इझी ऑनलाईन लिक्विडेशन (EOL)
कुठल्याही व्यवसायाचे मूळ उद्दिष्ट हे लोकांचे प्रश्न सोडवणे असेल तर तो उद्योग नक्कीच यशस्वी होतो. असाच अनुभव अपूर्व भट यांच्या इझी ऑनलाईन लिक्विडेशन (EOL) या कंपनीला आला आहे. भारतभरातील मोबाईल विक्रेते व होलसेलर्स यांच्यासमोरील एका बिकट प्रश्नाला अगदी समर्पक व सोपे असे उत्तर शोधून काढले आहे अपूर्व भट या तरुणाने. त्याच्या या अनोख्या कर्तृत्वाची आणि इओएलची ही यशोगाथा…
केंद्रीय विद्यालयातील शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अपूर्वने बरकतुल्ला विश्वविद्यालय, भोपाळ येथे वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. व्यवस्थापना करता आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षा देऊन निर्मा युनिव्हर्सिटी येथे पीजीडीबीएम या अभ्यासक्रमाला २०१० मध्ये प्रवेश घेतला. मार्केटिंग मॅनेजमेंटचे शिक्षण घेतल्यानंतर अपूर्वने फोरजी मोबाइल आणि ब्रॉडबँड सर्विसेस या कंपनीसाठी सेल्स मॅनेजर म्हणून काम केले. त्यानंतर एचसीएल इन्फोसिसटीम्स या कंपनीमध्ये ऑगस्ट २००७ ते सप्टेंबर २००९ पर्यंत टेरिटरी सेल्स इन्चार्ज म्हणून पद भूषवले.
सप्टेंबर २००९ मध्ये अपूर्वला सोनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी काम करण्याची संधी मिळाली. डिस्ट्रीब्यूशन प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून अपूर्वला सोनीच्या काही विशिष्ट विभागाची संपूर्ण गुजरात राज्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळल्यानंतर कंपनीने स्वतः आपल्या ऐका डिस्ट्रीब्युशन चॅनलची मॅनेजिंग पार्टनरशिप अपूर्वला ऑफर केली. डी एम अँड एस इंडिया या डिस्ट्रीब्यूशन वर्टीकलचे अपूर्व आता मॅनेजिंग पार्टनर आहेत. नोव्हेंबर २०१३ पासून ते आजपर्यंत हीच जबाबदारी अपूर्व अगदी उत्तम रित्या निभावत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि विशेष करून मोबाईल फोन्स यांच्या विक्रीमध्ये येणाऱ्या अनेक अडचणींची कल्पना अपूर्वला या कारकिर्दीत आली. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठे चॅलेंज म्हणजे सर्वच रिटेल दुकानदार, होलसेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स सर्वांसाठीच “न विकले गेलेल्या वस्तूंचं करायचं काय?” हा असतो. मोबाईल फोन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या विक्रेत्यांना कंपनीकडून किंवा डिस्ट्रीब्युटर्सकडून ही मोबाइल फोनची इन्व्हेंटरी विकत घ्यावी लागते. आणि हा घेतलेला माल स्वतः विकून संपवावा लागतो.
जर काही वस्तू विकल्या गेल्या नाहीत तर त्या वस्तू विक्रेत्याच्या अंगावर पडतात. म्हणजेच विक्रेत्याचा अडकलेला पैसा, त्याचं भांडवल, त्याची जागा, यात झालेला खर्च हा सर्व वायाच जातो. कंपनीकडे न विकल्या गेलेल्या वस्तू परत घेण्याची कुठलीही व्यवस्था नाही. २०१८ मध्ये तर जिओने ही कंपनी ज्या वेळेला बंद पडली त्यावेळेला त्याचे बाजारात असलेले मोबाईल फोन्स आता विक्रेत्यांनी कसे विकावे हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला होता.
मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये आधीच फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे आणि दिवसागणिक ती वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोबाईल कंपन्या सर्व प्रकारचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या कॉस्ट कटिंगच्या युगामध्ये रिटेल विक्रेत्यांना मिळणाऱ्या प्रॉफिट मार्जिनमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. यासोबतच नवीन मॉडेल्स बाजारात आले की जुन्या मॉडेल्सला कोणीही विचारत नाही, असा एक अनुभव सर्वत्र पाहायला मिळतो. म्हणजेच रोज बाजारात येणारे नवीन मॉडेल्स, त्यामुळे जुन्या मॉडेल्सची घटणारी मागणी, प्रत्येक वस्तू मागे दिवसेंदिवस कमी होणारे नफ्याचे प्रमाण व त्या वस्तूमध्ये आधीच केलेली गुंतवणूक या सर्व गोष्टींमुळे मोबाईल फोन्स किंवा सर्व इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांना व्यवसाय करणं दिवसेंदिवस तोट्याचे ठरत आहे. त्यात भर पडते आहे ती ऑनलाईन मार्केटची. अशा वेळेला जुन्या हँडसेटची पडलेली इन्व्हेंटरी ही किरकोळ नफ्याला देखील मारक ठरत आहे. या बिकट समस्येवर काहीतरी उत्तर काढायलाच हवं! तरच हा व्यवसाय फिजिकल फॉर्ममध्ये टिकेल नाहीतर इलेक्ट्रॉनिक खरेदी हा विषय पूर्णपणे ई-कॉमर्स आणि ऑनलाईनच होऊन जाईल या विचाराने अपूर्वने मार्ग शोधायला सुरुवात केली.
