी ऑफिस स्टेशनरी पासून सर्वच गोष्टीत गरज असेल तरच खर्च करायचा ह्या धोरणावर आता ते काम करू लागले. ‘बुक माय शो’ डॉट कॉम चे मार्केटिंग पुन्हा सुरु झाले आणि आता त्यांना प्रतिसादही तितकाच जोरदार मिळत होता. चित्रपटाच्या तिकीटांसोबतच ‘बुक माय शो’ डॉट कॉम वर आता लाईव्ह कॉन्सर्ट, स्टेज प्रोग्रॅम्स, क्रिकेट मॅचेस, संगीत मैफिल, प्रदर्शन, संग्रहालय ह्या सर्वांचे देखील तिकीट विकले जाऊ लागले. लोकांच्या पसंतीला खरे उतरल्यामुळे दिवसागणिक त्यांची प्रसिद्धी वाढत होती. तोच २००८ – ०९
ची जागतिक मंदी येऊन ठेपली. आधीच २००२ मध्ये पोळले असल्यामुळे मात्र आता त्यांनी अगदी सतर्कतेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. आणि ह्याच सतर्कतेचा परिणाम की काय पण त्यांच्या व्यवसायात फारसा फरक पडला नाही. उलट या काळात त्यांच्याकडे अनेक हुशार आणि कर्तृत्वसंपन्न लोकांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. ‘बुक माय शो’ ची समृद्धी अधिकच वृद्धिंगत केली. त्यानंतर मग मागे वळून कधीच पहिले नाही. २०१२ मध्ये त्यांनी आपले ऍप देखील लाँच केले. हे ऍप विंडोज, अँड्रॉइड, आय ओ एस व ब्लॅक बेरी साठी देखील उपलब्ध आहेत. ह्या ऍप च्या माध्यमातून ग्राहकांना शो चे वेळापत्रक, ट्रेलर, सीट नंबर इ. सर्व्ह गोष्टी सहज पाहता येतात. ह्या सोबतच त्यांची २४/७ कस्टमर सुविधा फोन नंबर्स देखील आहेत.
कंपनीने २०१०-११ मध्ये त्यांचा नफा १६.०९ कोटी रुपये इतका नोंदवला. जो २००९-१० च्या १२ कोटी रुपयांच्या तुलनेत ३२% जास्त होता. आता त्यांनी मल्टिप्लेक्स व थिएटर सोबत करार बांधायला सुरुवात केली. ह्यामुळे त्यांच्या तिकीट विक्रीमध्ये विक्रमी वाढ होऊ लागली. जुलै २०१२ मध्ये तर एका दिवसात चक्क एक लाख तिकिटे व एका महिन्या २० लाख तिकिटे विकण्याचा विक्रम नोंदवला. ‘बुक माय शो’ ला हॉटेस्ट कंपनी ऑफ द यर हा अवॉर्ड २०१२ साली देण्यात आला. डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी तिकीट ग्रीन नावाची तामिळनाडूतील कंपनी विकत घेतली.
त्यामुळे दक्षिणेतील १०० हुन अधिक थिएटर्स व मल्टिप्लेक्स त्यांच्याशी जोडले गेले. २०१३ साली अमेरिकेतील एक्सेल पार्टनर्स ने ६६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यावेळी ‘बुक माय शो’ चे मूल्यांकन २५० कोटी रुपये करण्यात आले.
‘बुक माय शो’ ने आता आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला. ह्या करता त्यांनी मलेशिया व न्यूझिलँड ची निवड केली. पण हा विस्तार केवळ भौगोलिक नव्हता. त्यांनी तिकीट बुकिंगच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचे ठरवले. मग त्यात आय पी एल असेल, फॉर्मुला वन असेल, सुपर फाईट लीग असेल योनेक्स बॅडमिंटन असेल किंवा अजून काही. २०१३ मध्ये त्यांनी पी व्ही आर सिनेमे सोबत ५ वर्षाचा करार केल्या, त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या १५०० सिनेमांमध्ये २५० ची भर पडली. २०१४ मध्ये सैफ पार्टनर्स ने त्यांना १५० कोटी रुपयांची गुंतवणूक देऊन त्यांना २०० हुन अधिक शहरांमध्ये पोहोचण्यासाठी मदत केली. त्यापाठोपाठच वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकून जुलै २०१६ मध्ये ६० कोटी तर जुलै २०१८ मध्ये ८० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. डिसेंबर २०१९ मध्ये पुन्हा ८० कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त केल्यानंतर आता त्यांची एकूण गुंतवणूक २६० कोटी रुपयांहून अधिक आहे.
आता ‘बुक माय शो’ चा परिवार १५०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा आहे. प्रामुख्याने सॉफ्टवेअर विकणे व तिकीट विक्री करणे ह्यासोबतच आता ते नव्या सिनेमे अगर कार्यक्रमांच्या जाहिराती आपल्या सोशल मीडिया द्वारा करून चांगले उत्पन्न कमवत आहेत. आज ‘बुक माय शो’ च्या केवळ फेसबुक पेज वर १० लाख हून अधिक चाहते आहेत. त्यामुळे, कुठल्याही चित्रपटाचे प्रोमोशन साठी ‘बुक माय शो’ हा एक महत्वाचा घटक बनला आहे. आणि अशीच प्रगती सुरु राहिली तर लवकरच स्वतःचा आयपीओ घेऊन येण्याचा देखील आशिषचा मानस आहे. अनेक अडचणींवर मात करत आज फिनिक्स पेक्षाप्रमाणे आज ‘बुक माय शो’ पुन्हा ऊंच भरारी घेत आहे.