एकेकाळी जयललिता यांच्या घनिष्ट सहकारी असणाऱ्या शशिकला बंगलोरच्या कारागृहतून सुटून बाहेर आल्या आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर उभ्या असणाऱ्ऱ्या तमिळनाडच्या हवेत शशिकला ह्या नावाच्या ह्या नव्या वावटळीमुळे नेमके काय घडते याकडे आता सगळ्यांचे लक्ष्य असणे अगदी स्वाभाविक आहे. तमिळनाड जयललितांना अम्मा म्हणून ओळखतो. प्रदीर्घ काळ त्याची सावलीसारखी साथ करणाऱ्या शशीकला यांना आता जयललितांच्या निधनानंतर आता महत्व मिळायला लागले आहे. अम्मा म्हणजे आई आणि चिन्नांमा म्हणजे आईची धाकटी बहीण – म्हणजे मावशी . माय मरो आणि मावशी जगो असे आपण म्हणत असतो.तमिळनाडमध्ये हे अक्षरशः सत्यात उतरलेले दिसते आहे. सध्या तमिळनाडमधल्या सत्तेच्या चाव्या अण्णा द्रमुकच्या ताब्यात आहेत आणि शशिकला यांच्या प्रवेशामुळे त्या पक्षामध्ये खळबळ निर्माण होते आहे.
साठीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शशीकला यांची स्टोरी एखाद्या बॉलीवूडपटामध्ये शोभून दिसणारी आहे. तमिळनाडच्या तिरुवारूर — तंजावूर – जिल्ह्यातल्या मन्नारगुडी गावच्या शशीकलायांची राज्यात इतकी दहशत आहे की त्यांच्यामुळे मन्नारगुडी माफिया असा नवा शब्दच रूढ झालेला आहे. एका साध्या आणि मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातली फारसे शिक्षण न झालेली ही एक साधारण महिला. कृष्णवेणी आणि विवेकानंदम ह्यांची मुलगी. पण जयललिता यांच्या संपर्कात आल्यामुळे आज त्या तमिळनाडच्या राजकारणातल्या सर्वात सामर्थ्यशाली व्यक्ती आहेत. तात्पुरत्या स्वरूपाच्या सरकारी नोकरीत पीआरओ म्हणून काम करीत असणाऱ्या एम. नटराजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तमिळनाडचे त्यावेळचे मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांच्या विश्वासातले आयएएस अधिकारी व्ही.एस.चंद्रलेखा यांच्याशी नटराजन यांचे जवळचे संबंध होते. त्यातूनच नटराजन यांचा एमजीआर ह्यांच्या गोतावळ्यात समावेश झाला. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात नटराजन यांची नोकरी गेली. त्याकाळात त्यांच्या कुटुंबासमोर अडचणीची स्थिती निर्माण झाली.
१९८० च्या आसपास नटराजन यांची नोकरी पुन्हा मिळाली खरी पण त्यावेळी देखील आर्थिक अडचणींमुळे शशीकलायांना अनेक कामे करावी लागली. त्या काळात नव्याने लोकप्रिय झालेला व्हिडिओ कॅसेट्स विकण्याचा व्यवसाय करायला त्यांनी सुरुवात केली. त्यातूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आणि लग्न समारंभांचे व्हिडीओ रेकोर्डिंग करण्याचे कामदेखील त्यांनी करायला सुरुवात केली. त्याच सुमारास जयललिता राजकारणात प्रवेश करीत होत्या. एआयएडीएमकेच्या प्रचारप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्याशी आपल्या पत्नीची ओळख करून द्यावी अशी नटराजन यांनी चंद्रलेखा यांना विनंती केली आणि त्यातूनच शशीकला यांचा जयललितांशी परिचय झाला.
सुरुवातीला पक्षाच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ रेकोर्डिंग करण्याचे काम मिळावे इतकी माफक अपेक्षा ठेऊन सुरु झालेला हा संबंध शेवटी चेन्नईच्या मरीना बीचवरच्या जयललिता यांच्या अंत्यसंस्कारांपाशी संपली. या काळात ह्या संबंधांमध्ये कधी दुरावा आला कधी शशीकला यांना अम्मांच्या संतापाला देखील समोरे जावे लागले. पण जवळपास पस्तीस वर्षे शशीकला जयललिता यांच्या सोबत राहिल्या. एखाद्या सावली सारखी त्यांनी अम्मांची साथ केली. १९८७ मध्ये एमजीआर यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत जयललिता यांना अपमानित करण्यात आहे आणि पुढे सुरु झाले सत्तेसाठीची एक घमासान साठमारी. एमजीआरयांची पत्नी जानकी आणि राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या जयललिता यांच्यात सत्तेसाठी आणि पक्षावर ताबा मिळवण्यासाठी खूप मोठी राजकीय लढाई झाली. अण्णा द्रमुकमध्ये फूट पडली . त्यात सुरुवातीला जानकी जिंकल्या सारख्या वाटल्या. त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले देखील. पण लोक जयललितांच्या मागे होते आणि त्यामुळे त्या लढाईत अखेरीस जयललिता यांचीच सरशी झाली.
