खरंखुरं स्वप्न!
टाटा समूह आणि पतंजली सारख्या बड्या ब्रॅंड्सला मागे टाकत आयपीएलचं टायटल प्रायोजकत्व तब्बल २२३ कोटी रुपयांना मिळविणारी ड्रीम ११ हे स्टार्टअप नक्की काय आहे. फँटसी क्रिकेटची मूहूर्तमेढ भारतातत रोवणाऱ्या या अनोख्या भारतीय स्टार्टअपची ही भन्नाट कहाणी…
हर्ष जैन आणि भवित सेठ – हे दोघे बाल मित्र. लहानपणापासून खेळ खेळणे व पाहणे दोघांनाही मनापासून आवडे. हर्षचा जन्म मुंबईत झाला. त्याने ग्रीनलव्हन्स हायस्कूलमधून शिक्षण आरंभ केले. शालेय शिक्षण पूर्ण करून तो अभियांत्रिकी साठी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात गेला. आणि शेवटी, त्याने कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये एमबीएचे शिक्षण घेतले. तर भवित हा देखील शालेय शिक्षणानंतर परदेशात गेला. बेंटले युनिव्हर्सिटी (बोस्टन) येथून इंजिनीअरिंग व एमबीए केले. त्यानंतर हार्वर्ड मधील ई-कॉमर्स रणनितीचा पदविका अभ्यासक्रम देखील पूर्ण केला.
शिक्षण पूर्ण करुन दोघेही भारतात परतले. हर्षने सेवा क्षेत्रात स्टार्टअप सुरू केले. तर भवित देखील वडिलोपार्जित कापड व्यवसायात गुंतला. आणि मग भारतीय क्रिकेटला आणि या दोघांच्याही आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष उजाडले.
२००८ च्या आयपीएल दरम्यान हर्ष भारतात ऑनलाईन फँटसी क्रिकेट खेळण्यासाठी अशाच व्यासपीठाचा शोध घेऊ लागला. क्रिकेट हा एक धर्म आहे आणि कोट्यावधी भारतीयांच्या जीवनाचा ते एक अविभाज्य घटक असलेल्या देशात फँटसी क्रिकेट अस्तित्वात नव्हते. हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. आणि यातूनच एका मोठ्या संधीची चाहूल त्याला लागली. फॅंटसी क्रिकेट ही संकल्पना परदेशात पाहिली असल्याने त्याला याच्या यशाबद्दल विश्वास होता. आणि म्हणूनच त्याने आपल्या काही मित्रांना या प्रोजेक्ट मध्ये सोबत येण्यासाठी विचारणा केली. त्याला प्रतिसाद दिला तो भावित सेठने. दोघांनीही एकत्र येऊन ह्या संकल्पनेवर काम करण्याचे ठरवले. भारतातील मार्केट आणि मानसिकता समजून घेण्यासाठी दोघेही संशोधन करू लागले. लोकांचा आणि त्यांच्या खिश्याचा अभ्यास केला आणि मगच आपल्या कार्याला सुरुवात केली. अशा पद्धतीने २००९ साली ड्रीम ११ या स्टार्टअपची मुहूर्तमेढ मुंबई येथे रोवली गेली.
सुरुवातीला दोघांनी ड्रीम ११ चे वेगवेगळे मॉडेल्स बनवून ते तपासून पहिले. सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट देण्याचा निश्चय त्यांनी केला होता. वेगवेगळे प्लॅटफॉर्म, नवनवीन तंत्रज्ञान आणि वापरणाऱ्यांसाठी अधिक सुलभ कसे करता येईल या करता त्यांनी अनेक प्रयोग केले. सलग तीन वर्षे मेहनत घेतल्यानंतर २०१२ साली त्यांना अपेक्षित असलेले प्रॉडक्ट तयार झाले. सिंगल मॅच प्रिमीअम असे हे पहिले प्रॉडक्ट त्यांनी ग्राहकांसमोर आणले.
