अमेरिकेचा पहिला सेकंड जंटलमन डग एम्हॉफ
ह्या वेळच्या अमेरिकेच्या निवडणुकीत अनेक विक्रम झाले आहेत. अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच जमैकन आणि आशियाई मूळ असणारी एक स्थलांतरित महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आली आहे. त्यामुळे एक गमतीदार गोष्ट घडली आहे. एरवी एखादा पुरुष उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला की त्याच्या पत्नीला सेंकड लेडी म्हणण्याची पद्धत आहे. आता कमलादेवी हॅरिस आणि त्यांचे पती ह्यांच्यासाठी काय संबोधन वापरावे यावर तिथे खल सुरू आहे. पहिल्यांदाच एखादी महिला ह्या पदांपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रपतींच्या पत्नीला फर्स्ट लेडी म्हटले जाईल .. पण उपराष्ट्रपतीच्या पतीला काय म्हणावे हा पेच तिथे निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी सेंकड जंटलमन म्हटले जाईल असे दिसते आहे.
कमलादेवी हॅरिस यांचे पती डग एम्हॉफ हे अमेरिकेच्या इतिहासातले पहिले सेंकड जंटलमन ठरले आहेत. तसेच मुळची इस्रायली ज्यू असणारी व्यक्ती कुणा उपराष्ट्रपतीची लाईफ पाटर्नर असण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.
छपन्न वर्षांच्या एम्हॉफयांचा जन्म न्यूयॉर्कमधला. पुढे त्यांचे कुटुंब कॅलीफोर्नियामध्ये गेले. तिथे त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. बौद्धिक संपदा, प्रसारमाध्यमे. मनोरंजन ह्या क्षेत्रातल्या संघटनांसाठी ते काम करीत असत. ही अमेरिकेतली कायद्याच्या क्षेत्रात एक सुपर स्पेशालिटी शाखा मानली जाते. वॉलमार्ट , मर्क ह्यासारख्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्यांसाठी ते काम करीत असत. तिथेच त्यांचा कमला यांच्याशी संपर्क आला आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि कमला हॅरिस उपराष्ट्रपतीच्या उमेदवार असल्याचे नक्की झाल्यावर सुरुवातीला एम्हॉफ यांनी आपल्या लॉ फर्ममधून रजा काढली आणि नंतर त्या फर्ममधून ते बाहेर पडले. सध्या जॉर्जटाउन विद्यापीठाच्या कायदा विषयक अध्ययन केंद्रात ते अध्यापक म्हणून काम करीत आहेत आणि ह्यापुढच्या काळात आपले अध्यापनाचे काम सुरूच ठेवण्याचा त्यांचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती बेडन यांच्या पत्नी जिल ह्या विद्यापीठात अध्यापन करतात. व्हाईट हाऊसमध्ये गेल्या तरीही त्या त्यांचे अध्यापनाचे काम करीत राहणार आहेत. त्यांच्या प्रमाणेच एम्हॉफ देखील आपले अध्यापनाचे काम सुरू ठेवणार आहेत . कमला हॅरिस ह्यांच्याशी विवाह होण्याच्या आधी एम्हॉफ यांचा पहिल्या पत्नी केरस्टीन यांच्याशी घटस्फोट झाला आहे. त्या पत्नीपासून त्यांना दोन मुळे आहेत आणि ती त्यांच्या – म्हणजेच कमला ह्यांच्यासोबत राहतात. गमतीची गोष्ट म्हणजे शपथविधीसाठी एम्हॉफ आणि त्यांची मुले यांच्या प्रमाणेच त्यांची पहिली पत्नी देखील विशेष अतिथी म्हणून हजर होत्या.
एखादी महिला निवडून येणं आपल्याकडे देखील काही नवीन गोष्ट नाही. आपल्याकडे चक्क राष्ट्रपतीपदापर्यंत महिला निवडल्या गेल्या आहेत . आपण देशाच्या प्रथम नागरिकाच्या जोडीदाराचे उदाहरण पाहिलेले आहे. अमेरिकेसारख्या आपल्यापेक्षा अधिक प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या लोकशाही देशात हा अनुभव इतका काळ जावा लागला आहे . मुळातच अमेरिका हा स्थलांतरीतांचा देश.
तिथे विविध प्रकारची विविधता पहायला मिळते. पण ट्रम्प यांच्या काळात ह्या विविधतेला धक्का पोहोला. अशा वेळी संमिश्र वांशिक वारसा असणाऱ्या महिला उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणे जितके वैशिष्ट्यपूर्ण आहे तितकेच त्यांचा पतीदेखील इस्रायली ज्यू वंशाचा अमेरिकन असावा हे देखील महत्वाचे आहे. ट्रम्प यांच्या काळात अमेरिका फॉर अमेरिकन्स अशा घोषणा व्हायला लागलेल्या होत्या. त्यातून बाहेर आल्यासारखे वाटते आहे. शासनात विविध वांशिक समूहांना प्रतिनिधीत्व मिळाले तर ते शासन सर्वांचा संतुलित विचार करते असे मानले जाते.
अमेरिकेत आता हे घडायला लागेल असे मानता येईल. उपराष्ट्रपतींच्या जोडीदाराला शासनात अधिकृत काही काम नेमून दिलेले नसते. पण सत्तेच्या इतक्या निकट वावरत असतांना अनेक कामे करता येतात. मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन ह्यांच्या सारख्यांची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. तथापि शासनात अधिकृत पद धारण करणाऱ्यांच्या जोडीदारांनी केलेल्या “ उद्योगांची ” उदाहरणे देखील नवीन नाहीत. आता अमेरिकेत महिला उपराष्ट्रपती झाली आहे. तिचा जोडीदार तिला सहाय्यकारी ठरतो की त्याचे काही नवे कारनामे आपल्याला पहायला मिळतात हे पुढच्या काळात समजेलच. तथापि आत्ता तरी एका अभूतपूर्व ऐतिहासिक वळणावर अमेरिका आलेली आहे असेच म्हणायला लागेल.
ह्या वळणावर डग हे कसे वागतात, कशी आणि कोणते काम करतात आणि आपल्या पत्नीच्या ऐतिहासिक कारकिर्दीत नेमकी कोणती भूमिका पार पाडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेषतः ज्यो बेडेन आणि कमला हॅरिस यांच्या वयात जवळपास वीस वर्षांचे अंतर आहे. बेडेन आता ऐशीच्या घरात आहेत. हॅरिस त्यामानाने खूप लहान आहेत. सहाजिकच त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपतीपद मिळू शकते. अशा वेळी डग यांच्याकडे साऱ्या जगाचे लक्ष असणार आहे हे नक्की.