पद्मश्री @ १०५ !
मोदींच्या राज्यात काही गोष्टी विशेष घडत असतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी निवडलेले पुरस्कार विजेते ही त्यातलीच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणायला पाहिजे. कधीकाळी या यादीत नेहमी ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारे अभिनेते किंवा पेज थ्री वर झळकणारे तथाकथित सेलेब्रिटीजची भरताड असायची. आता ह्या यादीतल्या लोकांचा मुद्दाम प्रयत्नपूर्वक परिचय करून घ्यावा लागतो. ही माणसे झाकल्या माणकांसारखी कानाकोपऱ्यात शांतपणाने आपापली कामे करीत असतात. त्यांची कामे बघितली तर आपण थक्क होऊन जात असतो.
मागच्या वर्षीच्या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा अकोला तालुक्यातील कोंभाळणे गावाच्या रहिवासी असणाऱ्या राहीबाई या आदिवासी, निरक्षर महिलेचे नाव झळकलेले होते. जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन राहीबाईंनी केलेले आहे. जे वाण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीकडे देखील उपलब्ध नाही. शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते त्या मूळ स्वरूपात त्यांनी ते जपून ठेवलेले आहे.
राहीबाईंसारखेच काम करणाऱ्या तमिळनाडच्या कोईम्बतूर जिल्ह्यातल्या श्रीमती एम.पप्पमाल यांची ह्या वर्षीच्या यादीत निवड झालेली आहे. श्रीमती पप्पमाल ह्या चक्क एकशे पांच वर्षाच्या आहेत. ह्या वयात एका वेगळ्या प्रकारच्या कार्यात त्या अजूनही सक्रिय आहेत. ज्या वयात माणूस जिवंत राहणे सुद्धा अशक्य समजले जाते.. अशा वयात आपल्या कार्यात सक्रिय राहणे आणि ज्याची दखल केंद्रातल्या सरकारला घेणे भाग पडेल असे काम करीत राहणे ही एक अद्भुत गोष्ट आहे. कोईम्बतूर जवळच्या थेकमबपट्टीमध्ये आपल्या अडीच एकराच्या शेतात त्या गेली सत्तर वर्षे शेती करीत आहेत. आपल्या शेतात त्या बाजरी, डाळी आणि भाजीपाला पिकवत आहेत. त्याशिवाय कृषीशी संबंधित अनेक कार्यक्रमात त्या सक्रिय स्वरूपात सहभागी होत असतात. ह्या शिवाय गावातच त्यांचे एक किराण्याचे दुकान देखील त्या चालवीत असतात. त्यांच्या शेतीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्या गेली सात दशकांपेक्षाही जास्त काळ जैविक – ऑर्गनिक पद्धतीची शेती करीत आहेत.
आज जैविक शेतीला महत्व प्राप्त झालेले आहे. कृत्रिम खते आणि कीटक नाशके वापरण्याचा घातक परिणाम आता सर्वांच्या लक्षात येऊ लागलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक स्वरूपाच्या खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करण्याकडे कल वाढायला लागला आहे. पप्पमाल यांनी जय काळात ह्या पद्धतीने शेती करायला सुरुवात केली त्या काळात त्यांनी वापरलेले तंत्र अनोखे होते. एक दृष्टीने त्या आपल्या काळाच्या कितीतरी पुढे होत्या. शेतीच्या व्यतिरिक्त त्या इतर अनेक क्षेत्रात सक्रिय आहेत. तमिळनाड कृषी विद्यापीठाच्या कार्यात त्या सक्रिय होत्या अजूनही त्यांचा सल्ला विद्यापीठाच्या संशोधनात घेतला जातो.
जैविक शेतीच्या संदर्भातल्या परिसंवादांमध्ये आणि विद्यापीठातल्या ह्या विषयातल्या नवीन प्रयोगांमध्ये त्यांचा आजदेखील सक्रिय सहभाग असतो. राजकारणात देखील त्या थोडाकाळ सक्रिय होत्या. त्याकाळात थेकमबपट्टी पंचायत समितीच्या कामात देखील त्या सक्रिय होत्या काही काळ त्या पंचायत समितीच्या सदस्य देखील होत्या. ह्या वयात देखील रोज सकाळी साडेपाच वाजता त्यांचा दिवस सुरू हॉट असतो. सकाळी सहा साडेसहाच्या सुमारास त्या शेतावर जातात. त्यांची दिनचर्या अतिशय नियमित स्वरूपाची असते. त्या साधे जेवण घेतात. बिर्याणी हा त्यांचा आवडता पदार्थ आहे आणि केळीच्या पानावर बिर्याणी खाणे ही त्यांची आवडीची गोष्ट आहे.
मनात इच्छा असली आणि त्याला नियमितपणाची आणि परिश्रमाची जोड मिळाली तर आपण कोणत्याही वयात यशस्वीपणाने काम करणे शक्य होते . चांगल्या आणि प्रभावी कार्याला वयाचे बंधन नसते ही गोष्ट पप्पमाल यांच्या उदाहरणाने लोकांच्या समोर आली आहे. पप्पमाल यांचे उदाहरण आपल्या देशातल्या लोकांसाठी – विशेषतः तरुणांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरणारे आहे हे निश्चित. पप्पमाल सारख्या तपस्वी आडगावातून शोधून काढून त्यांना गौरवणे आणि त्यानिमित्ताने त्यांचे कर्तुत्व लोकांच्या समोर आणणे हे एक मोठे काम पद्मपुरस्काराच्या स्वरूपाने सरकारने केले आहे हे विशेष.