मौलाना वाहिउद्दीन खान
यंदाच्या पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये मौलाना वहीदुद्दीन खान ह्यांचे नाव आले आणि ही यादी अत्यंत नि:पक्षपातीपणाने तयार झाली आहे, याची खात्री पटली. सामाजिक शांतता आणि सहिष्णुता यांचा सातत्याने पुरस्कार करणारा एक विचारवंत म्हणून देशविदेशात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
भारतात अल्पसंख्य असणाऱ्या मुस्लिम समाजाला दुय्यम दर्जाच्या नगरिकांसारखी वागणूक दिली जाते आणि त्यामुळे त्या समाजात भीती निर्माण होते आहे असा (अप)प्रचार हॉट असतांनाच्या काळात मौलानांची ह्या पुरस्कारासाठी झालेली निवड सर्व जगाला एक वेगळा संकेत देत आहेत. शहाण्णव वर्षांच्या मौलाना यांचा जन्म उत्तरप्रदेशतल्या आझमगढचा. पांच वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचा आईने त्यांचा सांभाळ केला त्यात त्यांच्या काकांची मदत झाली. पण लहानपणीच वडील वारल्यामुळे आपल्याला अनाथ असण्याचे दुःख काय असते ते समजू शकले आणि आयुष्यात कोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते याचीही कल्पना येऊ शकली असे ते सांगतात. आयुष्यात येणारी संकटे ही आपल्याला मिळालेली एकप्रकारची संधीच असते , त्यातूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते असे ते स्वतःच्या अनुभवाच्या आधाराने सांगतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांना हाच दृष्टिकोन उपयुक्त ठरला आहे.
त्यांचे कुटुंब भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणाने सहभागी होते त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांच्यावर गांधीवादी विचारांचे संस्कार झाले आणि आजही ते असेच आहेत. तरुण वहीदुद्दीन जवळच सराय मीर येथील मदरसातुल इस्लाही या पारंपारिक इस्लामिक माध्यमिक शाळेत दाखल झाले. त्याठिकाणी शिक्षण घेतल्यावर त्यांनी इस्लामी तत्वज्ञानातली पदवी मिळवली. त्यांच्या खेरीज घरातल्या इतरांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या सहवासात त्यांना देखील आधुनिक जगात विकसित होणारे ज्ञान आणि शास्त्रीय दृष्टिकोन मिळाला.
मदरसामधले पारंपारिक शिक्षण घेतल्यावर त्यांनी आधुनिक पद्धतीचे इंग्रजी शिक्षण देखील घेतले आणि त्यामुळेच त्यांच्या विचारांमध्ये पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही विचारांचा समन्वय झालेला पहायला मिळतो. सहाजिकच भोवतालच्या जगातल्या विविध गोष्टीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे , त्या चिकित्सकपणाने समजाऊन घेणे आणि समन्वयाच्या आधाराने त्यांना आत्मसात करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.
इस्लामिक शिकवण नंतरच्या वैज्ञानिक युगातील शैली आणि भाषेत सादर करणे ही काळाची गरज आहे असे ते सांगत आले आहेत आणि आयुष्यभर त्यांनी स्वतःदेखील तसा प्रयत्न केला आहे. लहानपणापासूनच त्यांचे कळत नकळत त्यांचे निसर्गाशी जवळचे नाते तयार झाले. मदरसामध्ये प्राथमिक धडे घेत असताना त्यांना ह्याची जाणीव झाली की की कुराण मनुष्याला निसर्गावर लक्ष ठेवण्यास आणि त्याच्याशी तादात्म्य होण्याचे शिक्षण देत असते . त्यामुळे त्यांनी पुढील आयुष्यात जाणीवपूर्वक हे आत्मसात करण्यास सुरवात केली.
आपले सकारात्मक विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी १९७० मध्ये नवी दिल्ली येथे इस्लामिक सेंटरची स्थापना केली. ह्या संस्थेचे अल-रिसाला ह्या नावाचे मासिक सुरू करण्यात आले. इस्लामचा शांततापूर्ण चेहरा समजून घेण्यासाठी, मुस्लिमांमध्ये त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी नवीन जागृती निर्माण करण्यासाठी तसेच सकारात्मक विचारसरणी आणि कृतीस चालना देण्यासाठी बरेच काही केले आहे.
राम जन्मभूमीसाठी होणाऱ्या आंदोलनामुळे जेव्हा देशातले वातावरण मोठ्या प्रमाणात ढवळले गेलेले होते त्यावेळी दोन समुदायांमधील शांतता व मैत्री पुनर्संचयित करण्याची गरज लोकांना पटवून देण्याची गरज त्यांना वाटली होती. त्यामुळेच देश पुन्हा एकदा सलोखा आणि समन्वयाच्या मार्गावर चालू शकेल हे त्यांनी सातत्याने सांगितले होते . चंद्रशेखर, नरसिंहराव आणि अटलजी पंतप्रधान असतांना रामजन्मभूमीचा विषय सलोख्याने मार्गी लागावा म्हणून जे प्रयत्न करण्यात आले होते त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्या काळात त्यांनी आचार्य मुनि सुशील कुमार आणि स्वामी चिदानंद यांच्यासह महाराष्ट्रातून पंधरा दिवसांची शांती यात्रा काढली होती. या शांतता यात्रेने देशातील शांतता परत मिळविण्यात मोठे योगदान दिले.
त्यांनी इस्लाम, अध्यात्म, बहुधर्मीय समाजात शांतता व सहजीवन या विषयावर २०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत, सर्वात अलीकडील म्हणजे प्रोफेट ऑफ पीसः द टीचिंग्ज ऑफ प्रोफेट मुहम्मद , जिहाद :पीस अँड इंटर कम्युनिटी रिलेशन्स इन इस्लाम, द आयडोलॉजी ऑफ पीस यासारखी पुस्तके केवळ दहशतवादाच्या संकटावर शांततेने तोडगा काढत नाहीत तर लोकांना इस्लाममधील शांती ही संकल्पना समजण्यास मदत करतात.
आपले विचार जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केलेल्या आहे आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना देशविदेशातले अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मिखाईल गोर्बाचेव्ह पुढाकाराने त्यांना डिमिरगस पीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मदर टेरेसा आणि राजीव गांधी राष्ट्रीय सदिच्छा पुरस्कार , अबुधाबी इथला सय्यदियाना इमाम अल हसन इब्न अली शांती पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. भारत सरकारने २००० साली मध्ये पद्मभूषण, आणि आत्ता पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेले आहे.
त्यांनी जगभर सलोखा आणि शांततेचे समर्थन केले आहे त्यामुळेच सर्व समुदाय आणि समाजातील सर्व लोकांमध्ये आदर आहे. भारत आणि परदेशात सर्व धार्मिक गट आणि समुदायाच्या सभांना आमंत्रित केले जात असते . मौलाना वहीदुद्दीन खान हे शांती, प्रेम आणि सौहार्दाचा सार्वत्रिक संदेश देणारे भारताचे आध्यात्मिक राजदूत आहेत असे म्हटले तर ते योग्यच असेल.