लिलावतीची कन्या डॉ. रोहिणी गोडबोले
तुम्ही मिशन मंगल नावाचा सिनेमा पाहिला असेल. त्यातली विद्या बालन आठवतीय का ? घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सहजतेने सांभाळत शास्त्रज्ञ म्हणून यशस्वीपणे काम करणारी एक साधी मध्यमवर्गीय महिला त्यात तिने साकारली आहे. अशाच शास्त्रज्ञांच्या परंपरेत ज्यांचा आपण समावेश करू शकतो अशा बंगलोरच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समधल्या शास्त्रज्ञ डॉ.रोहिणी गोडबोले यांना नुकतेच फ्रान्स सरकारने “ ऑड्रे नेशन डू मेरिट ” हा सर्वोच्च बहुमान देऊन गौरवलेले आहे. भारतीय आणि त्यातदेखील विशेषतः महाराष्ट्रीय वैज्ञानिकांसाठी ही निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे.
डॉ.रोहिणी गोडबोले ह्या मुळच्या पुण्याच्या. तिथल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळच्या पटवर्धन वाड्यामध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले . लहानपणापासूनच त्यांना विज्ञानाची आवड होती. त्यामुळे पदार्थविज्ञान हा विषय निवडून त्यातच संशोधन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९७२ साली महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्या बी.एस.सी. झाल्या. त्या परीक्षेत त्या पुणे विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून त्यांनी एम.एस.सी.ची पदवीही पहिल्या क्रमांकाने मिळवली. त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले आणि १९७९ साली अमेरिकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधून त्यांनी पीएच्.डी.मिळवली . त्यानंतरची काही वर्षे त्या मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत होत्या . नंतर मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि त्यानंतर बारा वर्षे मुंबई विद्यापीठात सुरुवातीला व्याख्याती आणि नंतर अधिव्याख्याती म्हणून काम केले. त्या सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळूरू येथे काम करतात. कण भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि कोलायडर भौतिकी या विषयांत त्यांनी चाळीसहून अधिक वर्षे संशोधक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
दिल्लीच्या इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, बंगलोरच्या इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि अलाहाबादच्या नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स, या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या तिन्ही संस्थांच्या फेलो म्हणून निवड होण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. देशातील अग्रणीच्या महिला शास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते.डॉ. गोडबोले युरोपीय संशोधन प्रयोगशाळा, सर्नमधील आंतरराष्ट्रीय लिनियर कोलायडरच्या इंटरनॅशनल डीटेक्टर ॲडव्हायझरी ग्रुपमध्ये २००७ ते २०१२ या कालावधीत सहभागी झाल्या होत्या. इंटरनॅशनल डीटेक्टर ॲडव्हायझरी ग्रुप आयएलसी डीटेक्टरचे संशोधन, संशोधन संचालनालयाचा विकास यावर आणि डीटेक्टर डिझाईन गटांवर लक्ष ठेवतो. त्या विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांच्या पुढाकाराबद्दल काम करणाऱ्या भारतीय विज्ञान अकादमीच्या सदस्य गटाच्या अध्यक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी डॉ. रोहिणी गोडबोले यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान झालेला आहे.
वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील महिलांचा टक्का वाढावा, यासाठी त्या सक्रिय आहेत. भारतातील निवडक १०० महिला संशोधकांवरील ‘लिलावतीज डॉटर’ या पुस्तकाची संकल्पना व सहसंपादन त्यांनी केले होते. ‘ए गर्ल्स गाइड टू लाइफ इन सायन्स’ या पुस्तकाच्याही त्या सहसंपादक आहेत. ‘सायन्स करियर फॉर इंडियन विमेन’ या विषयावरील भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अहवालाच्या त्या सहलेखिका आहेत. आत्ताच फ्रान्समधला सन्मान देखील त्यांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्प तसेच मूलभूत विज्ञान संशोधनात महिलांचे प्रमाण वाढावे, यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल मिळालेला आहे. त्याशिवाय त्यांना इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे देण्यात येणारा आर. डी. बिर्ला स्मृती पुरस्कार,
आय.आय.टी., मुंबईच्या मानांकित माजी विद्यार्थी म्हणून गौरव , न्यू इंडियन एक्स्प्रेस ग्रुपचे देवी पारितोषिक, आदित्य प्रतिष्ठान, पुणे यांचा स्त्री शक्ती पुरस्कार, एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी , सी.व्ही.रामन महिला विज्ञान पुरस्कार, स्वदेशी विज्ञान आंदोलन कर्नाटक यांच्यातर्फे, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सत्येंद्रनाथ बोस पदक,
जे.सी.बोस फेलोशिप, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, सैद्धांतिक भौतिक शास्त्रातील कामगिरीसाठी एशियाटिक सोसायटीकडून मेघनाद साहा पदक असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि गौरव प्राप्त झालेले आहेत. भरतातल्याच नाही तर जगाच्या पातळीवरच्या मोजक्या उच्च दर्जाचे भौतिकी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. “ आपण एक वैज्ञानिक आहोत आणि स्त्री आहोत इतकंच .. स्त्री वैज्ञानिक म्हणून काही वेगळ्या पद्धतीने विचार केला जावा असे नाही ” इतक्या सहजतेने त्या ह्या विषयाकडे पाहतात.
बाराव्या शतकाच्या आसपास भास्करचार्यांची लेक असणारी लीलावती ही भारतातली ही भारतातली पहिली महिला गणिती – म्हणजेच शास्त्रज्ञ मानली जाते. काही काळ खंडित झालेली लीलावतीची परंपरा पुढे नेणाऱ्या काही मोजक्या महिलांमध्ये आज डॉ.रोहिणी गोडबोले अग्रस्थानी आहेत. त्यामुळेच त्यांच्या यशाचे एक वेगळे महत्व आहे.