ह्यावेळच्या पद्मश्रीच्या यादीत डॉ. श्रीकांत दातार हे मराठी नाव अग्रक्रमाने झळकले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन असलेल्या भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ जाहीर करण्यात आली आहे. नुकतीच मागच्या महिन्यातच त्यांची नियुक्ती हार्वर्डच्या डीनपदी झाली आहे.
६७ वर्षांचे डॉ. दातार हे मूळचे मुंबईकर. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर सेंट झेव्हियर्स कॉलेज मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत त्यांनी १९७३ मध्ये मुंबई विद्यापीठातून गणित व अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. त्याच वेळी ते सनदी लेखापाल देखील झाले होते . डॉ. दातार यांनी सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. अहमदाबादच्या अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेतून त्यांनी व्यवस्थापन ह्या विषयाचे उच्च शिक्षण घेतले. त्या संस्थेमध्ये ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते. त्या संस्थेचे विद्यार्थी असतांना ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस देखील होते.
पुढे स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी बिझनेस अकाऊंटिंग मध्ये पीएचडीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. कॉस्ट मॅनेजमेंट आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम स्वॉल्व्हिंग आणि मशीन लर्निंग या विद्याशाखेत ते निपुण आहेत. श्रीकांत दातार हे नोवार्टिस एजी आणि टी-मोबाईल यूएस इंकसोबतच कित्येक कंपन्यांच्या बोर्डातही सहभागी आहेत.
श्रीकांत दातार हे गेल्या पंचवीस वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत . २०१५ पासून ते हार्वर्ड इनोव्हेशन लॅबचे प्राध्यापक अध्यक्ष आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये विद्यापीठ कामकाजातील वरिष्ठ सहाय्यक डीन आहेत. ते आयसीएफ इंटरनॅशनल, स्ट्रायकर कॉर्पोरेशन आणि टी-मोबाइल यूएस, सर्व अमेरिकेतील आयआयएम कलकत्ता आणि संचालक मंडळाचे सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी आयआयएम अहमदाबाद, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज या दोन्ही संस्थांच्या नियामक मंडळावर काम केले आहे.
डॉ. दातार हे एस. पी. जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या नियामक मंडळाचे देखील सदस्य आहेत. डॉ. दातार यांनी उद्योगात लेखाकार आणि नियोजनकार म्हणून आणि कार्नेज मेलॉन युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. , वेळ-आधारित स्पर्धा, प्रोत्साहन आणि कामगिरीचे मूल्यांकन ह्या सारख्या महत्वाच्या विषयांमध्ये त्यांनी संशोधन करून महत्वाच्या कल्पना विकसित केलेल्या आहेत.
व्यवस्थापन शास्त्रातले एक महत्वाचे चिंतक आणि लेखक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. अनेक शैक्षणिक पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले आहेत. संशोधन, विकास आणि प्रशिक्षण या क्षेत्रातील असंख्य कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदावर विराजमान होणारे ते सलग दुसरे भारतीय वंशाचे प्राध्यापक ठरले आहेत. डॉ.श्रीकांत दातार हे हार्वर्ड विद्यापीठाच्या ११२ वर्षांच्या इतिहासातले अकरावे डीन आहेत. याआधी, डॉ. नितीन नोहारिया यांनी डीनपदावर काम केले होते. मागच्या महिन्यात डॉ. दातार यांनी पदभार स्वीकारला. आणि लगेचच त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला. कुणाही मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!