लंडनची फेलोशिप मिळवणारी पहिली अंध मराठी महिला!
सीमोल्लंघन म्हणजे केवळ सीमा ओलांडून पलीकडे जाणे नाही तर, स्वत:च्या क्षमतांच्या कक्षा विस्तारत आपल्या जीवनाला वेगळा आयाम देणे हेसुद्धा व्यापक अर्थाने सीमोल्लंघनच. राज्य-देशांच्या सीमा पार करून जात अनेकानेक मराठी माणसे आज उत्तम कर्तृत्व गाजवत आहेत. अशाच काही स्वतःला सिद्ध करणाऱ्या, वेगळे काम साकारणाऱ्या माणसांची ओळख करून देण्याच्या हेतूने हे नवीन साप्ताहिक सदर खास ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांसाठी…
आयुष्यात ज्यांना काही करायचं नसतं त्यांच्यासाठी कारणं तयार असतात. ज्यांना करायचं असतं त्यांना कसल्याही मर्यादा रोखू शकत नाहीत. अशी माणसं झेप घेत पुढे जातात. आजच्या आपल्या लेखमालिकेच्या पहिल्याच भागात आपण पाहणार आहोत, एक अशी व्यक्ती जिने आपल्या सगळ्या प्रतिकूलतांवर मात करीत यशाची अनेक शिखरे एकामागोमाग पादाक्रांत केली. या मालिकेतील पहिल्या मानकरी आहेत, डॉ. अभिधा घुमटकर! थेट लंडनची फेलोशिप मिळवणारी देशातील पहिली वहिली दृष्टिहिन महिला….
आकांक्षांना प्रयत्नांचे आणि जिद्दीचे पंख दिले की किती मोठी भरारी घेता येऊ शकते याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे. डॉ. अभिधा या जन्मत दृष्टिहिन आहेत. मात्र अंधत्व त्यांच्या वाटचालीत कधीच आडवे येऊ शकले नाही. त्यांनीही येऊ दिले नाही. छोट्या छोट्या समस्यांचा बाऊ करून आपण जेव्हा गोष्टी करायचे टाळतो किंवा नवी आव्हाने स्वीकारत नाही अशा सर्वांसाठी हे उदाहरण म्हणजे डोळ्यांत अंजन घालणारे ठरावे. त्यांच्या आईने अभिधा यांचे संगोपन करताना व्यक्तिमत्त्व विकासात अंधत्व ही अडचण ठरणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. त्यामुळे त्यांचे संपूर्ण शिक्षणदेखील सामान्य शाळेत इतर मुलांच्या बरोबरीने होऊ दिले. याचा एक उत्तम फायदा असा झाला की, अंधत्वाचा न्यूनगंड कधीही निर्माण झाला नाही.
प्रार्थना समाज शाळेत शिक्षण झाले आणि पार्ले येथील कॉलेजमधून त्या बी. ए. झाल्या. परंतु इथेच न थांबता इतिहासाची आवड असल्याने त्याच विषयात संशोधन केले. ‘हिस्ट्री आॅफ सायन्स इन महाराष्ट्र’ या महत्त्वाच्या विषयावर संशोधन करून त्यांनी त्यांनी विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) ही पदवी संपादन केली. हे सारे करीत असताना प्रतिभेने पंख विस्तारले. त्यांना श्रीलंका आणि ग्लासगोला येथे खास आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे लंडनमधील ‘Charles Wallace India Trust’ या संस्थेने संशोधनासाठी सन्मान्य फेलोशिप देऊन त्यांना सन्मानित केले.
लंडनमध्ये फेलोशिप मिळवणा-या त्या पहिल्या भारतीय अंध महिला ठरल्या. या फेलोशिपअंतर्गत लंडनमध्ये जाऊन संशोधन करून अभ्यासविषय सादर करायचा होता. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून ‘सिमोल्लंघन’ केले आणि थेट परकीय भूमीवर जाऊन तिथे आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहिला तर आपण चक्रावून जाऊ इतका मोठा आहे. त्यांचे मराठीसह संस्कृत, इंग्रजी, बंगाली, सिंधी, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक अशा अनेकानेक भाषांवर प्रभुत्व आहे. डॉ. अभिधा यांचे १४ संशोधन विषय आत्तापर्यंत अत्यंत नामांकीत अशा आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत.
डॉ. अभिधा उमेदीच्या पंखांना रोखू पाहणारा एकच अडथळा होता तो म्हणजे, दिसण्याचा. परंतु त्यांनी त्यावरच लीलया मात केली आणि आयुष्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. आयुष्यात सीमोल्लंघन करायचंच तर सर्वांत आधी आपल्यातील मर्यादांचं करूयात हाच संदेश त्यांच्या जीवनातून आपल्याला नक्कीच मिळतो. ही जीवनकहाणी निश्चितच प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारी आहे.