ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका आजपासून….
………
दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये २ गुन्हे दाखल; पुढे काय?
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
संरक्षण क्षेत्राशी निगडीत संस्थांमधील सुरक्षेला छेद देणाऱ्या घटना वारंवार घडत असल्या तरी त्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास सुरू असला तरी सुरक्षेच्या मूळ प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
बनावट आधार कार्डद्वारे प्रवेशाचा प्रयत्न
आंबेबहुला येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) येथे बनावट आधारकार्ड द्वारे प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न झाल्याची बाब उघडकीस आली आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला असून या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. कंत्राटी रोजंदारांनी हे बनावट आधार कार्ड बनविले होते. आधार कार्डची रंगीत प्रत काढून त्यावर खाडाखोड करण्यात आली. ही बाब डीआरडीओच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पोलिसांच्या हवाली या सर्वांना केले. याप्रकरणी संबंधित ठेकेदारालाही अटक करण्यात आली. सुरक्षेचे नियम तोडण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान
एचएएलच्याच आवारात असलेल्या ओझर विमानतळालगत कार्गो कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह याठिकाणी असलेल्या हायलोडर या वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात कुठलीही वाच्यता करण्यात आलेली नाही. याप्रकरणीही दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. कार्गो कॉम्प्लेक्समध्येच काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांपैकीच कुणीतरी हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मात्र हा तपास बंद केला आहे. संवेदनशील आणि संरक्षण विभागासाठी असलेल्या विमानतळाच्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा करण्याची हिंमत होत असल्याचे यानिमित्ताने पुढे येत आहे. हा गुन्हा कुणी केला याचा शोध घेतला जात नसल्यानेही गुन्हेगारांचे फावत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वरील दोन्ही प्रकारात कंत्राटी कामगारांचा प्रश्न अतिशय कळीचा असल्याचे दिसून येत आहे. खासकरुन परप्रांतीय कामगारच मोठ्या संख्येने काम करीत आहेत. संरक्षण क्षेत्राच्या सुरक्षा व्यवस्थेला छेद देण्याचे काम घडत असले तरी त्याची कुठलीही दखल सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जात नाही. त्यामुळे किरकोळ ते गंभीर प्रकार वारंवार घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
—
तपास सुरू आहे
बनावट आधार कार्ड बनवून आंबे बहुलाच्या संरक्षण केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. लॉकडाऊनमुळे आधार एजन्सींसह युआयडीएशी संपर्क आणि तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. कुठलाही मुलाहिजा न बाळगता आम्ही तत्काळ कारवाई केली आहे. तपास पूर्ण झाल्यावर पुढील कार्यवाही करु.
- अनिलकुमार बोरसे, पोलिस निरीक्षक, दिंडोरी
(क्रमशः)