मराठी दाम्पत्याचा सीमेपार झेंडा!
मराठी दाम्पत्य हे थेट गुजरातमधील दोन विभागांच्या सचिव पदाची धुरा सांभाळत आहेत. मिलिंद आणि निपुणा तोरवणे हे ते दाम्पत्य आहे. त्यांच्यारुपाने मराठी दाम्पत्याचा सीमेपार झेंडा फडकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पूर्वी सीमांची अनेकानेक बंधने होती. आता अनेकानेक माणसे राज्याच्या-देशाच्या सीमा पार करून उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा राज्याच्या सीमांचे बंध रोखू शकत नाहीत. अशी अनेकानेक उत्तम उदाहरणे आता भारतीय प्रशासन सेवेतही दिसून येत आहेत. त्यातून पती पत्नी मिळून जेव्हा मोठी झेप घेतात तेव्हा तो अधिक कर्तृत्वाचा विषय बनतो.
आपल्या कामाचा डंका गुजरातमध्ये पोहोचवणारे अस्सल मराठमोळे दाम्पत्य आता विशेष चर्चेत आले आहे. कारण या उभयतांची निवड महत्त्वाच्या पदांसाठी झालेली असून सीमापार जाऊन त्यांनी मराठीची पताका दमदारपणे फडकवलेली आहे.
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील बेहेड गावचे मिलिंद तोरवणे व त्यांची पत्नी निपुणा तोरवणे या दोघांनीही प्रशासकीय सेवेत चांगली कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केलेली आहे. गुजरात सरकारच्या अर्थ विभागाच्या सचिवपदी मिलिंद यांची तर गृह विभागाच्या सचिवपदी निपुणा यांची निवड झाली आहे.
मराठमोळ्या कुटुंबात जन्म झालेल्या या दोघांनीही आपापल्या कर्तृत्वाच्या सीमा विस्तारत स्वत:ला पुढे नेले आहे. त्यामुळे हे पती पत्नी सगळ्यांसाठीच कौतुकाचा विषय ठरलेले आहेत. यापूर्वी सुद्धा निपुणा यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर काम केलेले आहे. त्यामध्ये त्या कच्छ येथे अतिरिक्त पोलीस महासंचालक होत्या. अहमदाबादच्या सहायक पोलीस आयुक्त होत्या. सुरत शहराच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त सुद्धा होत्या. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक आणि महिला आयोगाच्या वतीने देण्यात येणा-या तेजस्विनी पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. गुजरातमधील पोलीस प्रशासनातील अशी मजल मारणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या आहेत.
मिलिंद हे देखील अतिशय बुद्धिमान असे व्यक्तिमत्त्व असून स्पर्धा परीक्षांतून त्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवलेली आहे. ही दोन्ही पदे जबाबदारीची असून आपले संपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न असल्याचे हे दोघेही सांगतात. आपल्या साक्री तालुक्याशी असलेली नाळ तुटू न देता तेथील तरुणांसाठी आणि लोकांसाठी काही ना काही चांगले करीत राहण्याची त्यांची इच्छा आहे.
मिलिंद यांच्याविषयी सांगायचे तर त्यांनी कायमच प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली आहे. एका छोट्याशा गावातून ते पुढे आले. स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र त्यांनी स्वत:ला झोकून दिले आणि स्वत:चे यश संपादन केले. प्रशासकीय पद मिळाल्यानंतर मात्र जिल्हाधिकारी असो वा कोणतीही जबाबदारी त्यात त्यांनी आपला दमदार ठसाही उमटवलेला आहे.
निपुणा यांनी हैद्राबाद आणि मसुरी येथील पोलीस प्रशिक्षण संस्थांतून आपले शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांनी दहशतवादविरोधातील कारवाया, आपत्ती काळातील व्यवस्थापन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय आहेत. जान्हवी आणि ऋजुता या दोन कन्या त्यांना आहेत. एकमेकांच्या वाटचालीसाठी आणि प्रगतीसाठी आम्ही कायमच पूरक असतो असे ते सांगतात.
निपुणा तोरवणे यांनी मानसशास्त्र हा विषय घेऊन बी. ए. ची पदवी संपादन केली आहे. तर मिलिंद यांनी बी.इ. इलेक्ट्रॉनिक्स हे त्यांचं शिक्षण पुण्यातून पूर्ण केले आहे. या पूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनाही सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्तम जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद यांचा विशेष सन्मान गुजरात सरकारने केलेला होता. हे दोघेही उत्तम गुजराती बोलतात आणि त्याचबरोबर मराठीचाही त्यांना तेवढाच अभिमान आहे.
मिलिंद आणि निपुणा या दोघांचीही करिअरची कारकीर्द कायमच गौरवास्पद ठरलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनीही मिलिंद यांचा सन्मान केलेला आहे.
महाराष्ट्रापलिकडे जाऊन गुणवत्तेच्या बळावर मराठीची पताका गौरवाने फडकावणाऱ्या दांम्पत्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटायला हवा.