पुढे १९८९ मध्ये ह्या दोघींमध्ये समेट झाला. जानकी आणि जयललिता यांच्या गटांना एकत्र आणण्याचे श्रेय नटराजन यांना दिले जाते. पुढे शशीकला आणि नटराजन जयललिता यांच्या पोझ गार्डनमधल्या निवासस्थानीच रहायला लागले. पण पुढे जयललिता यांचा मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ संपत असतानाच नटराजन आणि शशीकला विभक्त झाले. १९९६मध्ये जयललितांनी नटराजन यांना पॉईस गार्डन निवासस्थानातून बाहेर काढले. शशीकला मात्र जयललिता यांच्या सोबतच रहायला लागल्या. हळूहळू जयललितांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी शशीकला यांच्या ताब्यात गेल्या. आपोआपच अम्मांवर शशीकला यांचा खूप मोठा प्रभाव निर्माण झालेला होता.
जयललिता यांनी कोणाला भेटावे, त्यांचे दौरे कुठे व्हावेत ह्यासारख्या निर्णयात शशीकलायांचा प्रभाव पडायला सुरुवात झाली. सहाजिकच अण्णाडीएमकेमधल्या अनेकांना शशिकलांची मदत झालेली आहे. तमिळनाडचे मुख्यमंत्रीपद मिळालेल्या पनीरसेल्व्हन यांचा उदय देखील शशीकलायांच्यामुळेच झाला असे म्हटले जाते. दोघेही एकाच जातीचे आहेत आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच पनीरसेल्व्हन यांना शशीकला आणि त्यांच्यामुळेच जयललिता यांची मदत झाली आहे.
पाच-सहा वर्षांपूर्वी संतापून जयललिता यांनी शशीकला यांच्या सर्व कुटुंबीयांना पक्षातून काढून टाकले होते. शशीकलायांची पॉईस गार्डनमधूनदेखील हकालपट्टी झाली. त्यांच्या नातेवाईकांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना पक्षातून डच्चू दिला गेला. त्यानंतर दोनच महिन्यांनी नटराजन यांना तंजावर पोलिसांनी भूखंड बळकावल्या प्रकरणी अटक केली. पण जेमतेम शंभर दिवसात जयललितांचा राग मावळला आणि शशीकलापुन्हा पॉईस गार्डनमध्ये परतल्या आणि जयललिता यांच्यासह रहायला लागल्या. शशीकलाआणि त्याच्या कुटुंबियांची एआयएडीएमके वर घट्ट पकड आहे असे बोलले जाते. पक्षाचे उमेदवार त्यांच्या पसंतीने आणि मान्यतेनेच ठरवले जातात.
नटराजन यांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बरीच उठबस आहे. मुलायम, मायावती, लालू, ममता तसेच कॉंग्रेस आणि भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे – आणि त्यांच्या माध्यमातून शशीकला यांचे चांगले संबंध आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी तिकिटासाठी नटराजन यांच्या घराबाहेर अण्णा द्रमुकच्या इच्छुक उमेदवारांची रांग लागते.
जयललिता यांच्या अखेरच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यावर फक्त शशीकला यांचाच ताबा होता. अपोलो हॉस्पिटलमध्ये केवळ त्यांचाच शब्द प्रमाण मानला जात असे. जयललिता यांना भेटायला येणारे राज्यातले मंत्री, दिल्लीहून येणारे राजकीय नेते इतर बड्या व्यक्तींना जयललिता यांच्या खोलीत प्रवेशदेखील मिळत नसे. राजकारणात एक उमेदवार म्हणून त्यान नव्या आहेत पण राजकारण त्यांना नवीन नाही. पनीरसेल्व्हन यांच्यासह तमिळनाडचे सारे मंत्रीमंडळ आणि सगळे आमदार त्यांना भेटायला पॉईस गार्डनवर जात असे हे लक्षात घेण्यासारखे आहे. नरेंद्र मोदी अम्मांच्या अंत्यदर्शनासाठी आल्यावर शशीकला यांची भेट घेऊन अगदी त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन सांत्वन केले होते .
पुढे शशिकला यांच्यावर भ्रष्टाचाराचा खटला झाला . त्यात त्या दोषी ठरल्या आणि चार वर्षांसाठी त्यांची रवानगी बंगळुरूच्या तुरुंगात झाली. तिथे देखील त्या नेहमीच प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. नुकत्याच त्या बाहेर आल्या आहेत. आता त्यांच्या येण्यामुळे राज्याच्या राजकारणात पुढच्या काळात नेमके काय घडते ते पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे हे नक्की.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!