व्हर्च्युअल स्वरुपाचा खेळ असणारे हे अॅप आहे. ड्रीम ११ ह्या अँप वर १८ वर्षावरील कुणीही रजिस्टर होऊ शकतं. यात प्रमुख चार खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि बास्केटबॉल. तुम्ही तुमच्या खेळाबद्दलच्या ज्ञानाप्रमाणे आणि कौशल्यानुसार आपली एक टीम बनवायची. या टीम मध्ये तुम्ही खऱ्या खेळाडूंची निवड करू शकता (बास्केटबॉलमध्ये पाच, कबड्डीमध्ये सात आणि क्रिकेट/फुटबॉलमध्ये ११). एखाद्या मॅचच्या सुरुवातीला तुम्ही आपली टीम बनवायची. जर तुमच्या टीम मधल्या खेळाडूंनी खरोखर चांगली कामगिरी केली तर तुम्हाला त्याचे गुण मिळतात. इतकंच नव्हे, ह्यात जिंकलेल्या गुणांना तुम्ही कॅशच्या स्वरूपात आपल्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर देखील करू शकता. यात फ्री व पेड असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. कुठलेही पैसे न देता देखील तुम्ही यात सहभागी होऊ शकता. जर पेड मेम्बरशिप घेतली तरच बक्षिसाची रक्कम मिळते. आणि या प्रत्येक व्यवहारामागे ड्रीम ११ आपली टक्केवारी काढत असतो.
हर्ष ला अपेक्षित सहज व सोपी सुरुवात झाली नाही. खरंतर भारतातील जनतेला हे एक नवीनच प्रॉडक्ट होते. त्यात ऑनलाईन पैसे लावणे, गुंतवणे याबद्दल भारतीयांच्या मनात एक भीती कायमच होती. (अर्थात आता ती कमी होऊ लागली आहे.) ऑनलाईन जिंकलेले पैसे परत मिळतील का? याची देखील शाश्वती जनतेला नव्हती. कंपनीसाठी सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे. याकरता त्यांना अधिक मेहनत करावी लागली. म्हणूनच त्यांनी फ्री मेम्बरशिप देखील दिली आहे. खरंतर त्यांच्या ७ कोटीहून अधिक ग्राहकांपैकी ९०% लोक आजही फ्री मेम्बरशिप वापरत आहेत. तरीही त्यांनी उत्पन्न वाढीसाठी आपल्या अँप वर इतर जाहिराती दिल्या नाहीत. कारण त्यांच्या मते, “आम्हाला ग्राहकाला आमच्याच अँप बद्दल विश्वास व आमच्या प्रॉडक्ट बद्दल पूर्ण समाधान प्राप्त करवून द्यायचे आहे.
आजही अनेक जणांच्या मनात असलेला प्रश्न म्हणजे ड्रीम ११ हा जुगार तर नाही ना? आणि याच प्रकरणात ड्रीम ११ विरुद्ध केस ही झाली होती. जुगार खेळाला प्रोत्साहन देण्याबद्दल वरुन गुंबर या वकीलाने ड्रीम ११ विरुद्ध २०१७ मध्ये याचिका दाखल केली होती. दोन गेम खेळल्यानंतर ड्रीम ११ च्या प्लॅटफॉर्मवर जमा केलेली ५० हजार रुपयांची रक्कम गमावल्याचे गुंबर यांनी सांगितले. सार्वजनिक जुगार कायदा १८६७ अन्वये ड्रीम ११ च्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
ड्रीम ११ ऑपरेट करणारी कंपनी सर्व्हिस टॅक्स आणि इन्कम टॅक्स भरत होती आणि कंपन्यांच्या रजिस्ट्रारकडे एक निगमित संस्था म्हणून विधीवत नोंदणीकृत आहे. तसेच एखादी शर्यत, खेळ किंवा इतर कल्पित घटनेच्या निकालावर जुगार खेळण्यासाठी कुठल्याही कौशल्याची अगर संशोधनाची गरज नसते. परंन्तु ड्रीम ११ मध्ये तुमची टीम निवडणे, योग्य खेळाडू घेणे, सर्व प्रकारच्या खेळाडूंचा संच योग्य प्रमाणात असणे या करिता त्या खेळातील ज्ञान व अभ्यास लागतो. म्हणून ड्रीम ११ वरील फँटसी खेळ हा जुगार नाही, असा आदेश हायकोर्टाने दिला. गुंबर यांनी या निकालास सुप्रीम कोर्टात दाद मागितली. पण ती अपयशी ठरली.
