केएफसी
वयाच्या ६५व्या वर्षी नव्या उमेदीने उभे राहत हरलँड सँडर्स यांनी नवा व्यवसाय सुरू केला. हाच व्यवसाय आता जगविख्यात ब्रँड बनला आहे. तो म्हणजे केएफसी. याच स्टार्टअपची ही यशोगाथा…
हारलँड सँडर्स यांचा जन्म १८९० मध्ये अमेरिकेतील हेनरी विले या ठिकाणी झाला. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील हा मुलगा. अवघ्या सहा वर्षांचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि संपूर्ण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आईसह याच्यावर आली. शेतात मजुरी करण्यापासून गाड्या स्वच्छ करण्याचे काम करत या लहान मुलाने आपल्या लहान भावंडांचे पालन पोषण केले. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना केवळ सातवी पर्यंतच शालेय शिक्षण घेता आले.
वयाच्या सोळाव्या वर्षी अमेरिकन सैन्यात भरती होण्याची जाहिरात पाहून आपले वय १८ पूर्ण आहे असे खोटे बोलून सैन्यात प्रवेश मिळवला. पण एकाच वर्षात खरे वय लक्षात आल्याने त्यांना तिथून कमी करण्यात आले. त्यानंतर हमाल म्हणून रेल्वेमध्ये कशीबशी नोकरी मिळाली, पण तिथे देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत काही कारणामुळे भांडण झाल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पुढे बोटींवर लागणारे कंदिल तयार करण्याचा व्यवसाय त्यांनी छोट्या प्रमाणात सुरू केला. पण बाजारात आधीच मोठे व्यापारी असल्याकारणाने यांच्या कंदिलांची विक्री होऊ शकली नाही. तोही व्यवसाय बंद करावा लागला.
याच दरम्यान त्यांनी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यास बहिस्थ विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांनी ती डिग्री लवकरच पूर्ण देखील केली. याच डिग्रीच्या जोरावर त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली खरी पण पहिल्याच वर्षात आपल्या क्लायंट सोबत एका वादामध्ये त्यांच्यावर तोही व्यवसाय सोडण्याची वेळ आली.
पुढे त्यांनी स्वतःचे एक गॅरेज सुरू केले. त्यात सर्व प्रकारच्या गाड्यांच्या दुरुस्तीचे काम केले. त्यासोबतच जे प्रवासी उपाशी व गरजू असतील त्यांना मोफत अन्नदान करण्याचे काम देखील सुरू केले. मात्र मोठ्या गाड्यांमधून श्रीमंत प्रवासी येतील त्यांच्याकडून त्याच अन्नासाठी पैसे घेण्यास देखील सुरुवात केली. यातूनच त्यांना पुढे रेस्टॉरंटची कल्पना सुचली.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी केंचुकी शहरात आपले रेस्टॉरंट सुरू केले. हे करताना त्यांच्या असं लक्षात आलं की, चिकनच्या डिशेस बनवताना विशेष करून जास्त वेळ लागत होता. याकरता त्यांनी नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. आणि हेच करत असताना कुकर मध्ये एका विशिष्ट पद्धतीने तेच चिकन शिजवून त्यावर वेगवेगळ्या ११ प्रकारचे मसाले टाकून एक नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हाच पदार्थ पुढे फ्राईड चिकन म्हणून प्रसिद्ध झाला. रेस्टॉरंटमधील अन्नाला आणि विशेष करून चिकनला अतिशय उत्कृष्ट चव होती. या चवीची ख्याती दूरवर पसरली. त्यांच्या रेस्टॉरंटच्या चवीचा बोलबाला सर्वत्र होऊ लागला. अगदी राजदरबारी देखील. आणि म्हणूनच केंचुकी शहराचे गव्हर्नरांनी स्वतः रेस्टॉरंटला भेट दिली. आणि हारलँड सँडर्स यांच्यावर खुश होऊन कंचुकी शहराचे कर्नल म्हणून मानद पदवी प्रदान केली. त्यादिवसापासून हारलँड सँडर्स हे कर्नल हरलँड सॅंडर्स झाले.
उत्पन्न जरी चांगले होते तरी त्यातून होणारा नफा फारसा नव्हता. दैनंदिन खर्च सहज भागतील अशा स्वरूपाचा त्यांचा व्यवसाय सुरू होता. याच व्यवसायात वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी रिटायरमेंट स्वीकारली. अर्थात तसे सरकारी बंधनच होते. अनेक पाश्चिमात्य शहरांमध्ये व्यवसायिकांना देखील सरकारतर्फे पेन्शन देण्याची व्यवस्था असते. १९५२ साली रिटायर झाल्यानंतर हारलँडला देखील १०५ डॉलर्सचा चेक दर महिन्याला पेन्शन म्हणून मिळत असे. ही रक्कम त्यांना पुरेसी नसे म्हणूनच त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या हाताला असलेली चव व त्यांच्याकडे असलेले प्रॉडक्ट ‘फ्राईड चिकन’ या जोरावर त्यांनी पुन्हा पैसे कमवण्याचा निर्णय घेतला. ते लवकर उठून घरीच मोठ्या प्रमाणात फ्राईड चिकन तयार करत. सायकल घेऊन शहरातील घरोघर जाऊन आपल्या फ्राईड चिकन विकत. यात असं लक्षात आलं की घरांमध्ये चिकन विकत घेतले जरी तरी ते फार थोड्या प्रमाणात घेतले जाते व मोठ्या प्रमाणावर उरत होतं. आणि यातून उत्पन्न देखील फार येत नव्हते.