“न विकले गेलेल्या वस्तू जर कंपनी परत विकत घेऊ शकत नाही तर त्या विकण्यासाठी दुसरा कुठला तरी बाजार किंवा मार्केट असायलाच हवं. व ते जर उपलब्ध नसेल तर ते निर्माण करायला हवं.”अशा कल्पनेने अपूर्वने आपल्या ईओएल स्टॉक्स या कंपनीची स्थापना केली. ई ओ एल म्हणजेच इझी ऑनलाईन लिक्विडेशन हा एक b2b म्हणजेच बिझनेस टू बिझनेस साठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. त्यांची स्वतःची वेबसाईट व मोबाईल फोनसाठी चे ॲप्लिकेशन देखील आहे. प्लॅटफॉर्म द्वारे भारतभरातील मोबाईल फोन्सचे विक्रेते म्हणजेच रिटेलर्स, होलसेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स आणि उत्पादक सुद्धा जोडले गेले आहेत. या प्लॅटफॉर्म वर वस्तू विकणारा व वस्तू विकत घेणारा हे सर्वच व्यवसायिक आहेत. एखाद्या विक्रेत्याकडे काही वस्तू जर विकल्या जात नसतील किंवा हळू विकल्या जात असतील म्हणजेच नॉन मुविंग किंवा स्लो मुविंग इन्व्हेंटरी असेल तर त्यांनी त्या वस्तूंचे डिटेल्स आणि क्वांटीटी या वेबसाईटवर विक्रीसाठी टाकावी. ज्या विक्रेत्याला या वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी त्या ऑनलाईन ऑर्डर कराव्यात. देशभरातील सर्व व्यवसायिक यानिमित्ताने जोडले गेले. प्रत्येक खरेदी-विक्री मागे कंपनीला ठराविक कमिशन मिळते.
अपूर्वच्या मते भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांची मागणी असते. आजही शहरी भागात कार्बन, लावा, मायक्रोमॅक्स मोबाईल फोनची मागणी नसली तरीदेखील ग्रामीण भागामध्ये हेच फोन्स फुल डिमांडमध्ये आहेत. उदा. टेक्नो नावाचा एक मोबाईल फोनचा ब्रँड हा मोठ्या शहरांमध्ये पहायला देखील मिळत नाही, पण ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा ब्रँड म्हणून तो प्रसिद्ध आहे. अगदी एक हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या मोबाईल फोन्स मध्ये आज या प्लॅटफॉर्मवरून विक्री होत आहे.
आज या प्लॅटफॉर्मवर हजारो विक्रेते रजिस्टर्ड असून जे फोन्स दुकानांमध्ये अनेक आठवडे पडून राहत तेच फोन्स या वेबसाईटवर तीन दिवसाच्या आत विकले जात आहेत. यावरूनच आपण अपूर्वच्या या व्यवसायाच्या यशाचा अंदाज घेऊ शकतो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हे फोन विकले जात आहेत. ते देखील टॅक्स इन्व्हॉइससह. अपूर्वच्या म्हणण्यानुसार, २०१७ मध्ये जीएसटी नुकतेच लागू झाले होते. त्याचा फायदा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झाला. कारण जीएसटी पूर्वीच्या सिस्टीमप्रमाणे आम्हाला जर आंतरराज्य विक्री करायची असती तर अनेक प्रकारच्या टॅक्सेस व त्यातील क्लिष्टता याला तोंड द्यावं लागलं असतं. मात्र जीएसटी आल्यामुळे आमचं काम अतिशय सोपं झालं आहे.
कुठल्याही आर्थिक पाठबळाशिवाय केवळ स्वतःच्या हिंमतीवर सुरू केलेला हा व्यवसाय महिन्याला सरासरी पाच कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. दिवाळीच्या काळात तर हीच उलाढाल दुप्पट होत आहे. काही गुंतवणूकदार अपूर्व यांच्याशी चर्चा करत असून लवकरच मोठी फंडिंग या कंपनीला मिळण्याची आशा आहे.
एखाद्या वस्तूला डिमांड नाही, असं होत नसतं. फक्त योग्य वस्तू, योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी पोहोचवणं गरजेचं असतं. आणि हेच काम आज ही कंपनी करत आहे. त्यामुळेच ही कंपनी स्वतः मोठी होत असतानाच अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीपासून वाचवत आहे.
अगदी मोजक्या लोकांमध्ये उभी असलेल्या या कंपनीमध्ये अपूर्व सोबत असलेले तरुण तडफदार गोपाल पांचाल जो मार्केटिंग पाहतो, जानकी शहा हा टेक्निकल गोष्टी पाहतो व शरद भट कंपनीचा चीफ फायनान्स ऑफिसर अशी टीम आहे. अवघ्या तीन वर्षांमध्ये ही कंपनी चांगल्या उंचीला पोहोचली असून आज मोबाईल फोनसह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये देखील कार्यरत आहे. लवकरच त्यांचा किराणामाल व इतर घरगुती साहित्यात देखील उतरण्याचा मानस आहे.