या ऐतिहासिक सुनावणी नंतर ड्रीम ११ ने ग्राहकांचा विश्वास तर संपादन केलाच, पण त्यासोबत स्पर्धकांना देखील निमंत्रण दिले. या क्षेत्रात आतापर्यंत ५-६ कंपन्या होत्या. पण हाच आकडा थेट ७०-७५ पर्यंत गेला. स्पर्धा वाढली की गुणवत्ता सुधारते असा सर्वसाधारण नियम आहे. पण या स्पर्धकांमध्ये अनेक सट्टेबाजांनी देखिल प्रवेश केला होता. ड्रीम ११ च्या हे लक्षात येताच त्यांनी १२ प्रामाणिक कंपन्यांसोबत इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स अँड गेमिंग (आयएफएसजी)ची स्थापना झाली. आयएफएसजी ही भारताची पहिली आणि एकमेव क्रीडा गेमिंग स्वयं-नियामक संस्था आहे. अलीकडेच जॉन लोफॅगेन यांना अध्यक्ष म्हणून नेमले गेले. जॉन यांनी आयपीएल सह अनेक क्रीडा स्पर्धांच्या नियमवली तयार केल्या आहेत.
ड्रीम ११ ला आज पर्यंत अनेक भारतीय व परदेशी गुंतवणूकदारांकडून फंडींग मिळाले आहे. नुकत्याच जानेवारी २०२० मध्ये मिळालेल्या ५०० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकी नंतर ड्रीम ११ चे मूल्यांकन २.५ अब्ज डॉलर्स इतके करण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये कंपनीचे उत्पन्न २३० कोटी रुपये एवढे होते. २०१८-१९ मध्ये ते ८०० कोटी रुपये झाले. आता आयपीएलच्या प्रायोजकत्वामुळे कंपनीच्या उत्पन्नात भरघोस वाढ अपेक्षित आहे. केवळ ५४७ कर्मचाऱ्यांसोबत काम करत असतांना देखील कंपनीचा विकास दर तब्बल २३० टक्के इतका आहे. ड्रीम ११ ला पहिले दहा लाख ग्राहक रजिस्टर करण्यासाठी तीन वर्षांचा अवधी लागला, पण पुढील वीस लाख लोकांपर्यंत पोहोचायला त्यांना केवळ दोन महिने लागले.
महेंद्र सिंग धोनी व हर्षा भोगले सारखे दिग्गज ब्रँड एम्बॅसेडर घेऊन ड्रीम ११ ची घोडदौड सुरु आहे. “फँटसि गेमिंग हे भविष्य आहे आणि भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जर ही मोठी झाली तर ती अमेरिकेसह जगातील कोणत्याही बाजारापेक्षा मोठी असेल”, हे मत आहे गेम्ससाठी क्रीडा प्लॅटफॉर्म रुटरचे संस्थापक पियुष के यांचे. जागतिक पातळीवर, गेमिंग हा १५५ अब्ज डॉलर्सचा उद्योग आहे आणि २०२५ पर्यंत तो २५७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सन २०२४ पर्यंत भारतीय फँटसी क्रीडा बाजारपेठ जवळपास १० अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल. भारतात, ड्रीम ११ ही सर्वात मोठी फँटसी गेमिंग कंपनी आहे जी आज सिंहाचा वाटा उचलत आहे. आपण ठरवले तर ते नक्कीच साध्य करु शकतो, असे भवित यास वाटते. प्रामाणिक प्रयत्न करत रहा, डगमगू नका, असा सल्ला हर्ष देतो.
फॅंटसी क्रिकेट आणि तेही भारतात ही तशी अशक्यप्राय बाब. मात्र, हर्ष आणि भवित यांनी त्यास वास्तवात रुपांतरित केले. हे तर मोठे यश आहेच पण दिवसागणिक वाढणारा स्टार्टअपचा व्यवसाय हेच सांगतो आहे की कुठलेही स्वप्न अशक्यप्राय नसते. त्या दिशेने योग्य प्रयत्न केले तर ते स्वप्न तुमच्या कवेत येते. ड्रीम ११च्या रुपाने खरंखुरं स्वप्न साकारणाऱ्या हर्ष आणि भवित यांच्याकडे केवळ भारतातच नाही तर परदेशातही आयकॉन म्हणून पाहिले जाते आहे. यंदाचा आयपीएल त्यांच्या व्यवसायाला मोठी कलाटणी देणारा ठरेल, असा विश्वास दोघांनाही आहे.
Dr.Prasad
You are doing a fantastic work by writing “Startup Ki Duniya”. Your writing motivates to think on any idea which is in the minds of individual. Also the readers are knowing the unknown facts about the startups like you mentioned in the series of your articles. Yes we understand the efforts you are taking in the research of these startups every week. Good work. Keep it up.
Thank you Sir for the appreciation . . .