त्यामुळे आता त्यांनी आपल्या व्यवसायाची पद्धत बदलली. घरोघर जाऊन चिकन विकण्यापेक्षा त्यांनी आता हॉटेल्स व रेस्टॉरंटला भेटून चिकन विकण्याचा प्रयत्न सुरू केला. वय कुठलेही असो अनुभव कितीही असला तरी व्यवसायांमध्ये झगडावे प्रत्येकालाच लागते. तुमचे धैर्य व तुमच्यातील सबुरी याची कसोटी लागल्याशिवाय व्यवसाय मोठा होत नाही असेच म्हणावे लागेल. कारण जेव्हा रेस्टॉरंट्सला भेटायला सुरुवात केली त्यावेळेला तब्बल १००९ रेस्टॉरंटमध्ये नकार ऐकावा लागला व त्यानंतर एक हजार दहाव्या रेस्टॉरंटमध्ये होकार मिळाला.
अशाच पद्धतीने काही मोजक्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना आपले चिकन विकण्याची परवानगी मिळाली. आता नेमकं कोणत्या रेस्टॉरंटची किती ऑर्डर त्या दिवसाला असणार आहे याचा अंदाज आधी करणं केवळ अशक्य होतं. आणि म्हणूनच त्यांनी आपले कुकिंगचे साहित्य आपल्या कारमध्ये इन्स्टॉल केले. त्यामुळे ते रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर घ्यायचे. लगेच पुढच्या काही मिनिटांमध्ये ती ऑर्डर आपल्या गाडीतच तयार करून ते रेस्टॉरंटला द्यायचे.
हळूहळू व्यापार वाढत होता आणि आता केवळ फ्राईड चिकन विकून चालणार नव्हतं. कारण त्याकरता आता रेस्टॉरंट्स मध्येच स्पर्धा लागली होती. आणि म्हणूनच हरलँड यांनी आपली व्यवसाय नीती बदलण्याचा निर्णय घेतला.
वाढत्या प्रतिसादाला पाहून याच मागणीचा पूर्ण फायदा घेण्याचे हरलँड यांनी ठरवलं. आणि इथून पुढे त्यांनी फ्रॅंचाईजी मॉडेल सुरुवात केली. यात फ्रॅंचायजी मिळविण्याकरीता एक विशिष्ट फ्रॅंचायजी फी होती. त्यासोबतच जी काही विक्री होईल त्याच्या नफ्यात देखील वाटा ठरलेला होता. याच फ्रॅंचायजी मॉडेलच्या आधारावर १९६२ सालापर्यंत ६०० फ्रेंचायजी देण्यात आल्या. फ्रॅंचायजी देण्यासाठी कंपनीला नाव हवं होतं आणि हरलँड यांच्याच सोबत काम करणारा एक पेंटर यानेच सुचवलेलं हे नाव. केनचुकी फ्राईड चिकन म्हणजेच आजचे ‘केएफसी.’
वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत त्यांनी केएफसीच्या फ्रॅंचायजी इंग्लंड, मेक्सिको, कॅनडा, जमैका या देशांमध्ये पोहोचल्या होत्या. अमेरिकेतील सर्वात कमी काळात श्रीमंत झालेल्या व्यक्तींच्या यादीमध्ये हारलँड केव्हाच पोहोचले होते. श्रीमंत होण्याचे स्वप्न वयाच्या ७२ वर्षी पूर्ण झालेले पाहून हरलँड यांनी आता मात्र खरोखर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी इतरत्र असलेले आपले फ्रॅंचायजी आउटलेट दोन दशलक्ष डॉलर्सला विकले. केवळ कॅनडातील आउटलेट त्यांनी स्वतः करता ठेवले होते. कंपनी विकल्यानंतर देखील केएफसी करता त्यांनी अनेक वर्ष सल्लागार म्हणून काम पाहिले.
वयाच्या ६५व्या वर्षी उभा केलेला आपला वटवृक्ष भव्य दिव्य रूप धारण केलेले पाहून अतिशय समाधानाने वयाच्या नव्वदाव्या वर्षी म्हणजेच १९८० साली त्यांचा न्युमोनियाने मृत्यू झाला. आज केएफसीचे जगातील १४० हून अधिक देशांमध्ये २४ हजारांहून अधिक आऊटलेट्स आहेत. २०२० सालापर्यंत कंपनीचे मूल्यांकन साडेपाच अब्ज डॉलर्सहून अधिकचे आहे. संपूर्णपणे स्वतःच्याच पैशाने व स्वतःच्या हिंमतीवर उभा केलेला, अगदी लहानसा, दारोदार फिरून विक्री करण्याचा व्यवसाय आज जगभर पसरला आहे. यात हजारो तरुणांना रोजगार मिळवून देत आहे.